‘शासन आपल्या दारी’ मात्र विद्यार्थी राहिले ‘घरी’! संगमनेर बसस्थानक; अनेक फेर्या रद्द झाल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचा मोठा फटका संगमनेर तालुयातील हजारो विद्यार्थी आणि प्रवाशांना बसला आहे. काकडी येथे होत असलेल्या या कार्यक्रमासाठी संगमनेर बस आगारातील ६३ बसेसची नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे संगमनेरच्या आगार प्रमुखांनी ग्रामीण भागातील आजच्या सर्व बसफेर्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून संगमनेरात येणार्या हजारो विद्यार्थी व प्रवाशांवर त्याचा थेट परिणाम झाल्याचे बघायला मिळत आहे. त्यासोबतच संगमनेर बसस्थानकातून सुटणार्या अन्य काही फेर्याही रद्द झाल्याने अनेक प्रवाशी ताटकळत उभे असल्याचेही चित्र सध्या जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकांमध्ये दिसत आहे. शासनाच्या या निर्णयाबाबत विद्यार्थी आणि प्रवाशांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जिल्ह्याच्या दौर्यावर असून त्यांच्या उपस्थितीत काकडी (ता.कोपरगाव) येथे शासन आपल्या दारी या शासनाच्या महत्त्वकांक्षी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला गर्दी व्हावी यासाठी शासनाने जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना जबाबदार्या सोपविल्या असून प्रत्येक तालुयातील अधिकाधिक लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी पोहोचवण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांनी संगमनेर बस आगारातील ६३ बसेसची आगाऊ नोंदणी केली होती.

त्याचा परिणाम संगमनेर आगाराचे प्रमुख प्रशांत गुंड यांनी बुधवारी (ता.१६) सायंकाळी ग्रामीण भागात मुक्कामी जाणार्या बसेससह आज दिवसभरातील ग्रामीण भागात होणार्या बसफेर्या रद्द केल्या आहेत. त्याशिवाय नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, शेवगाव व पाथर्डी या भागात जाणार्या बसफेर्याही कमी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आज सकाळपासूनच नेहमी वर्दळीत असलेल्या संगमनेर बसस्थानकात तुरळक बसेसची ये-जा आणि प्रवाशांची मोजकी संख्या दिसत आहे. अनेक प्रवाशांना ऐच्छिक ठिकाणी जाण्यासाठी वेळेत बसच उपलब्ध नसल्याने त्यांना तासन्तास ताटकळावे लागत असून अनेकांनी खासगी वाहतुकदारांचा आधार घ्यावा लागत आहे.

संगमनेरातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये ग्रामीण भागातून येणार्या विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी आहे. जवळपास दहा हजार विद्यार्थी क्षमता असलेल्या एकट्या संगमनेर महाविद्यालयात ग्रामीणभागातून येणार्या विद्यार्थ्यांची संख्या ७५ टयांहून अधिक आहे. त्यासोबतच सह्याद्री महाविद्यालय, अमृतवाहिनी महाविद्यालयातही शेकडों विद्यार्थी ज्ञानार्जन करतात. मात्र आज चक्क शासनाच्याच आदेशाने राजकीय कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात बसेसची नोंदणी झाल्याने या सर्व विद्यार्थ्यांना घरीच बसण्याची वेळ आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांचीही नाराजी वाढली आहे.

‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी संगमनेर तालुयातील अडीच हजार लाभार्थ्यांसह जिल्ह्यातील एकूण ३० हजार जणांना कार्यक्रमस्थळी पोहोचवण्याची जबाबदारी जिल्ह्यातील सर्व तहसीदारांवर सोपविण्यात आली आहे. त्यासाठी ठिकठिकाणच्या तहसीलदारांनी जिल्ह्याच्या विविध आगारातील जवळपास ६०० बसेस नोंदवल्या आहेत. इतया मोठ्या संख्येने बसेस नोंदविल्या गेल्याने जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णतः विस्कळीत झाली आहे. त्याचा परिणाम विद्यार्थी आणि प्रवाशांचा संताप होण्यात झाला आहे. त्यातून एकीकडे शासन आपल्या दारी आलेले असताना दुसरीकडे विद्यार्थी मात्र घरीच राहिल्याचे विरोधाभासी चित्र जिल्हाभर बघायला मिळत आहे.

संगमनेरातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये संगमनेर व अकोले तालुयाच्या ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. या सर्व विद्यार्थ्याची संपूर्ण मदार राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवरच अवलंबून असते. विद्यार्थ्यांना शिक्षण संस्थांपर्यंत नेण्यासाठी शासनाकडून वेगवेगळ्या सोयी व सुविधा उपलब्ध करुन देणे अपेक्षित असताना शासनाच्या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनाच शिक्षणापासून लांब ठेवण्याचा हा प्रकार शासनाच्या धोरणांना शासनाकडूनच हरताळ फासणारा आहे. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमातून शासन लोकाभिमुख योजना राबवित असले तरीही त्यातून देशाचे भविष्य असलेला विद्यार्थी मात्र घरीच राहिल्याने सर्वसामान्यांमधून नाराजीही व्यक्त होत आहे.

