‘अमृतसागर’ दूध संघाकडून साडेपाच कोटी बँकेत वर्ग ः पिचड

‘अमृतसागर’ दूध संघाकडून साडेपाच कोटी बँकेत वर्ग ः पिचड
उत्पादकांसह कामगारांची दीपावली गोड करण्याचा प्रयत्न
नायक वृत्तसेवा, अकोले
येथील अमृतसागर दूध संघाकडून उत्पादकांना प्रतिलिटर एक रुपया रिबेट देण्यात आले असून संघाच्या सर्व कर्मचार्‍यांना सरसकट दोन हजार रुपये प्रतिमाह पगारवाढ व पंधरा टक्के दीपावली बोनस देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. त्यामध्ये दुधभाव फरक 2.44 कोटी, दूध पेमेंट 2.50 कोटी, कर्मचारी बोनस पगार 35 लाख, व्यापारी देणे 10 लाख असे साडेपाच कोटी रुपये बँकेत वर्ग करण्यात आले असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष तथा माजी आमदार वैभव पिचड यांनी दिली.

अमृतसागर दूध संघाच्या संचालक मंडळाची बैठक संघाच्या कार्यालयात पिचड यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली, त्यावेळी वरील निर्णय घेण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, गोरक्ष मालुंजकर, विठ्ठल डुंबरे, विठ्ठल चासकर, शरद चौधरी, भाऊपाटील नवले, सोपान मांडे, रामदास आंबरे, सुभाष बेनके, प्रवीण धुमाळ, रवींद्र हांडे, नंदा कचरे, रेखा नवले, कार्यकारी संचालक डॉ.सुजीत खिलारी आदी उपस्थित होते.

याविषयी अधिक बोलताना पिचड म्हणाले, अकोले तालुक्यात 21 मार्च, 2020 पासून कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशामध्ये टाळेबंदी घोषित करण्यात आले त्याचा परिणाम सर्व व्यवसायांवर छोट्या-मोठ्या प्रमाणावर झाला. परंतु सर्वाधिक फटका दूध उत्पादकांना अथवा शेतकर्‍यांना सहन करावा लागला. 32 ते 33 रुपये प्रतिलिटर दूध खरेदीचे दर अचानक कमी होऊन 20 ते 25 रुपयांपर्यंत खाली आले. कारण बाजारातील सर्व दुकाने, हॉटेल्स, रेस्टारंट, छोटेमोठे चहाचे दुकाने बंद असल्यामुळे दुधाच्या मागणीमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात घट झाली. परंतु दूध उत्पादनमध्ये घट न होता सातत्य टिकून राहिले. अशा परिस्थितीत खाजगी दूध भुकटी प्रकल्पधारक देखील दूध स्वीकारण्यास नकार देत असत. परिणामी संघास 31 मार्च रोजी नाईलाजास्तव दूध संकलन बंद ठेवावे लागले. नंतर महाराष्ट्र शासनाने 07 एप्रिल, 2020 पासून दूध खरेदी सुरु केली. परंतु शासनाने संघास फक्त 20 हजार लिटर दुधास कोटा दिला व त्यास 26 रुपये दर दिला. तर संघास दूध संकलनास 25 रुपये दर उत्पादकांना देणे बंधनकारक केले. त्याचवेळेस संघ उर्वरीत 40 हजार लिटर दूध 22 ते 23 रुपये प्रतिलिटर प्रमाणे विक्री करत होता. म्हणजेच संघ 3 ते 4 रुपये प्रतिलिटर तोटा सहन करुन उत्पादकांना 25 रुपये दर अदा करत होता. अशा परिस्थितीत खाजगी प्रकल्पधारक मात्र दूध उत्पादकांकडून 20 ते 21 रुपये प्रतिलिटर प्रमाणे दूध खरेदी करत होते व कमी दरात खरेदी केलेले दूध बाजारामध्ये संघाच्या खरेदी दरापेक्षाही कमी दराने विक्री करत होते. त्यामुळे संघास देखील विक्री दरामध्ये कपात करावी लागली.

या सर्वांचा परिणाम म्हणून 4 महिन्यांमध्ये (एप्रिल ते जुलै 2020) संघाने 2 ते 2.5 कोटी रुपये उत्पादकांना देवून तोटा सहन करत शासन नियमाप्रमाणे 25 रुपये प्रतिलिटर दूध खरेदी दर अदा केला आहे. परंतु खासगी दूध व्यावसायिकांनी मात्र त्यांच्या मनमानीप्रमाणे दूध खरेदी करुन उत्पादकांना सरासरी 3 से 4 रुपये प्रतिलिटर दर कमी दिलेला आहे. परिणामी संघात टाळेबंदीच्या परिस्थितीमध्ये 15 ते 20 हजार लिटर दूध संकलनाची वाढ झाली. संघ नेहमीच दूध उत्पादकांच्या हिताचे निर्णय घेत आलेला आहे. यापुढे देखील दूध उत्पादकांना न्याय देण्याचा निश्चित प्रयत्न करेल. तसेच दूध संघ उत्पादकांसाठी पशुवैद्यकीय सेवा कमी दरामध्ये उपलब्ध करुन देत आहे. तालुक्यामध्ये शासना व्यतिरिक्त कोणत्याही प्रकल्पाची पशु वैद्यकीय सेवा उपलब्ध नाही. किंवा कोणत्याही खासगी प्रकल्पांची पशु वैद्यकीय सेवा सुविधा तालुक्यात नाही. याचा देखील उत्पादकांनी विचार करावा. तालुक्यामध्ये 25 ते 30 वर्षांपासून संघ जिल्हा सहकारी बँक, आय.सी.आय.सी.आय. बँक, यूनियन बँक, एच.डी.एफ.सी. बँक तसेच जनलक्ष्मी पतसंस्था व दूधगंगा पतसंस्था यांचे माध्यमातून दुधाळ गाय खरेदीसाठी व संगोपनासाठी कर्ज उपलब्ध करने देत आहे. दूध निर्मितीचे व उत्पादनाचे काम सातत्याने संघ राबवित आहे. आज देखील जिल्हा बँकेच्या माध्यमातून प्रतिगाय 15 हजार रुपये बँकेच्या नियमानुसार लाभार्थी वाटप चालू आहे. तसेच किसान क्रेडीट कार्ड माध्यमातून दुधाळ गाय संगोपनासाठी उत्पादकांना आजपर्यंत तालुक्यामध्ये 1 कोटी 58 लाख रुपये मंजूर झालेले असून वाटप चालू आहे. तसेच दूध उत्पादन वाढीसाठी शॉर्टेड सिमेसचा प्रयोग अल्पावधीतच तालुक्यामध्ये राबविण्याचा मानस आहे. अहवाल सालामध्ये संघ आरकेव्हीवाय अंतर्गत 20 टनी दूध भुकटी प्रकल्प उभारण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतलेला आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक लाभ होणार आहे. तरी उत्पादकांनी संघास जास्तीत जास्त दूध पुरवठा करून सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष पिचड यांनी केले आहे.

 

Visits: 11 Today: 1 Total: 117396

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *