ग्रामीण रुग्णालयात लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी! नोंदणी न करताच नागरिक मोठी गर्दी करीत असल्याने वारंवार होतोय गोंधळ..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मंगळवारपासून देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी कोविड प्रतिबंधक लस उपलब्ध झाली असली तरीही जिल्ह्यात मात्र आजपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. काल काही तांत्रिक कारणाने सकाळच्या सत्रात ग्रामीण रुग्णालयातून केवळ चौघांना लस दिल्यानंतर ही मोहीम थांबविण्यात आली होती. आजपासून मात्र ती सुरळीतपणे सुरु झाली असून वृत्त लिहेपर्यंत एकूण 90 जणांचे लसीकरण पूर्ण झाले होते. त्यात 30 ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. अनेक ज्येष्ठ नागरिक आधारकार्ड घेवून थेट ग्रामीण रुग्णालयात दाखल झाल्याने तेथील यंत्रणेचा गोंधळ उडाला होता. प्रत्येकाला समजावून सांगताना रुग्णालयातील कर्मचार्यांच्या अक्षरशः नाकीनऊ आल्याचे चित्रही आज पहायला मिळाले. ग्रामीण रुग्णालयासह तालुक्यातील दहा ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमधूनही लसीकरणाला सुरुवात झाली असून नागरिकांनी नोंदणी करुन त्यांच्या नावाचा स्लॉट उपलब्ध झाल्यानंतरच लसीकरणासाठी येण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप कचेरिया यांनी केले आहे.

देशभरातील कोविड यौद्ध्यांचे लसीकरण सुरु असतांना मंगळवारपासून (ता.1) लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला. त्यात साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसह 45 वर्षांवरील व्याधीग्रस्त व्यक्तिंना ही लस उपलब्ध करुन देण्यात आली. त्यासाठी आरोग्य विभागाच्या ‘कोविन डॉट जीओव्ही डॉट इन’ या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर आपल्या नावाचा स्लॉट मागवण्यात येतो व निश्चित झालेल्या दिवशी व वेळी ती लस संबंधित केंद्रावर जावून घ्यावी लागते. मात्र मंगळवारी पहिल्यास दिवशी शासनाचे हे संकेतस्थळ कोलमडल्याने लसीकरण मोहीम थांबवावी लागली. त्यातील अडथळे दूर करुन आज (ता.2) जिल्ह्यातील 16 ग्रामीण आणि आठ महापालिका केंद्रांवर लसीकरणाला सुरुवात झाली.

सध्या संगमनेरात ही मोहीम केवळ घुलेवाडीतील ग्रामीण रुग्णालयात व तालुक्यातील दहा ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरु आहे. जिल्ह्यातील 35 खासगी रुग्णालयांनाही ही परवानगी देण्यात आली होती, मात्र त्यातील चार रुग्णालयांकडे अतिदक्षता विभाग नसल्याने उर्वरीत 31 ठिकाणीच लसीकरणाची परवानगी देण्यात आली होती. त्यात संगमनेरातील इथापे मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय, मालपाणी हॉस्पिटल, कुटे हॉस्पिटल, तांबे हॉस्पिटल, धन्वंतरी हॉस्पिटल, अमृतवाहिनी ग्रामीण रुग्णालय, घुलेवाडी या सहा ठिकाणी लस उपलब्ध होणार होती. मात्र आरोग्य विभागाची तांत्रिक क्षमता आणि खासगी रुग्णालयांची अपूर्ण तयारी यामुळे पुढील काही दिवस ही लस केवळ ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध होणार आहे.

मंगळवारी स्थगित झालेले लसीकरण आज सकाळी सुरु होण्यापूर्वीच घुलेवाडीतील ग्रामीण आरोग्य केंद्राबाहेर ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा लागल्या. मात्र त्यातील अनेकजण केवळ आधारकार्ड व अन्य ओळखपत्रे घेवून आल्याने मोठा गोंधळ उडाला. लसीकरणासाठी आधी ‘ऑनलाईन’ नोंदणी करावी लागते, त्यानंतर ठरलेल्या दिवशी व वेळी जावूनच ल घ्यावी लागते याबाबत अनेक ज्येष्ठ नागरिक अनभिज्ञ असल्याचेही यावेळी दिसून आले. त्यांना समजावून सांगतांना रुग्णालय कर्मचार्यांच्या अक्षरशः नाकीनऊ आले होते. वृत्त लिहेपर्यंत घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयातून एकूण 90 जणांचे लसीकरण करण्यात आले होते. त्यात 30 ज्येष्ठ नागरिक तर 45 फ्रंटलाईन वर्कर होते. ग्रामीणभागातील दहा प्राथमिक आरोग्य केंद्रांवरही सकाळपासून नोंदणी करुन लसीकरणा सुरुवात झाली असून झालेल्या लसीकरणाची आकडेवारी मात्र उपलब्ध झाली नाही. मात्र नागरिकांचा उत्साह असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे.

सद्यस्थितीत ग्रामीण रुग्णालय घुलेवाडी येथे आठवड्यातील पाच दिवस (रविवार आणि मंगळवार वगळता) कोविड लीकरण सत्र सुरु असून आज दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 90 लाभार्थ्यांना लसीकरणण करण्यात आले आहे. त्यापैकी 30 ज्येष्ठ नागरिक आहेत. तसेच संगमनेर तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावरही लसीकरण सुरु असून शहरातील पाच खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी देण्यात आली आहे. लसीकरण मोहीमेच्या दुसर्या टप्प्यात 45 ते 60 वयोगटातील आजारी व्यक्ती व 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, वैद्यकीय कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स, संगणकाद्वारे स्वतः नोंदणी करुन वेळापत्रक आणि लसीकरण केंद्र निश्चित करु शकतात. त्यासाठी आरोग्य सेतू या अॅप्लिकेशनमध्ये कोविन अॅपवर उपलब्ध नोंदणी पर्यायावरुन ससूचनांचे पालन करुन नाव नोंदवावे. लीकरणाची तारीख, वेळ व केंद्र निश्चित करुनच लसीकरण केंद्रावर यावे. नोंदणीकृत सर्व लाभार्थ्यांना लस देण्यात येईल.
– डॉ.संदीप कचेरिया
वैद्यकीय अधिकारी : ग्रामीण रुग्णालय, संगमनेर

