आरोग्य विषयक सर्वेक्षण करताना कामाचा दर्जा आणि गुणवत्ता आवश्यक : जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी

नायक वृत्तसेवा, अहमदनगर

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेने आता व्यापक गती घेतली असून जिल्ह्यातील कोरोनादूत प्रत्येक कुटुंबांना भेटी देऊन त्यातील सदस्यांची तपासणी करीत आहेत. मात्र, ही मोहिम राबविताना गतिमानते सोबतच कामाचा दर्जा आणि गुणवत्ता याकडे प्रत्येक तालुकास्तरीय यंत्रणांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले.

जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे तालुकास्तरीय यंत्रणांशी संवाद साधून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके आदी यावेळी उपस्थित होते. तालुकास्तरावरुन सर्व तालुका आरोग्य अधिकारी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी यामध्ये सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना द्विवेदी म्हणाले की, आरोग्य पथक घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबांची माहिती घेत आहेत. मात्र, ही माहिती केवळ गणनेच्या स्वरुपात होता कामा नये. त्यातून जिल्ह्याचे आरोग्यविषयक चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे ही माहिती अधिक काळजीपूर्वक घेण्याची गरज आहे. विशेषता कुटुंबातील सदस्यांना असणारे आजार, जाणवत असलेले त्रास तसेच ज्येष्ठ नागरिकांना असणार्‍या आरोग्यविषयक तक्रारी आदींची विस्तृत माहिती यामध्ये अपेक्षित आहे. त्याचबरोबर, सारीची लक्षणे असणार्‍या रुग्णांना कोविड चाचणीसाठी संदर्भित करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

बहुतांश तालुक्यांनी ऑफलाईन सर्वेक्षणाचे काम जवळपास पूर्ण करत आणले आहे. मात्र, हे काम पोर्टलवर माहिती भरल्यानंतरच त्याचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे ही माहिती भरण्यास यंत्रणांनी प्राधान्य दिले पाहिजे. कामाची गतिमानता आणि गुणवत्ता या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. आरटीपीसीआर चाचणी आणि रॅपिड अँटीजेन चाचण्यांच्या माध्यमातून तालुकास्तरावर तपासण्या होत आहेत. त्यातून निष्पन्न झालेल्या रुग्णांची नोंद या अहवालात प्रतिबिंबीत होताना दिसत नाही. त्यामुळे अधिक काळजीपूर्वक आरोग्य विषयक सर्वे होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

तालुकास्तरावर आरोग्य यंत्रणेने कामाच्या आणि माहिती अपलोड करण्याच्या बाबतीत काही ठिकाणी चांगले काम झाले आहे. असेच काम प्रत्येकाकडून होणे अपेक्षित आहे. जिल्ह्यात सतराशेहून अधिक पथकांच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबांना भेट देऊन आपण आरोग्यविषयक माहिती संकलित करत आहोत. आता या कामात वेग आणि गुणवत्ता दोन्ही अपेक्षित आहेत. गेले सहा महिने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा काम करत आहे. कामाचा हाच वेग या मोहिमेत कायम ठेवावा. जिल्ह्यात कोरोनाची लक्षणे जाणवणार्‍या रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी चाचण्यांची संख्या अजून वाढविण्याची गरज आहे. सर्वेक्षणा दरम्यान लक्षणे जाणवणार्‍या व्यक्तीपर्यंत पोहोचून त्यांची चाचणी करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोलताना सांगितले. 

Visits: 130 Today: 1 Total: 1427187

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *