गणेश बोर्हाडे जिल्हा पर्यावरण संरक्षण समितीत! जिल्हाधिकारी समितीच्या अध्यक्षपदी; पर्यावरणविषयक कामकाजाची संधी..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
स्त्री भृण हत्येपासून ते महामार्गावर बळी जाणार्या वन्यजीवांपर्यंत आणि वृक्षसंवर्धनापासून ते आरोग्य सुविधांपर्यंतच्या वेगवेगळ्या विषयांमध्ये आपल्या कर्तृत्वाची अमीट छाप सोडणार्या गणेश बोर्हाडे यांच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला आहे. सिन्नर ते खेड महामार्गाच्या विस्तारीकरणात तोडण्यात आलेल्या, मात्र त्यानंतर दहापटीने लागवड करण्याचे आदेश असतानाही त्याकडे डोळेझाक करणार्या महामार्ग यंत्रणेला जागेवर आणून त्यांचा बनावट प्रकार एकाकी लढा देत चव्हाट्यावर आणणार्या बोर्हाडे यांच्या कार्याची दखल घेत त्यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या जिल्हा समिती सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत स्थान मिळवणारे ते एकमेव अशासकीय व्यक्ती आहेत.
राज्य सरकारने पर्यावरण संरक्षण व संवर्धनासह पर्यावरण विषयक व्यापक जनजागरण मोहीमेच्या यशस्वी व सक्षम अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली अशा प्रकारच्या समित्यांची स्थापना करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीच्या सदस्य सचिवपदी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी आहेत. तर सदस्यपदी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा उद्योग अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, कार्यकारी अभियंता जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा जनसंपर्क व माहिती अधिकारी, जिल्हा वन अधिकारी यांच्यासह जिल्ह्यातील विधानसभा व विधान परिषदेचे आमदार सदस्य म्हणून असतील.
एकूण सत्तावीस सदस्यसंख्या असलेल्या या समितीमध्ये जिल्हाधिकारी तथा समितीच्या अध्यक्षांनी नामनिर्देशित केलेल्या जिल्ह्यातील दोघा पर्यावरण तज्ज्ञांमध्ये अहमदनगरच्या डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे प्राचार्य व न्यू आटर्स कॉलेजच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख सतीश कुलकर्णी तसेच अध्यक्षांनी नामनिर्देशित केलेल्या दोघा अशासकीय सदस्यांमध्ये केवळ गणेश बोर्हाडे यांची एकमेव निवड करण्यात आली आहे. अहमदनगरच्या उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण कार्यालयाच्या प्रादेशिक अधिकार्यांनी याबाबतचे पत्रही त्यांना पाठविले असून समितीची कार्यपद्धती व बैठकांबाबत वेळोवेळी अवगत केले जाणार असल्याचे त्यात म्हंटले आहे.
लेक लाडकी अभियानाच्या माध्यमातून स्त्री भृण हत्या रोखण्यासाठी केलेल्या कामातून बोऱ्हाडे यांची समाजाला ओळख झाली. पुणे-नाशिक महामार्गाच्या विस्तारीकरणातून आकाराला आलेल्या खेड ते सिन्नर या महामार्गाच्या कामात तोडण्यात आलेली सुमारे अडीच हजार झाडे व त्यानंतर प्रांताधिकार्यांच्या आदेशाने लावल्या जाणार्या दहापट संख्येतील सुमारे २४ हजार झाडांमागील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि निर्मिती करणारी कंपनी यांनी संगनमताने केलेला बनाव चव्हाट्यावर आणताना त्यांनी त्याविरोधात एकाकी लढा दिला. त्यासाठी त्यांनी थेट राष्ट्रीय हरीत लवादाकडे दाद मागून या दोन्ही बड्या विभागांना दणकाही दिला.
याच विषयाच्या अभ्यासातून महामार्गाची निर्मिती करणार्या कंपनीने वन्यजीवांसाठी भुयारी मार्ग व पादचार्यांसाठी उड्डाणपुलासारख्या गोष्टी केवळ कागदावरच चितारल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून देत अपघातात बळी जाणार्या वन्यजीवांचे बळी याच त्रुटीमुळे जात असल्याचेही वेळोवेळी यंत्रणांच्या लक्षात आणून देत त्यांना त्याबाबत कृती करण्यास भाग पाडले. आरोग्य क्षेत्रातील सुधारणांवरही बोर्हाडे यांनी व्यापक काम केले असून कोविड संक्रमणाच्या कालावधीत त्यांनी केलेल्या कामाचा आजही यंत्रणांच्या मुखातून उल्लेख होतो. सामाजिक, पर्यावरण, वन्यजीव व आरोग्य या क्षेत्रात त्यांनी केलेल्या व्यापक कामाची दखल घेत आता खुद्द जिल्हाधिकार्यांनी त्यांना पर्यावरण विषयक समितीत त्यांची सदस्यपदी निवड केली असून त्यातून या क्षेत्रात मोठे काम करण्याची संधी त्यांना उपलब्ध झाली आहे.