कोपरगावमध्ये लस न घेतलेल्यांवर दंडात्मक कारवाई अचानक तपासणी मोहीम सुरू झाल्याने व्यावसायिकांची उडाली धावपळ

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
शासकीय आदेशानुसार प्रत्येक नागरिकाने करोना प्रतिबंधक लस घेणे बंधनकारक असताना काही बेफिकीर नागरिकांना अजूनही या गोष्टीचे गांभीर्य लक्षात येत नसल्याने तहसीलदार विजय बोरुडे यांनी बुधवारी (ता.15) सायंकाळी प्रत्यक्ष शहरातील बाजारपेठेत जाऊन आस्थापना मालक, कामगार व बाजारपेठेतील नागरिकांनी लसीकरण केले आहे की नाही याची पाहणी करत मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई केल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ झाली आहे.

कोरोना महामारीसोबतच अवघ्या जगात ओमिक्रॉन या नव्या संसर्गजन्य आजाराने डोके वर काढले आहे. यातून बचावासाठी सध्या तरी लसीकरण हाच एकमेव उपाय असल्याने प्रत्येक नागरिकाने लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक असताना अजूनही काही बेफिकीर नागरिकांना याचे गांभीर्य लक्षात येत नसल्याने तहसीलदार विजय बोरुडे, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या पथकाने शहरातील आस्थापनांत जाऊन त्या आस्थापनाच्या मालकांची, कामगारांची व तेथे खरेदी करायला आलेल्या ग्राहकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहे की नाही याची प्रत्यक्ष प्रमाणपत्र पाहत पाहणी केली.

यावेळी आस्थापनातील कामगारांनी लस घेतलेली नसेल तर त्या कामगारास 500 रुपये दंड तर दुकान मालकास 10 हजार रुपये प्रमाणे कारवाई करण्यात आली. तसेच मास्क न वापरणार्या नागरिकांकडून 500 रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली. दरम्यान, अचानकपणे लसीकरण तपासणी मोहीम सुरू केल्याने दुकान मालक, कामगार व ग्राहकांची मोठ्या प्रमाणात धावपळ झाली. यावेळी तहसीलदार विजय बोरुडे, शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास घोलप, सहाय्यक पोलीस निरीक्षक दाते, कामगार तलाठी ठेंगडे आदिंसह महसूल, पोलीस अधिकार्यांसह मोठ्या प्रमाणात शासकीय अधिकारी या मोहिमेत सहभागी झाले होते.
