बनावट मॅरेज सर्टिफिकेट पाठवून मोडले ‘तिचे’ लग्न! डिजिटल नराधमाचा क्रूर खेळ; ब्लॅकमेल करुन वारंवार अत्याचार..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
सोशल मीडियाच्या आभासी विश्वातून होणार्‍या ओळखी किती भयानक वळण घेऊ शकतात, याचे भयंकर उदाहरण संगमनेर शहरातून समोर आले आहे. या प्रकरणातील आरोपीने प्रेमाचे नाटक करुन एका 21 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ तर केलाच, पण तिचा संसार उभा राहण्यापूर्वीच बनावट कागदपत्रांच्या आधारे तो मोडण्याचे नीच कृत्यही केले. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आरोपी मकरंद संजय गोडगे याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला गजाआड घालण्यात आले आहे. या घटनेने पालकांच्या चिंता वाढल्या असून आपल्या पाल्यांच्या हाती असलेल्या मोबाईलचा त्यांच्याकडून कशाप्रकारे वापर होतो याचा दरमहिन्याला आढावा घेण्याची गरज निर्माण झाली आहे.


याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मूळची नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असलेली 21 वर्षीय पीडिता संगमनेरमध्ये शिक्षण घेत होती. ऑगस्ट 2025 मध्ये इन्स्टाग्रामवर तिची ओळख मकरंद गोडगे याच्याशी झाली. ओळखीचे रुपांतर ठरल्याप्रमाणे मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाल्याचा आभास आरोपीने निर्माण केला. मात्र, या मैत्रीच्या आड त्याचा विकृत हेतू दडलेला होता. सप्टेंबर 2025 मध्ये त्याने पीडितेचा विश्वास संपादन करुन तिला घुलेवाडी येथील एका खोलीवर बोलावले. तिथे तिच्या नकळत मोबाईलमध्ये तिचे काही खासगी फोटो काढले आणि ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.


हा प्रकार इथेच थांबला नाही. या प्रकारानंतर पीडितेने त्याच्याशी असलेले संबंध तोडण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तिला वारंवार ब्लॅकमेल केले. सहेतुने त्याने तिच्या शिक्षणात आणि वैयक्तिक आयुष्यात विष कालवण्यास सुरुवात केली. पीडितेच्या मामांनी त्याला समज देण्याचाही प्रयत्न केला, मात्र मी तुला सोडणार नाही अशा धमक्या त्याने सुरुच ठेवल्या. धक्कादायक म्हणजे गेल्या 10 मार्च रोजी पीडितेचे एका मुलाशी लग्नही ठरले होते. ते मोडण्यासाठी आरोपीने क्रूरतेची सीमा ओलांडली. त्याने पीडितेच्या भावी पतीच्या मित्राचा नंबर मिळवला आणि त्यावर बनावट पद्धतीने तयार केलेले ‘मॅरेज रजिस्टर सर्टिफिकेट’ आणि काही फोटो पाठवले. त्यामाध्यमातून आमचे लग्न आधीच झाले आहे, अशी खोटी माहिती पसरवून त्याने पीडितेचे ठरलेले लग्नही मोडले.


आपले आयुष्य आणि सन्मान मातीमोल करण्याच्या या प्रकाराने संतप्त झालेल्या पीडितेने संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठले आणि आपल्यावर गुदरलेला प्रसंग पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना सांगितला. त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ भारतीय न्यायसंहितेच्या कलम 64 (1), 64(2)(टी), 351 (2) आणि 351 (4) प्रमाणे गुन्हा दाखल करीत पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक फराहनाज पटेल यांच्याकडे सोपवला. त्यांनीही तपासाला गती देत आरोपी मकरंद संजय गोडगे (रा.चिंचोली गुरव, ता.संगमनेर) याच्या लागलीच मुसक्या आवळल्या. या प्रकरणातील डिजिटल आरोपीने ज्या पद्धतीने क्रूर खेळ करीत बनावट सरकारी कागदपत्रांचा वापर करुन फसवणूक केली व पीडितेचे आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला त्यावरुन त्याच्यातील गुन्हेगारी वृत्ती किती खोलवर रुजलेली आहे, हे देखील स्पष्ट होते. या प्रकरणाने पालकांच्या चिंता वाढल्या असून आपला पाल्य मोबाईलचा नेमका कसा वापर करतो याचे प्रत्येक पालकाने निरीक्षण करण्याची वेळ आली आहे.


सोशल मीडिया हे आता केवळ गप्पांचे साधन राहिले नसून ते गुन्हेगारांचे कुरण बनले आहे. या घटनेतील आरोपीने केवळ शारीरिक अत्याचार केला नाही, तर पीडितेचे सामाजिक अस्तित्व संपवण्याचा ‘डिजिटल कट’ रचला. बनावट कागदपत्रे तयार करुन कोणाचेही लग्न मोडण्यापर्यंत जर गुन्हेगारांची मजल जात असेल, तर ही समाज आणि कायद्यासाठी धोक्याची घंटा आहे. तरुण मुलींनी अनोळखी व्यक्तींच्या ‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ स्वीकारताना दहावेळा विचार करावा. अशा प्रकारच्या ब्लॅकमेलिंगला बळी न पडता, पीडितेने ज्याप्रमाणे कायदेशीर मार्ग स्वीकारला, तसेच धाडस इतर पीडितांनीही दाखवणे गरजेचे आहे. पालकांनीही मुलांशी मोकळा संवाद ठेवून त्यांना या आभासी संकटांची जाणीव करुन दिली, तरच अशा विकृत मकरंद गोडगेंना वेळीच लगाम बसेल.

Visits: 6 Today: 6 Total: 1740933

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *