सत्ताधार्‍यांत हिंमत असेल तर टोलनाके सुरू करून दाखवा! शिर्डी शिवसेनेचे नगरपंचायत पदाधिकार्‍यांना निवेदनातून आव्हान

नायक वृत्तसेवा, शिर्डी
सत्ताधारी गटात हिंमत असेल तर टोलनाके सुरूच करून दाखवा. शिर्डीची जनता यापुढे तुमचा अत्याचार व दादागिरी खपवून घेणार नाही. अशा प्रकारचे निवेदन बुधवारी (ता.3) शिर्डी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांना शिवसेनेच्यावतीने देण्यात आले.

शिर्डी नगरपंचायतीचे निष्क्रिय पदाधिकारी आपली निष्क्रियता झाकण्यासाठी घरपट्टी, पाणीपट्टी, गाळाभाडे, साईभक्तांकडून टोलच्या नावाखाली कर वसुली करून शिर्डीच्या जनतेला व साईभक्तांना लक्ष्य करून त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहे. शिर्डीच्या नागरिकांनी यापूर्वी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरी आदी नियम 1965 चे कलम 127 अंतर्गत घरपट्टी, पाणीपट्टी, गाळाभाडे कमी करण्यासाठी कायदेशीर हरकती घेऊन विनंती केली होती. मात्र असा कायदाच नाही, आम्हाला अधिकार नाही, राज्य सरकारला प्रस्ताव पाठवला आहे अशी साळसूद भूमिका घेऊन त्याच कायद्याच्या आधारे खोटा पाहणी अहवाल तयार करून हॉटेल, दुकाने व अन्य व्यवसाय सुरू असल्याचे निर्लज्जपणे लेखी कळविले. शिर्डीच नव्हे तर संपूर्ण भारत देश कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असताना शिर्डी नगरपंचायतीच्या सत्ताधार्‍यांना व त्यांच्या नेत्याला शिर्डीत व्यवसाय चालू असल्याचे दिसत आहे. कारण त्यांचे नेते धृतराष्ट्रासारखे सत्तेच्या प्रेमापोटी आंधळे झाले आहेत. शिर्डी नगरपंचायतीचे कर्मचारी घरोघरी जाऊन सक्तीची कर वसुली करीत आहे. कर वसुली बरोबर दंड व व्याजआकारण्यात येत आहे. या सक्तीच्या वसुलीमुळे नागरिकांना आत्महत्येची वेळ आली आहे.

साईनगरीवरील अत्याचार करून भागले नाही म्हणून 2 मार्च, 2021 रोजी खोटी सर्वसाधारण सभा घेऊन साईभक्तांवर टोलनाक्याच्या माध्यमातून कर वसुली करण्याचा प्रयत्न सत्ताधारी करीत आहेत. मात्र अशी सभाच झालेली नाही कारण या सभेला 6 (सहा) निवडून आलेले व 2 (दोन) स्वीकृत सदस्य उपस्थित होते. हे जर खोटे असेल तर सत्ताधार्‍यांनी या सभेची चित्रफीत शिर्डीकरांना दाखवावी. गैरहजर असलेल्या नगरसेवकांच्या खोट्या सह्या घेऊन लुटमारीचा निर्णय घेण्यात आला. या ना त्या मार्गाने पैसे वसूल करणे एवढाच सत्ताधारी व त्यांचे नेते यांनी एकमेव निर्णय घेतला आहे. या प्रवृत्तीचा शिवसेनेच्यावतीने निषेध करण्यात आला आहे. त्यामुळे सत्ताधारी गटात हिंमत असेल तर टोलनाके सुरूच करून दाखवा. शिर्डीची जनता यापुढे तुमचा अत्याचार व दादागिरी खपवून घेणार नाही, असे या निवेदनात शिवसेनेने म्हटले आहे. याप्रसंगी शिवसेनेच्यावतीने कमलाकर कोते, संजय शिंदे, सचिन कोते, राहुल गोंदकर, सुनील बारहाते, विरेश गोंदकर, राजेंद्र कोते, नवनाथ विश्वासराव, अनिल पवार, चंद्रकांत गायकवाड, मच्छिंद्र गायके, सोमनाथ महाले, अमर गायकवाड, हरिराम रहाणे, प्रकाश भालेराव, सहदेव बढे, दत्तात्रय भालेराव, अक्षय तळेकर, सुयोग सावकारे, विशाल बागुल, वसीम शेख, सलीम तांबोळी, शुभम पठारे, मयूर शेर्वेकर आदी उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने नीलेश कोते, रमेश गोंदकर, सुधाकर शिंदे आदी उपस्थित होते.

Visits: 11 Today: 1 Total: 82760

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *