संगमनेरच्या गावठाणातही सोनसाखळी चोरांची दहशत! साळीवाड्यात महिलेचे गंठण ओरबाडले; सणासुदीच्या काळात महिलांची सुरक्षा ऐरणीवर..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरातील उपनगरांसह महामार्गालगतचा भाग आणि बसस्थानक परिसरात सोनसाखळी चोरांनी यापूर्वीच उच्छाद मांडलेला असताना आता त्यांची मजल थेट शहरातील दाट लोकवस्तीच्या गावठाणापर्यंत पोहोचली आहे. शुक्रवारी (ता.30) सायंकाळी भरवस्तीत मोपेडवरुन जाणार्‍या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण दोघांनी बळजबरीने ओरबाडून नेले. विशेष म्हणजे, अरुंद रस्ते आणि अतिशय दाट लोकवस्ती असलेल्या साळीवाड्यातील खंडोबा मंदिर परिसरातच हा प्रकार घडला. या घटनेतून चोरट्यांनी दाखवलेले धाडस महिलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण करणारे असून ऐण सणासुदीच्या काळात घडलेल्या या घटनेने महिलांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.


याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साळीवाडा परिसरातील राहणार्‍या प्रियांका संदेश भुतडा या शुक्रवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास मुलीला सोडून आपल्या मोपेडवरुन जात होत्या. त्यांची मोपेड साळीवाड्यातील खंडोबा मंदिराजवळ असताना पाठीमागून आलेल्या लाल रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरील दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या मोपेडजवळ येत काही कळण्याच्या आतच त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण ओरबाडलेे आणि चक्क रंगारगल्लीच्या दिशेने पळ काढला. नऊ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण क्षणात गायब झाल्याने गरबडलेल्या त्या महिलेने आरडाओरडही केली, मात्र तो पर्यंत खूप उशीर झाला होता. धक्कादायक म्हणजे, सदरील महिला मोपेड चालवत असतानाच चोरट्यांनी त्यांना लक्ष्य केल्याने त्यांच्या मोपेडचे संतुलन बिघडून दुर्घटना घडण्याचीही दाट शक्यता होती, मात्र चोरट्यांना त्याचे काहीही सोयरसुतक नसल्याचेही या घटनेतून दिसून आले.


यापूर्वी शहराच्या आसपासच्या निर्मनुष्य रस्त्यांवर आणि बसस्थानकासारख्या वर्दळीच्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडत. मात्र आता चोरट्यांनी थेट शहराच्या गावठाणभागातही महिलांना लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न चव्हाट्यावर आला आहे. या घटनेत प्रियंका भुतडा यांच्या गळ्यातील 9 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण लांबवण्यात आले असून त्याचे बाजारमूल्य सव्वालाखांच्या आसपास आहे. या प्रकरणी त्यांच्या तक्रारीवरुन दोघा अज्ञात चोरट्यांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पुढील आठवड्यात वर्षातील सर्वात मोठ्या दिवाळीसणाला सुरुवात होत आहे. त्यासाठी संगमनेरच्या बाजारपेठाही सजल्या आहेत. अनेकजण आपल्या मुला-बाळांसह खरेदीसाठी संगमनेरच्या रस्त्यावर गर्दीही करु लागल्याचे चित्र दिसत आहे. अशात धूमस्टाईल येवून चक्क गावठाणातच महिलांचे गळे ओरबाडले जावू लागले तर महिलांसह संगमनेरचा व्यापारी तरी सुरक्षित समजला जाईल का? याचा पोलिसांनी विचार करण्याची गरज असून अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी कठोर पावलं उचलून किमान सणांच्या कालावधीत शहरातील चौकाचौकात बंदोबस्त आणि वाहतुकीचे नियमन करण्याची आवश्यकता आहे.


सोनसाखळी चोेरीच्या घटना संगमनेरकरांसाठी नवीन नाहीत, मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावर आणि त्यातच अतिशय गजबजलेल्या गावठाणातही यापूर्वी अपवादाने घडलेल्या अशा प्रकारच्या घटना घडू लागल्याने चोरट्यांसह गुन्हेगारी प्रवृत्तींवर खरोखरी पोलिसांचा आणि कायद्याचा धाक राहीला की नाही अशा शंकाही निर्माण होवू लागल्या आहेत. यापूर्वीच्या एका पोलीस उपनिरीक्षकाने तपासाच्या नावाखाली पोलिसांची लक्तरं वेशीवर नेली होती, आता त्यांच्या जागी धार्मिक क्षेत्रातही तशाच प्रकारची कीर्द गाजवलेल्या अधिकार्‍याची वर्णी लावण्यात आली आहे. त्यांचे कर्तृत्व त्यांच्या या पदार्पणाच्या प्रकरणातूनच ठळक होणार आहे.

Visits: 6 Today: 6 Total: 2267693

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *