संगमनेरातील आणखी एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग! नागरिकांनी चोपला; पोलिसांनी पोक्सो लावून गजाआड घातला..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
अवघ्या चौदा वर्ष वयाच्या लहान मुलीला प्रेमजाळ्यात फसवणार्‍या विकृताला मनसोक्त तुडवून पोलिसांच्या हवाली करण्याचा प्रकार ताजा असतांनाच आता शहरातून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात एका खासगी कुशन दुकानात काम करणार्‍या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणार्‍या आणि तिला रस्त्यात अडवून सोबत चालण्याची गळ घालणार्‍या एका विकृताला संगमनेरकरांनी बेदम चोपून काढले. त्यानंतर अर्धमेल्या अवस्थेत त्याला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पीडित मुलीच्या तक्रारीवरुन त्याच्यावर विनयभंगासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमान शब्बीर सय्यद असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.


याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार शहरालगतच्या उपनगरात राहणारी साडेसतरा वर्षाची एक अल्पवयीन मुलगी बारावीच्या परिक्षा संपल्याने नवीन नगर रस्त्यावरील एका खासगी कुशन दुकानात काम करते. गेल्या बुधवारी (ता.26) सदरील मुलगी दुकानातील कामात व्यस्त असतांना आरोपी अमान शब्बीर सय्यद त्या दुकानाच्या समोर आला व वारंवार तेथून चकरा मारीत दुकानातील ‘त्या’ मुलीला हातवारे करु लागला. अचानक सुरु झालेला हा प्रकार पाहुन ती अल्पवयीन मुलगी घाबरली, मात्र त्यावेळी दुकानाचा मालकही असल्याने तिने त्याकडे दुर्लक्ष केले. या दरम्यान त्या विकृताने मुलीकडे पाहता पाहता 15 ते 20 वेळा दुकानासमोर हेलपाटे मारले.


त्याच दिवशी सायंकाळी सातच्या सुमारास दुकान बंद झाल्यानंतर सदरील मुलगी रस्त्याने पायी आपल्या घराकडे जात असतांना त्या विकृताने तिचा पाठलाग करीत नवीन नगर रस्त्यावरील प्रशासकीय भवनाजवळ तिला अडवले. यावेळी घाबरलेल्या त्या मुलीने हिमतीने त्याला विरोध करीत ‘मी तुला ओळखीत नाही, तु कोण आहेस? विनाकारण माझा पाठलाग का करतोस? माझ्या नादाला लागू नकोस’ असे त्याला सांगत निघून जाण्यास सांगितले. मात्र त्यावरही त्याने ‘तु जशी आहेस, तशी मला चालेल’ असे सांगत तिला थांबवण्याचा प्रयत्न केल्याने ती अल्पवयीन मुलगी घाबरली व झपाझप पावलं टाकीत आपल्या नेहमीच्या रस्त्याने घराकडे जावू लागली.


मात्र त्या उपरांतही त्या विकृताने तिचा पाठलाग सोडला नाही आणि विद्यानगरच्या परिसरातील एका किराणा दुकानासमोर पुन्हा त्या मुलीला अडवून सोबत चालण्याचा आग्रह करु लागला. त्यामुळे घाबरलेल्या ‘त्या’ मुलीने सदरचा मुलगा आपल्यास त्रास देत असल्याचे सांगताच त्या किराणा दुकानदाराने हातात काठी घेतली असता तो विकृत तेथून पळून गेला. सदरील मुलीने घरी गेल्यानंतर घडला प्रकार आपल्या आईला व अन्य बहिणींना सांगितला. त्यातून त्यांनी त्या मुलाला विचारणा करण्याचे ठरवले व दुसर्‍या दिवशी गुरुवारी (ता.27) नेहमीप्रमाणे सायंकाळी सातच्या सुमारास ती मुलगी दुकानातून घराकडे निघण्याच्या वेळी तिची आई व मोठी बहिण ‘त्या’ दुकानापासून काही अंतरावर थांबून त्या विकृताची वाट पाहू लागल्या.


सात वाजता दुकान बंद केल्यानंतर ती मुलगी पुढे पुढे आणि तिच्या काहीअंतरावर तिची आई आणि बहिण चालत होते. सदरील मुलगी विद्यानगरमधील काकड रुग्णालयाजवळ आली असता तो विकृत अचानक पाठीमागून प्रकटला. त्याला पाहुन सदरील मुलीने आपल्या बहिणीला फोन करुन पाठीमागून येत असलेला मुलगा तोच असल्याचे सांगताच तिच्या आईने त्याला पकडले. यावेळी बुधवारी त्या मुलीच्या मदतीसाठी धावणारा किराणा दुकानदारही त्यांच्या मदतीला धावला आणि त्याने त्या विकृताला पकडून ठेवले. हा सगळा प्रकार सुरु असतांना तेथे मोठी गर्दी जमा झाल्याने आणि घडला प्रकार ऐकून जमावाचा संताप अनावर झाल्याने जमलेल्या जमावाने त्या विकृताला मनसोक्त चोपले व नंतर शहर पोलिसांच्या स्वाधीन केले.


याप्रकरणी रात्री उशिराने पीडित मुलीने शहर पोलीस ठाण्यात जावून घडल्या प्रकाराबाबत तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी आरोपी अमान शब्बीर सय्यद (रा.कब्रस्थानजवळ, नायकवाडपूरा) याच्या विरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम 354 (ड) सह बालकांचे लैंगिक अत्याचारपासून संरक्षण करणार्‍या कायद्याचे (पोक्सो) कलम 12 नुसार गुन्ह्याची नोंद केली असून आरोपीला गजाआड करण्यात आले आहे. आज दुपारी त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.


संगमनेर शहर पोलीस ठाण्यात निर्भया पथक आणि त्यासाठी स्वतंत्र अधिकारी व वाहनाची सोय असतांनाही मुली व महिलांना सुरक्षितता देण्यात शहर पोलीस पूर्णतः अपयशी ठरल्याचेच आठ दिवसांत घडलेल्या या दोन घटना सांगत आहेत. एकीकडे अधिकारी बदलल्यानंतर शहराचे सामाजिक स्वास्थ उंचावेल अशी अपेक्षा असतांना नव्याने दाखल झालेल्या अधिकार्‍याचे नव्याचे नऊ दिवस संपले आहेत. त्यामुळे शहरातील विविध अवैध व्यवसायांसह कत्तलखानेही आता जोमाने सुरु झाले असून शहरातील वाटचाल पुन्हा एकदा अशांततेच्या दिशेने सुरु झाल्याचे स्पष्ट चित्र सध्या संगमनेरात पहायला मिळत आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी यागोष्टींकडे गांभीर्याने पाहण्याची गरजही आता नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Visits: 27 Today: 1 Total: 114674

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *