अंबडमधील सुतारदरा परिसरात प्रेमीयुगुलाची आत्महत्या

अंबडमधील सुतारदरा परिसरात प्रेमीयुगुलाची आत्महत्या
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील अंबड गावातील सुतारदरा परिसरात एक प्रेमीयुगुल शिसवाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले आहे. सदर घटना रविवारी (ता.8) दुपारी चार वाजेच्या सुमारास निदर्शनास आली. याबाबत अकोले पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्रेमीयुगुलातील युवकाची ओळख पटली आहे.

रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास गावातील मुले सुतारदरा परिसरात सीताफळे तोडण्यास गेली असता त्यांना शिसवाच्या झाडाला एक पुरूष व स्त्रीचे मृतदेह फाशी घेतलेल्या अवस्थेत लटकलेले आढळून आले. त्यांनी ही खबर गावातील लोकांना सांगितली. अंबडचे सरपंच दत्तू कानवडे व पोलीस पाटील भाऊसाहेब कानवडे यांनी घटनास्थळी जात पाहणी करून अकोले पोलिसांना खबर दिली. पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांनी घटनास्थळी येऊन मृतदेह खाली उतरवत पंचनामा केला. दोघांचेही मृतदेह अर्धवट कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटविण्यात अडचणी येत होत्या. तथापि, रात्री उशिरा युवकाची ओळख पटविण्यात यश आले असून अमोल भोरू कातोरे (वय 22) हा युवक गावातीलच रहिवासी आहे. ही घटना साधारण एक आठवड्यापूर्वी घडलेली असावी असा कयास असून सदर जागा निर्मनुष्य असल्याने कोणाच्याही लक्षात ही बाब आली नाही. यातील युवतीची ओळख पटविण्यात येत असून हा युवक गावातील असूनही त्याच्या गायब असण्याची तक्रार पोलिसांत देण्यात आलेली नव्हती. तसेच घटनास्थळी त्याला कोणीही ओळखले नाही. त्यामुळे पोलिसांना या घटनेचा विविध अंगांनी तपास करावा लागणार आहे.

 

Visits: 8 Today: 1 Total: 118226

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *