आंबेगावातून विद्यार्थ्याचे अपहरण करुन संगमनेरात आत्महत्या! ढोलेवाडीतील धक्कादायक प्रकार; अपहृत मुलाचा मात्र ठावठिकाणा नाही..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातून अपहरण झालेल्या बारा वर्षीय विद्यार्थ्याची सुटका होण्यापूर्वीच त्याच्या अपहरणकर्त्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आज संगमनेरातून समोर आला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असली तरीही पंधरा दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या ‘त्या’ अल्पवयीन विद्यार्थ्याचा मात्र अद्यापही ठावठिकाणा लागलेला नाही. या प्रकरणाचा तपास पारगाव कारखाना पोलीस करीत असून सदरचा प्रकार प्रेमसंबंधातून घडल्याची चर्चा आहे. राजेंद्र जंबुकर अशी आत्महत्या केलेल्या आरोपीची ओळख असून त्याच्यावर यापूर्वीही चार गुन्ह्यांची नोंद आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आत्महत्येची घटना आज (ता.24) सकाळी शहरानजीकच्या ढोलेवाडीत घडली. या परिसरात राहणार्या राजेंद्र रोहिदास जंबुकर (वय 27, रा.ढोलेवाडी) याने गेल्या बुधवारी (11 डिसेंबर) पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात असलेल्या निरगुडसर येथील आर्यन विक्रम चव्हाण (वय 12) या पाचवीत शिकणार्या विद्यार्थ्याचे त्याच्या शाळेतून अपहरण केले होते. या प्रकरणी त्याचे वडिल विक्रम चव्हाण यांनी पारगाव कारखाना (ता.आंबेगाव) पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. त्यावरुन पोलिसांनी अपहरणाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करुन आरोपीचा शोध सुरु केला असता तांत्रिक विश्लेषणावरुन तो संगमनेरात असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांना मिळाली.
त्यानंतर आरोपी राजेंद्र जंबुकर याने आपला मोबाईल बंद ठेवल्याने त्याचा माग काढण्यात अडचणी निर्माण झाल्या. मात्र पारगांव (कारखाना) पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे यांनी मात्र आरोपीचा पीच्छा सोडला नाही. त्यांनी वारंवार संगमनेरातील त्याच्या संभाव्य ठिकाणांवर छापे घालीत त्याच्या मुसक्या आवळण्याचा कसोशीने प्रयत्न केला. सोमवारीही (ता.23) पारगाव पोलिसांच्या पथकाने ढोलेवाडीत छापा घालून आरोपीचा शोध घेतला, मात्र दुर्दैवाने पोलीस येण्यापूर्वीच तो पसार झाला. अशातच आज (ता.24) आपण आपल्याच जाळ्यात अडकल्याचे आणि अपहण प्रकरणातून आपली सुटका अशक्य असल्याचे जाणून आरोपी राजेंद्र रोहिदास जंबुकर याने आपल्या ढोलेवाडीतील राहत्या घरात पंख्याला गळफास बांधून आत्महत्या केली.
या घटनेतून यापूर्वीही गंभीर स्वरुपाचे चार गुन्हे दाखल असलेल्या आणि त्यातील बहुतेक प्रकरणं न्यायालयीन पटलावर असलेल्या एका सराईत गुन्हेगाराचा अंत झाला. मात्र त्याने निरगुडसरमधून अपहरण केलेल्या ‘त्या’ बारा वर्षीय विद्यार्थ्याचा अद्यापही ठावठिकाणा नसल्याने या घटनेतील गांभीर्य कायम आहे. आत्महत्या करणार्या आरोपीने गेल्या पंधरा दिवस अपहृत विद्यार्थ्याला कोठे ठेवले?, तो सुरक्षित आहे का? असे कितीतरी प्रश्न पारगाव पोलिसांसमोर असून त्याची लवकरात लवकर उकल करुन पंधरवड्यापासून बेपत्ता असलेल्या ‘त्या’ विद्यार्थ्याला सुखरुप शोधून काढण्याचे आव्हानही त्यांच्यासमोर आहे.
ढोलेवाडीत राहणार्या राजेंद्र रोहिदास जंबुकर याचे एका विवाहितेशी प्रेमसंबंध असून त्यातून त्याने वर्षभरापूर्वी तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करीत तिची बोटंही छाटली होती. त्या प्रकरणावरुन त्याच्यावर जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नातंर्गत गुन्हा दाखल होवून दीर्घकाळ त्याला कारागृहात खितपत पडावे लागले. सध्या जामीनावर त्याची सुटका झालेली असून तक्रार मागे घेण्यासाठी त्याने पीडितेकडे एकसारखा तगादा लावला होता. त्यातूनच विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रकार घडल्याची शक्यता आहे. आता आरोपीनेच आत्महत्या केल्याने या प्रकरणात पारगाव (कारखाना) पोलिसांसह संगमनेर शहर पोलिसांचीही एन्ट्री झाली आहे.
या प्रकरणातील तक्रारदाराच्या पत्नीचे आरोपी राजेंद्र जंबुकर याच्याशी प्रेमसंबंध होते. त्यातून दोघेही गेल्या दोन वर्षांपासून एकत्रित वास्तव्यास होते. जंबुकर हा मूळ ढोलेवाडीत राहणारा असून त्याची प्रेयसी मात्र काशिआई मंदिराच्या पाठीमागील बाजूस भाड्याच्या खोलीत राहत होती. तिचे अन्य कोणाशी संबंध असल्याच्या संशयावरुन आरोपीने वर्षभरापूर्वी तिच्यावर कोयत्याने वार करुन तिची दोन बोटंही छाटली होती. त्या प्रकरणात जामीनावर बाहेर असताना गेल्या 9 डिसेंबररोजी त्यांच्यात वाद झाले. त्यातून रागाच्या भरात आरोपीने आपल्या प्रेयसीच्या मूळगावी जावून तेथून तिच्या पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाचे अपहरण केले. मुलगा सुरक्षित घरी येईल असा संदेश त्याने आत्महत्येपूर्वी दिल्याची चर्चा असल्याने या प्रकरणात फारकाही गंभीर घडण्याची शक्यता कमी आहे.
आरोपीचे आंबेगावातील अपहृताच्या घरी नेहमी येणंजाणं होते. त्यामुळे अपहृत मुलाचा आरोपीशी चांगला परिचय होता. गेल्या 9 डिसेंबररोजी आरोपीचा त्याच्या प्रेयसीसोबत वाद झाला. त्या रागातूनच त्याने पारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दित येवून सदरचा गुन्हा केला आहे. या प्रकरणात सीसीटीव्ही फूटेजमध्ये सदरील विद्यार्थी आरोपीच्या पाठीमागे चालत जात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्याचे अपहरण झाले असे म्हणता येणार नाही. मात्र मुलगा अल्पवयीन असल्याने जो पर्यंत तो सुखरुपपणे समोर येत नाही तो पर्यंत आमचा तपास सुरुच राहणार आहे.
भाऊसाहेब लोकरे
पोलीस उपनिरीक्षक : पारगांव (कारखाना) पोलीस ठाणे