अकोलेत अंगणवाडी कर्मचार्यांचे मोबाईल वापसी आंदोलन सीटू कामगार संघटनेचा पुढाकार; बालकल्याण विभागाचा केला निषेध

नायक वृत्तसेवा, अकोले
अंगणवाडी कर्मचार्यांना राज्य सरकारच्यावतीने वितरित करण्यात आलेले मोबाईल सदोष असून अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत. शासनाने निर्धारित केलेले कोणतेही काम या मोबाईलच्या साह्याने करणे अशक्य आहे. राज्यभर अशाच प्रकारचे निकृष्ट दर्जाचे मोबाईल वितरित करण्यात आल्यामुळे अंगणवाडी कर्मचार्यांमध्ये या विरोधात मोठा असंतोष होता. सीटू प्रणित अंगणवाडी कर्मचारी संघटनेने हे मोबाईल राज्य सरकारला परत करण्याचा निर्णय घेतला होता. राज्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार अकोले तालुक्यामधील अंगणवाडी कर्मचार्यांनी मंगळवारी (ता.24) सीटू कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली शहरातून मोर्चा काढत, वाजत गाजत हे सदोष मोबाईल राज्य सरकारला परत केले.

सीटू प्रणित अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात शेकडो अंगणवाडी कर्मचारी एकत्र आले होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयापासून मोर्चा काढत या सदोष मोबाईलची अंगणवाडी कर्मचार्यांनी वाजत-गाजत धिंड काढली. शहरातून मोर्चाने अंगणवाडी कर्मचारी पंचायत समिती कार्यालयात धडकले. जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या भ्रष्टाचाराचा धिक्कार करण्यात आला. अंगणवाडी कर्मचार्यांना सदोष मोबाईल देणार्या बालकल्याण विभागाचाही यावेळी निषेध करण्यात आला. सदोष मोबाईल परत घ्या, अंगणवाडी कर्मचार्यांवर कामाचा अतिरिक्त बोजा टाकणे बंद करा, अंगणवाडी कर्मचार्यांना सरकारी नोकरीत कायम करा, किमान पंधरा हजार रूपये हक्काचे वेतन द्या, डाटा एंट्रीसाठी स्वतंत्र कर्मचार्यांची नेमणूक करा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

या आंदोलनाचे नेतृत्व अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे गणेश ताजणे, आशा घोलप, रंजना पर्हाड, अक्काबाई देशमुख, माधुरी वाकचौरे, मंगला शिरसाठ, निर्मला मांगे, आशा पिचड, आशा कांडेकर, रोशनी शिंगोटे, मालती गोसावी, इंदुमती चांदगीर आदिंनी केले. किसान सभेचे डॉ. अजित नवले व सीटू कामगार संघटनेच्या जुबेदा मणियार, आराधना बोराडे, प्रतिभा कुलकर्णी, संगीता साळवे आदिंनी मोर्चास पाठिंबा व्यक्त केला.
