खुशखबर! रॅपिड अँटीजेन चाचण्यातून रुग्ण समोर येण्याची गती सहा टक्क्यांवर!! सव्वादोनशे जणांच्या चाचणीतून शहरातील सहा जणांसह एकूण चौदा जणांचे निष्कर्ष सकारात्मक..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येपासून शहरापाठोपाठ ग्रामीणभागातील रुग्णवाढीला लागलेली ओहोटी कायम आहे. दररोजच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे तालुक्यातील नागरिक दहशतीखाली असतांना गेल्या काही दिवसांपासून दिलासादायक चित्र दिसत असल्याने तालुक्यात काहीसे समाधानकारक वातावरण निर्माण झाले आहे. आज दररोजच्या वेळेपूर्वीच रॅपिड अँटीजेन चाचणीचे निष्कर्ष अहवाल हाती लागले असून त्यातून संगमनेरकरांना दिलासा मिळण्याची श्रृंखला अव्याहत असल्याचे मासेा आले आहे. या अहवालातून एकूण चौदा जणांची स्राव चाचणी सकारात्मक आली आहे. त्यात शहरातील सहा तर ग्रामीणभागातील आठ जणांचा समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने संगमनेर तालुका चार हजार रुग्णसंख्येच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकताना 3 हजार 963 वर पोहोचला आहे.
आज प्राप्त झालेल्या रॅपिड अँटीजेन चाचणीच्या निष्कर्षातून संगमनेर शहरातील मालदाड रोड परिसरात एक्कादुक्का रुग्ण सापडण्याची श्रृंखला कायम असल्याचे दिसून आले आहे. त्या भागातील 65 वर्षीय महिलेसह 47 वर्षीय इसम, इंदिरानगरमधील 30 वर्षीय महिलेसह पाच वर्षीय बालक, गणेशनगरमधील 49 वर्षीय इसम व पंपींग स्टेशन परिसरातील 38 वर्षीय तरुणाचा अहवाल सकारात्मक आला आहे. त्यामुळे शहराची एकूण रुग्णसंख्या 1 हजार 141 झाली आहे. त्यातील केवळ 47 रुग्ण सक्रीय संक्रमित असून आत्तापर्यंत बाराजणांचे बळी गेले आहे.
त्यासोबतच आज ग्रामीणभागातील आठ जणांचे चाचणी निष्कर्षही सकारात्मक आले असून सारोळे पठार, जोर्वे व पेमगिरीतून पुन्हा रुग्ण समोर आले आहेत. आजच्या अहवालातून शेडगाव येथील 41 वर्षीय तरुण, अंभोरे येथील बारा वर्षीस मुलगा, खळी येथील 38 वर्षीय महिला, सारोळे पठार येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 19 वर्षीय तरुण, वडगाव लांडगा येथील 56 वर्षीय इसम, जोर्वे येथील 40 वर्षीय तरुण व पेमगिरी येथील 38 वर्षीय तरुणाचा चाचणी निष्कर्ष संक्रमित प्राप्त झाला आहे. ग्रामीण भागातील रुग्णवाढीत आज आठ रुग्णांची भर पडल्याने ग्रामीण रुग्णसंख्या 2 हजार 822 वर पोहोचली आहे. त्यातील केवळ 142 रुग्ण सक्रीय संक्रमित आहेत, तर आजवर 28 जणांचा बळी गेला आहे.
आज संगमनेर शहरासह तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून 227 जणांचे स्राव घेवून ते रॅपिड अँटीजेन प्रणालीद्वारे तपासण्यात आले. सर्वात दिलासादायक बाब म्हणजे या चाचण्यांमधून अवघ्या 6.11 टक्के वेगाने चौदा जणांचे निष्कर्ष सकारात्मक (पॉझिटिव्ह) तर तब्बल 213 जणांचे निष्कर्ष नकारात्मक (निगेटिव्ह) आले आहेत. आतत्तापर्यंत सरासरी 20 ते 22 टक्के दराने रुग्ण समोर येत असतांना आज रॅपिड अँटीजेन चाचण्यांच्या सरासरीत मोठी घट झाल्याने संगमनेरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आजच्या दिवसातील आणखी एक समाधानकारक बाब म्हणजे शहर व तालुक्यातील रुग्ण बरे होण्याची टक्केवारी दररोज वाढत असून आज ती तब्बल 94.22 टक्क्यावर पोहोचली आहे. आज अखेर शहरासह तालुक्यातील 151 गावे कोविड संक्रमित झाली असून त्यासाठी 19 हजार 351 चाचण्या केल्या आहेत. त्यात सर्वाधीक 12 हजार 869 चाचण्या रॅपिड अँटीजेन प्रणालीद्वारा, 3 हजार 980 चाचण्या शासकीय प्रयोगशाळेद्वारा तर 2 हजार 502 चाचण्या खासगी प्रयोगशाळेद्वारा करण्यात आल्या आहेत. या सर्व चाचण्यांमधून सरासरी रुग्ण समोर येण्याची गती 20.47 टक्के आहे.