कोरोनात ‘राजहंस’ संघ उत्पादकांच्या पाठिशी भक्कम उभा राहिला ः थोरात दूध संघाची 43 वी ऑनलाईन वार्षिक सभा उत्साहात; नवीन योजनाही करणार सुरू
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोरोना संपूर्ण मानवजातीवरील संकट असून मागील वर्ष पूर्णपणे ठप्प झाले होते. लॉकडाऊन काळामध्ये वाहतूक बंद होती. दूध विक्री बंद झाली. हॉटेल, रेस्टॉरंट बंद होते अशा अडचणीच्या काळात अनेक खासगी दूध संस्थांनी दूध घेणे बंद केले. मात्र राजहंस दूध संघाने एक दिवसाचाही बंद न घेता शेतकरी व दूध उत्पादकांना मदत करण्यासाठी त्यांचे दूध घेतले अशा अडचणीच्या काळात मदत करणार्या संघाचे काम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
सहकारमहर्षी थोरात कारखाना कार्यस्थळावर संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या अधिमंडळाच्या 43 व्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महानंद व राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख हे होते. व्यासपीठावर आमदार डॉ.सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, अॅड.माधव कानवडे, इंद्रजीत थोरात, बाबासाहेब ओहोळ, शिवाजी थोरात, शंकर खेमनर, गणपत सांगळे, संपत डोंगरे, उपाध्यक्ष साहेबराव गडाख, भारत मुंगसे, अजय फटांगरे, प्रताप शेळके, आर.बी.रहाणे, चंद्रकांत कडलग, सुभाष गुंजाळ, गणेश मादास, दत्तू खुळे, मधुकर गुंजाळ, लेखापरीक्षक सहाणे, ठोंबरे, कार्यकारी संचालक डॉ.प्रताप उबाळे, फायनान्स मॅनेजर जी.एस.शिंदे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना महसूल मंत्री थोरात म्हणाले, मागील वर्षी कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. याचा परिणाम दूध व्यवसायावर मोठ्या प्रमाणात झाला. अशातच अनेक खासगी दूध संघांनी शेतकर्यांचे दूध घेणे बंद केले. मात्र राजहंस दूध संघाची सामान्यांशी बांधिलकी आहे. आदरणीय भाऊसाहेब थोरात यांची शिकवण आहे म्हणून अशा संकटाच्या काळातही या दूध संघाने एक दिवसाचाही बंद न ठेवता पूर्ण दूध घेतले. अशा संकटात पंचवीस रुपये उच्चांकी भाव दिला. दूध संघाचे संकलन चार लाख तीस हजार लिटरपर्यंत पोहोचले होते. अतिरिक्त दुधाचा पावडर करण्याचा दूरदृष्टीचा निर्णय घेतला त्यातून राजहंस दूध संघात दोन हजार मेट्रिक टन पावडर पडून राहिली. पावडरचे भाव खाली आले होते. त्यामुळे काही चिंतेचे वातावरण होते. मात्र जनजीवन पूर्वपदावर येत असताना पुन्हा एकदा पावडरचे भाव बरे झाले आहेत. आता दूध संघ पूर्वपदावर असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या पुढाकारातून कोरोना संकटातील अतिरिक्त दुधाच्या पावडर करण्याचा निर्णय झाला. राज्यात दहा लाख अतिरिक्त दुधाची पावडर करण्यात आली आणि आपल्याकडे होणार्या अतिरिक्त दुधातून सुमारे दोन हजार मेट्रिक टन पावडर तयार केली. अडचणीच्या काळात पन्नास कोटींची पावडर पडून होती. मात्र आता पुन्हा दूध पावडर भावाला स्थिरता आली असून दूध संघाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर आली आहे. या वर्षापासून तालुक्यातील दूध उत्पादकांना गायी व गोठ्यासाठी बँकांच्या सहकार्यातून अत्यंत कमी दरात एक लाख ते सव्वा लाख रुपये राजहंस अर्थसहाय्य योजनेंतर्गत कर्ज देण्यात येणार असून तालुक्यात जनावरांसाठी स्वस्त दरात औषधे उपलब्ध व्हावे याकरिता वेगवेगळ्या भागात मेडिकल सुरू करण्यात येणार आहे. तसेच दुग्ध व्यवसाय वाढ व गायींच्या आरोग्यासाठी राजहंस प्रोटिन योजना सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी दूध संघाचे संचालक मोहन करंजक, भास्कर सिनारे, विलास वर्पे, गंगाधर चव्हाण, बाबासाहेब गायकर, विलास कवडे, संतोष मांडेकर, अण्णासाहेब राहिंज, पांडुरंग सागर, माणिक यादव, प्रतिभा जोंधळे, ताराबाई धूळगंड, राजेंद्र चकोर, सुभाष आहेर, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, दादासाहेब कुटे, तात्याराम कुटे आदी उपस्थित होते. या बैठकीत ऑनलाईन पद्धतीने विनायक थोरात, विष्णू ढोले, कैलास दातीर, दत्तात्रय वर्पे आदी सहभागी झाले. याप्रसंगी राजहंसच्या अमृतराज चहा व मँगो व स्ट्रॉबेरी मिक्सचे राजहंस योगर्ट दही हे नवीन उपपदार्थ सुरू करण्यात आले. नोटीस वाचन कार्यकारी संचालक डॉ.प्रताप उबाळे यांनी केले. सूत्रसंचालन अॅड.सुरेश जोंधळे व नामदेव कहांडळ यांनी केले तर उपाध्यक्ष साहेबराव गडाख यांनी आभार मानले.