साकूर परिसरातील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत शिवप्रतिष्ठान आक्रमक आठ दिवसांत कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातील साकूर ही मोठी बाजारपेठ आहे. परिसरातील आणि पठारभागातील अनेक गावांचा सतत साकूरशी संपर्क येतो. परंतु, सद्यस्थितीत येथील रस्ते खड्डेमय झाले असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याचबरोबर शेतकर्‍यांना माल वाहतूक करण्यासाठी देखील कसरत करावी लागतते. त्यामुळे येत्या आठ दिवसांत संबंधित विभागाने कार्यवाही केली नाही तर खड्डेमय रस्त्यांवर वृक्षारोपण करुन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवप्रतिष्ठानने प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

याबाबत जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले आहे. यामध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राहुल ढेंबरे यांनी म्हटले आहे की, साकूर ही मोठी बाजारपेठ आहे. यामुळे परिसरातील आणि पठारभागातील गावांचा कायमच साकूरशी संबंधत येतो. मात्र, रणखांब फाटा ते दरेवाडी, साकूर ते नांदूरखंदरमाळ (जांबुत मार्गे), साकूर ते बिरेवाडी फाटा, मांडवे बुद्रुक ते वरवंडी रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. यामुळे प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत धरुन प्रवास तर शेतकर्‍यांना माल वाहतूक करताना कसरत करावी लागत आहे.

त्यामुळे येत्या आठ दिवसांत संबंधित विभागाने यावर कार्यवाही करावी. अन्यथा खड्डेमय रस्त्यांवर वृक्षारोपण करुन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनावर शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राहुल ढेंबरे, संगमनेर तालुका संघटक गणेश श्रीराम, युवा नेते नीलेशजी मनसुख, डॉ.अजित गुळवे यांसह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

Visits: 207 Today: 1 Total: 2057298

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *