काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करा! शिर्डी भाजप युवा मोर्चाची पोलिसांकडे निवेदनातून मागणी

नायक वृत्तसेवा, शिर्डी
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची भाषा वापरणारा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. ठिकठिकाणी त्यांच्याविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. शिर्डी शहर भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष योगेश गोंदकर यांनी देखील नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनातून पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे. दरम्यान गुन्हा दाखल न केल्यास भाजयुमोच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही गोंदकर यांनी दिला आहे.

यावेळी बोलताना गोंदकर म्हणाले, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अत्यंत चुकीचे विधान केले आहे. असे केवीलवाणे प्रयत्न नाना पटोले सतत करत असतात. यापूर्वी देखील देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल चुकीचे विधान केले होते. त्यामुळे अशाप्रकारे विधान करून प्रसिद्धी झोतात येण्याचे काम पटोले हे करत असतात. या विधानाचा शिर्डी शहर भाजयुमोच्यावतीने निषेध करून भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील व जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या सूचनेनुसार प्रदेश सदस्य किरण बोराडे यांच्या उपस्थितीत व शिर्डी शहराध्यक्ष योगेश गोंदकर यांच्या नेतृत्वात मंगळवारी (ता.18) सकाळी शिर्डी पोलिसांना निवेदन देण्यात आले.

यावेळी युवा मोर्चाचे शिर्डी शहर उपाध्यक्ष प्रसाद शेलार, ओबीसी मोर्चाचे तालुका सरचिटणीस योगेश बढे, सचिव प्रशांत थोरात, हितेश मोटवाणी, अक्षय मुळे, सोशल मीडिया प्रमुख सागर जाधव, सहसोशल मीडिया प्रमुख विशाल पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान आपल्या वक्तव्याने वाद वाढल्यानंतर नाना पटोले यांनी यावर स्पष्टीकरण देताना मी गावगुंड असलेल्या मोदीबद्दल बोललो होतो, असे म्हटले आहे. काही नागरिक आमच्या परिसरातील मोदी नावाच्या गावगुंडाची तक्रार घेऊन आले होते. त्यांना तुम्ही घाबरु नका. मी तुमच्या सोबत आाहे. मोदीला मी मारु शकतो, शिव्या देऊ शकतो असे म्हटले. मी कुठेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. माझ्या बोलण्याचा विपर्यास केला जात आहे असे पटोले म्हणाले.
