केसापूरचे ग्रामपंचायत सदस्य डोखे ठरले अपात्र जिल्हाधिकार्‍यांचा आदेश; तर भगत यांच्याविरुद्धचा अर्ज नामंजूर


नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील केसापूर ग्रामपंचायतीचे ज्येष्ठ सदस्य गुलाब अण्णासाहेब डोखे यांनी सरकारी जागेत अतिक्रमण केल्याच्या कारणावरून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी त्यांना सदस्यपदी राहण्यास अपात्र ठरविण्यात आल्याचा आदेश दिला. तर महिला सदस्य पती अनिल भगत यांच्याविरूद्ध असलेला विवाद अर्ज नामंजूर केला.

गुलाब डोखे 15 जानेवारी 2021 रोजी झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक एकमधून नागरिकांचा मागास प्रवर्ग या राखीव गटातून निवडून आलेले सदस्य आहेत. त्यांनी ग्रामपंचायत मालकीच्या मिळकतीवर अनाधिकाराने अतिक्रमण केल्याची तक्रार केसापूर येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल भगत यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. या लेखी अर्जावर डोखे यांना म्हणणे सादर करण्याची संधी देत राहुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकार्‍यांकडून अतिक्रमणबाबतचा चौकशी अहवाल प्राप्त करून घेतला होता.
यावर वेळोवेळी युक्तीवाद झाला. गुलाब डोखे यांनी ग्रामपंचायत मालकीच्या पूर्व पश्चिम रस्त्यावर अतिक्रमण केल्याचे स्पष्ट दिसून येते, असा अहवाल गटविकास अधिकार्‍यांनी दिला होता. या बाबीवरून ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 (1) (ज-3) मधील तरतुदीनुसार सदस्य गुलाब डोखे यांना अपात्र ठरविणे उचित ठरत असून भगत यांचा विवाद अर्ज मंजूर करणे क्रमप्राप्त आहे, असा आदेश जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिला. तर दुसर्‍या प्रकरणात गुलाब डोखे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार अर्ज केला होता.

ग्रामपंचायतीच्या 2021 मधील निवडणुकीत आरती अनिल भगत या सर्वसाधारण महिला सदस्यपदासाठी निवडून आल्या असून त्या सद्यस्थितीत उपसरपंच आहेत. त्यांचे पती अनिल बाबासाहेब भगत यांचे एकत्र कुटुंबाने केसापूर ग्रामपंचायतीच्या मालकीच्या मिळकतीवर अनाधिकाराने अतिक्रमण करून त्याठिकाणी बांधकामकेले असल्याचे तक्रारीत म्हटले होते. यामध्ये डोखे, भगत यांचे लेखी म्हणणे, युक्तीवाद व गटविकास अधिकार्‍यांचा अहवाल पाहून अतिक्रमणाबात साशंकता असून गटविकास अधिकार्‍यांचा अहवालही संदिग्ध स्वरूपाचा आहे. तसेच भगत कुटुंबियांनी अतिक्रमण केले असलेबाबत अर्जदार हे सबळ पुराव्यानिशी सिद्ध करू शकले नसल्याने विवाद अर्ज नामंजूर करणे क्रमप्राप्त आहे, असा निकाल जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला.

Visits: 14 Today: 1 Total: 147536

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *