अकोले दुय्यम निबंधक कार्यालयात सर्रासपणे लाचखोरी!

नायक वृत्तसेवा, अकोले
जमीन खरेदी-विक्रीपासून, भाडेकरार, जुने दस्त मिळविणे या असंख्य कामांकरिता दुय्यम निबंधक कार्यालयात जाणार्‍या नागरिकांकडून दररोज लाखो रुपयांचा मलिदा उघड-उघड दुय्यम निबंधक कार्यालयांमधून लुटला जात आहे. मात्र, मोठ्या जोखमीच्या आपल्या आर्थिक व्यवहारामध्ये काही त्रुटी काढून आपल्याला त्रास दिला जाईल, या भीतीपोटी तक्रार करायला कुणीच धजावत नसल्याने या लाचखोरांचे चांगलेच फावत चालले आहे. असाच प्रकार अकोलेतही सुरू असून, तत्काळ याची वरीष्ठांनी दखल घ्यावी आणि सर्वसामान्य नागरिकांची या जोखडातून मुक्तता करावी. अन्यथा दुय्यम निबंधक कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा अकोले राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस डॉ.रामहरी चौधरी यांनी दिला आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयामार्फत खरेदी-विक्रीचे व्यवहार पार पाडले जातात. या व्यवहारांमधून शासनाला दररोज लाखो रुपयांचा महसूल मिळतो; त्याचबरोबर येथे कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांचेही खिसे चांगलेच भरले जात आहेत. कार्यालयांबाहेर कार्यरत असलेले त्यांचे निवडक एजंट तसेच वकिलांकडून ते पैसे घेत असतात. एका तक्रारदाराने सांगितले, की दुय्यम निबंधक कार्यालयात होणार्‍या प्रत्येक खरेदी-विक्रीच्या व्यवहारात किमान हजार रुपये अधिकारी लिपिकांना द्यावे लागतात. गुंठेवारीनुसार जमिनीची खरेदी असेल, तर प्रत्येक गुंठ्यामागे 2 हजार रुपये घेतले जातात. कागदपत्रंची गुंतागुंत असेल, तर तो व्यवहार कितीचा आहे त्यानुसार अधिकार्‍याच्या लाचेची रक्कम ठरते. बेकायदेशीर कामे करून देण्यासाठी घेतल्या जाणार्‍या लाचेची रक्कम तर खूपच प्रचंड आहे. तर त्यांना लाच न देता गुंतागुंतीची कामे करणे शक्यच नाही. कारण पुन्हा काम घेऊन त्यांच्याकडे जायचे असते. त्यावेळी ते याचा वचपा काढणार हे गृहीत असते. त्यामुळे त्यांना पैसे द्यावेच लागतात. तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये पै-पै जमा करून घर तसेच जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करीत असतात. इथल्या लाचखोरांना विरोध केला, तर कागदपत्रंमध्ये त्रुटी काढून आपल्याला नाहक त्रास देतील, या भीतीपोटी कुणी त्यांच्याविरुद्ध तक्रार करायला धजावत नाही. यामुळेच लाचखोरी चांगली फोफावली आहे. या प्रकाराची वरीष्ठांनी दखल घेऊन तत्काळ कारवाई करावी. अन्यथा दुय्यम निबंधक कार्यालयाच्या समोर उपोषणास बसण्याचा इशारा अकोले राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस डॉ.रामहरी चौधरी यांनी दिला आहे.

Visits: 107 Today: 1 Total: 1100315

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *