पाणलोटातील पावसाने विश्रांती घेतल्याने नदीतील विसर्ग घटवला! चोवीस तासांत पाणलोट क्षेत्र निरंक; भंडारदरा-निळवंडेचा विसर्ग आला निम्म्यावर
नायक वृत्तसेवा, अकोले
गेल्या पंधरवड्यापासून मुळा, प्रवरा व कृष्णवंती नदीच्या खोर्यात बरसत असलेल्या तुफान जलधारांनी बुधवारपासून विश्रांती घेतली आहे. त्यामुळे भंडारदरा व निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात सोडण्यात येत असलेला विसर्ग निम्म्याहून अधिक कमी करण्यात आल्याने प्रवरेची फुगलेली पाणीपातळी खालावली आहे. कालच्या दिवसभरात घाटघर, रतनवाडीसह पाणलोटातील सर्वच भागातील पाऊस पूर्णतः थांबला असून धरणातील पाण्याची आवकही मंदावली आहे. मात्र सलग पंधरा दिवस कोसळणार्या पावसाने उत्तरेतील भंडारदरा व निळवंडे ही दोन्ही धरणं तुडूंब होण्याच्या स्थितीत तर मुळा धरण 75 टक्क्यांवर पोहोचवले आहे.
अकोले तालुक्यातील धरणांच्या पाणलोटात वेळेत दाखल होणार्या मान्सूनचे यंदा विलंबाने आगमन झाले. त्यातही सुरुवातीच्या कालावधीत जेमतेम कोसळणार्या पावसाने चिंता वाढवली होती. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून मान्सूनने पाणलोटातील संपूर्ण क्षेत्र व्यापताना तुफान जलधारा बरसवण्यास सुरुवात केल्याने जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळा, भंडारदरा व निळवंडे या तिनही मोठ्या धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होवू लागली. जुलैतच पावसाचा झंझावात सुरु झाल्याने गेल्या आठवड्यात 90 टक्क्यांवर पोहोचलेल्या भंडारदर्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला, त्यामुळे निळवंडे धरणाचा पाणीसाठाही झपाट्याने वाढल्याने प्रवरानदी दुथडी भरुन वाहू लागली.
या दरम्यान आढळा व म्हाळुंगी नद्यांच्या खोर्यातही पावसाला जोर चढल्याने जेमतेम पावसाचे पाणलोट असतानाही ही दोन्ही जलाशये जुलैतच तुडूंब झाली. त्याचा परिणाम प्रवरानदीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने त्यातून जायकवाडी धरणातही मोठ्या प्रमाणात पाणी दाखल झाले. लाभक्षेत्रातही आत्तापर्यंत बहुतेक ठिकाणी समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी राजा सुखावला. एकसारखा पाऊस कोसळत राहिल्याने पाणलोटातील भातरोपे सडण्याचीही स्थिती निर्माण झाली होती. मात्र मंगळवारपासून पावसाचा जोर ओसरु लागल्याने व बुधवारी पावसाने पूर्ण विश्रांती घेतल्याने पाणलोटातील आदिवासी बांधवांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या 24 तासांत पाणलोटातील घाटघर, रतनवाडी, वाकी, भंडारदरा, निळवंडे या सर्वच क्षेत्रात शून्य मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणात येणार्या पाण्याचा प्रवाह रोडावल्याने बुधवारी सकाळी भंडारदर्यातून सोडण्यात येत असलेल्या 2 हजार 385 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सायंकाळी सहा वाजता 1 हजार 167 क्यूसेकवर, तर निळवंडे धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग 3 हजार 921 क्यूसेकवरुन 2 हजार 282 क्यूसेकपर्यंत कमी करण्यात आला. त्याचा परिणाम प्रवरेचा फुगवटा कमी होण्यात झाला असून बुधवारी सायंकाळी ओझर बंधार्यावरुन प्रवरा नदीपात्रात कोसळणारा 5 हजार 711 क्यूसेकचा प्रवाह आज सकाळी कमी होवून 2 हजार 997 क्यूसेकवर पोहोचला आहे.
आज सकाळी 6 वाजता कोतुळजवळील मुळा नदीपात्रातून अवघा 1 हजार 158 क्यूसेकचा प्रवाह वाहत आहे. बुधवारी सायंकाळी हाच प्रवाह 2 हजार 247 क्यूसेक होता. आढळा नदीतील विसर्गातही मोठी घट झाली असून सध्या नदीपात्रातून 128 क्यूसेक तर कालव्याद्वारे 45 क्यूसेक पाणी सुरू आहे. म्हाळुंगी नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह मात्र कायम असून आज सकाळी नदीपात्रातून 539 क्यूसेक तर कालव्यांद्वारे 90 क्यूसेक पाणी सुरू होते. सकाळी 6 वाजता मुळा धरणाचा एकूण पाणीसाठा 19 हजार 387 दशलक्ष घनफूट (74.54 टक्के), भंडारदरा 9 हजार 757 दशलक्ष घनफूट (88.33 टक्के) व निळवंडे धरणाचा पाणीसाठा 6 हजार 810 दशलक्ष घनफूट (81.85 टक्के) इतका होता.
गोदावरी उर्ध्व भागातील पाण्याचे समान वाटप व्हावे यासाठी 2005 साली अस्तित्वात आलेल्या समन्यायी पाणीवाटप कायद्याची यंदा अंमलबजावणी होणार नाही. उर्ध्व भागासह मराठवाड्यात झालेल्या समाधानकारक पावसाने 103 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा आज सकाळी 6 वाजता 95 हजार 820 दशलक्ष घनफूट (93.27 टक्के) तर उपयुक्त पाणीसाठा 69 हजार 753 दशलक्ष घनफूट (90.98 टक्के) झाला आहे. सध्या या महाकाय जलाशयातून वीज निर्मितीसाठी 1 हजार 589 क्यूसेक, कालव्यांद्वारे 500 क्यूसेक तर नदीपात्रातून 28 हजार 296 क्यूसेक असा एकूण 30 हजार 435 क्यूसेकचा विसर्ग सोडला जात आहे.