संगमनेर तालुक्यातील कोविडचा आलेख उंचावलेलाच! आजही शहरातील अकराजणांसह बत्तीस जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील कोविडची स्थिती उंचावलेलीच असून दररोज त्यात सातत्याने भर पडत आहे. त्यामुळे तालुक्यातील बाधितांचा आकडा झपाट्याने सात हजारांच्या जवळ पोहोचला आहे. रात्री उशीराने प्राप्त झालेल्या अहवालातून मंगळवारच्या रुग्णसंख्येत आणखी 32 जणांची भर पडल्याने काल सापडलेल्या एकूण रुग्णांची संख्या आता 54 झाली आहे. यातील एकूण बाधितांमधील केवळ 293 रुग्णांवर सध्यावर उपचार सुरू आहेत. गेल्या पंधरवड्यापासून कोविडचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा भरात आला असून दररोज मोठ्या संख्येने रुग्ण समोर येत असल्याने तालुक्यातील कोविडची स्थिती पुन्हा एकदास बिकट होत चालली आहे.

निर्बंध झुगारुन कृती करण्याची मानसिकता बाळगणार्या काहींच्या प्रतापामुळे संपुष्टात आलेल्या कोविडच्या संक्रमणाला पुन्हा चेतवण्याचे काम केले. 17 फेब्रुवारीनंतर तालुक्यातील संक्रमणात अचानक वाढ झाल्याचे निरीक्षण यातून समोर येत असून या कालावधीत शहरासह ग्रामीणभागात झालेले काही कार्यक्रम कारणीभूत असल्याचेही समोर येत आहे. विशेष म्हणजे यापूर्वी निर्बंध झुगारुन झालेल्या अशा कार्यक्रमातून केवळ उपस्थितांना बाधा झाल्याचे समोर आले होते. यावेळच्या कोविडने मात्र आपला पवित्रा बदलताना ‘यजमानांनाही’ झपाटल्याचे दिसून येत आहे.

मंगळवारी रात्री उशीराने प्राप्त झालेल्या खासगी प्रयोग शाळेच्या 31 आणि रॅपिड अँटीजेन चाचणीच्या एका अहवालातून बत्तीस रुग्ण समोर आले आहेत. त्यात शहरातील अकरा तर ग्रामीणभागातील 21 जणांचा समावेश आहे. शहरातील इंदिरानगर परिसरातील 46 वर्षीय इसम, श्रीराम नगरमधील (गुंजाळवाडी हद्द) 47 वर्षीय इसम, वकील कॉलनीतील 47 वर्षीय इसम, साईनगरमधील 18 वर्षीय तरुण, अकोले बायपासवरील 17 वर्षीय तरुण, गणेश नगरमधील 65 वर्षीय महिलेसह 36 वर्षीय तरुण, कोष्टी गल्लीतील 48 वर्षीय इसम, अभिनव नगरमधील 71 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, घोडेकर मळ्यातील 65 वर्षीय महिला व भारतनगरमधील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक संक्रमित झाले आहेत.

तर ग्रामीणभागातील अकलापूर येथील 70 वर्षीय महिला, घुलेवाडी येथील 41, 32 व 31 वर्षीय तरुण, वेताळ मळा येथील 34 वर्षीय तरुण, निमगाव टेंभी येथील 81 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, जोर्वे येथील 57 वर्षीय इसम, चिखली येथील 66 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, डोळासणे येथील 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 26 वर्षीय महिला, 9 वर्षीय बालिका व आठ वर्षीय मुलगा, वडगाव लांडगा येथील 74 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 17 वर्षीय तरुणी व 16 वर्षीय तरुण, वरुडी पठार येथील 58 वर्षीय महिला, निमोण येथील 71 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, चिंचपूर येथील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 27 वर्षीय महिला आणि कोल्हेवाडी येथील 59 वर्षीय इमाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे संगमनेर तालुका आता सात हजार रुग्णसंख्येच्या उंबरठ्यावर पोहोचला असून आजची बाधित संख्या 6 हजार 982 झाली आहे.

गेल्या पंधरवड्यापासून वाढत चाललेल्या तालुक्यातील कोविड स्थितीला नियमांना तिलांजली देवून झालेले काही लग्न सोहळे आणि अन्य कार्यक्रम कारणीभूत आहेत. विवाह सोहळ्यांसाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पन्नास पेक्षा अधिक गर्दी जमा करता येत नाही. मात्र काही असंवेदनशील व्यक्तिंना कोविडच्या धोक्याकडे दुर्लक्ष करुन आपल्या मुला-मुलींच्या कार्यात शेकडोंची गर्दी केल्याने तालुक्यात पुन्हा कोविडचा उद्रेक झाला. दररोजच्या सरासरीत त्याचा थेट परिणाम दिसून येत असल्याने नागरिकांनीही संबंधापेक्षा जीवाचा अधिक विचार करण्याची वेळ आल्याची स्थिती आज निर्माण झाली आहे.

आवश्यकता असेल तरच गर्दीच्या ठिकाणी जावे, तोंडावर मास्क असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, सामाजिक अंतराचे सर्वत्र कटाक्षाने पालन करावे, वारंवार हात स्वच्छ धुवावेत अशा सूचना गेल्या वर्षभरापासून शासन, प्रशासन, माध्यमं आणि सामाजिक संस्था देत आहेत. मात्र भारतीय मानसिकता त्यातून कोणताही बोध घ्यायलाच तयार नसल्याने पालिका व पोलीस प्रशासनाला दररोज अनेकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्याची वेळ आली आहे, मात्र कारवाई होवूनही माणसं सुधरण्याचे नाव घेत नसल्याने यंत्रणेतील घटकांकडून आश्चर्यही व्यक्क्त होत आहे.

