पठारावरील काळभैरवनाथांची मंदिरं चोरट्यांकडून होताहेत लक्ष्य! आता माळेवाडी पठारावरील मंदिरात चोरी; सव्वा लाखांच्या रोकडसह डीव्हीआरही पळविला..

नायक वृत्तसेवा, घारगाव
मागील काही वर्षांपासून संगमनेर तालुक्यातील पठारभागात गुन्हेगारी घटनांचा आलेख वाढत असून चोर्या, घरफोड्या, दरोडे यासारख्या प्रकारांसह अवैध व्यवसायांचे अक्षरशः स्तोम माजले आहे. यातील बहुतेक घटना केवळ पोलीस दप्तरी झालेल्या नोंदींपर्यंतच मर्यादीत असल्याने गुन्हेगारी प्रवृत्तींचे मनोबलही उंचावलेले आहे. हे स्पष्ट करणार्या एकामागून एक घटना समोर येत असून चोरट्यांनी आता हजारों भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या देवस्थानांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. त्यातूनच आज पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी माळेवाडी पठारावरील काळभैरवनाथांच्या मंदिरात प्रवेश करुन तेथील दोन दानपेट्यांमधील 1 लाख 25 हजारांची रोकड लांबविली आहे. त्यासोबतच मंदिराच्या कार्यालयाचे दार तोडून चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेर्यांद्वारे होणारे चित्रीकरण सुरक्षित ठेवणारा डीव्हीआरही लंपास केला आहे. गेल्या तीन वर्षांच्या काळात पठारावरील काळभैरवनाथांच्या मंदिरात चोरीची ही तिसरी घटना असून यापूर्वीच्या दोन्ही घटना डोळासणे येथील मंदिरातील असून त्यांचा अद्याप तपास लावण्यात घारगाव पोलीस अपयशी ठरले आहेत.

याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना आज (ता.31) माळेवाडी पठारावरील काळभैरवनाथांच्या मंदिरात घडली. याबाबत मंदिराचे पुजारी सुभाष जाधव यानीं दिलेल्या तक्रारीनुसार बुधवारी रात्री 10 वाजता मंदिराचे दरवाजे बंद करुन ते घरी गेले. आज पहाटे पाच वाजता दैनंदिन पूजा-अर्चा करण्यासाठी ते मंदिरात आले असता नेहमी अंतर्गत भागातील सुरु असलेले दिवे त्यांना बंद असल्याचे दिसले. त्यामुळे मोबाईलच्या बॅटरीचा वापर करीत ते मंदिरात पोहोचले असता कोणीतरी फ्युज काढून ठेवल्याने मंदिरातील दिवे बंद झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी सदरील फ्युज पुन्हा पूर्ववत बसविल्या असता लाईटच्या प्रकाशात गाभार्यासमोरील दोन्ही दानपेट्या फोडल्याचे त्यांना दिसले.

मंदिरातील बाकीच्या वस्तू व्यवस्थित आहेत का याचीही त्यांनी पाहणी केली तेव्हा कार्यालयाचे कुलूप तोडून त्यात असलेला डीव्हीआर रेकॉर्डरही गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी तत्काळ मंदिराच्या विश्वस्तांना माहिती दिल्यानंतर त्यांच्यासह गावातील मंडळी मंदिरात जमा झाली. याबाबत घारगाव पोलिसांनाही माहिती देण्यात आल्यानंतर प्रभारी पोलीस निरीक्षक पांडूरंग पवार यांनी घटनास्थळावर धाव घेत पाहणी केली असता मंदिरात प्रवेश करण्यासाठी चोरट्यांनी पाठीमागील भिंतीला शिडी लावून त्याद्वारे आधी मंदिराच्या धाब्यावर व नंतर तेथील जीन्याने आंत प्रवेश केल्याचे दिसून आले.

मंदिरात प्रवेश करुन चोरट्यांनी सुरुवातीलाच फ्युज काढून आतील सर्व दिवे बंद केले व त्यानंतर मुख्य गाभार्यासमोर असलेल्या दोन्ही दानपेट्या फोडल्या व त्यातील सुमारे 1 लाख 25 हजार रुपयांची रोकड व त्यानंतर कार्यालयाचे कुलुप तोडून आंत ठेवलेला डिव्हीआर घेवून तेथून पोबारा केल्याचे दिसून आले. याबाबत घारगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोहेकॉ.आर.व्ही.खेडकर यांच्याकडे सोपविला आहे. या घटनेनंतर मंदिराचे विश्वस्त व ग्रामस्थ संतप्त झाले होते, त्यांनी घारगाव पोलीस ठाण्यात एकत्र होत सदर घटनेचा गांभिर्याने तपास करण्याची मागणीही यावेळी केली. प्रभारी निरीक्षक पांडुरंग पवार यांनी पोलीस प्रत्येक कडी जुळवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगत सहकार्य करण्याची विनंती केली.

गेल्या तीन वर्षांच्या काळात पठारभागातील मंदिरांमध्ये होणारी ही तिसरी घटना आहे. यापूर्वी चोरट्यांनी डोळासणे येथील काळभैरवनाथांच्या मंदिराचा दरवाजा तोडून देवाचे चांदीचे अलंकार लंपास केले होते. त्या घटनेचा तपास लागलेला नसतांना दोन महिन्यांपूर्वी चोरट्यांनी पुन्हा याच मंदिरातील दानपेटी पळवून नेण्याचा प्रयत्न करीत सदरील दानपेटी मंदिरातून थेट पुणे-नाशिक महामार्गावर आणली, मात्र त्याचवेळी घारगाव पोलिसांचे गस्ती वाहन आल्याने चोरट्यांनी दानपेटी तेथेच सोडून पळ काढला. या दोन्ही घटनांनंतर त्यांचा तपास सुरु असतानाच आता माळेवाडी पठारावरील काळभैरवनाथांच्या मंदिरात चोरीचा प्रकार घडल्याने चोरट्यांनी पठारावरील मंदिरे लक्ष्य केल्याचे दिसत आहे. या घटनेने पठारभागात संताप निर्माण झाला असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

