मेघा भगत यांच्या बंडखोरीने भाजपातील ‘गृहकलह’ उघड्यावर! तिकिट वाटपात गोंधळाचा संशय; प्रभागांमधूनही नाराजीचा सूर कायम..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
नियोजनबद्धतेचा आव आणून ऐनवेळी फूसका बार फोडणार्‍या महायुतीमधील घटकपक्षांच्या एकसंधतेवर प्रश्‍न उभे राहिल्यानंतर आता भाजपच्या निष्ठावान समजल्या जाणार्‍या मेघा भगत यांच्या बंडखोरीने पालिकेच्या निवडणुकीलाच वळण दिले आहे. यापूर्वी सुकाणू समितीमधील काही सदस्यांनी शुक्राचार्याची भूमिका साकारीत माती उधळल्याचा आरोप झाल्याने विरोधाची ठिणगी चेतली होती. गेल्या पंचवार्षिकमध्ये भाजपच्या एकमेव नगरसेविका म्हणून ओळख असलेल्या भगत यांच्या बंडखोरीने त्याचे आगीत रुपांतर झाले असून भाजपमधील अंतर्गत कलह आता उघड्यावर येवू लागला आहे. ‘त्या’ सुकाणू सदस्याच्या संशयीत भूमिकेने पक्षाच्या समर्थकांमध्येही नाराजीचा भाव वाढत असून भगत यांच्याविषयी सहानुभूती व्यक्त केली जात आहे.


संगमनेर सेवा समिती व महायुतीकडून नगराध्यक्षपदासाठी कोणाचे नाव जाहीर होते याबाबत अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा ताणण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तासाभरात महायुतीमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र दिसू लागले होते. पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या सुकाणू समितीचा बाऊ करुन तिनही पक्षातील इच्छुकांच्या मुलाखती, माहिती फॉर्म भरुन घेण्याची प्रक्रिया व नंतर वरीष्ठांकडे सिलबंद शिफारस असा क्रम ठरलेला असताना व लोणीतील बैठकीत उमेदवारांची नावे ठरलेली असतानाही ‘त्या’ सदस्याने परस्पर त्यात बदल केल्याचा आरोप झाला.


त्यातील काहींनी त्यांच्याच सूचनवेरुन कागदपत्रांची जुळवाजुळव केलेली असल्याने अपक्ष अर्ज दाखल केले तर, काहींनी पक्षाचा सन्मान राखीत निवडणुकीतून आपले अंग काढून घेतले. मात्र ज्या पारदर्शकतेने उमेदवार निवड प्रक्रिया घडायला हवी होती, तशी न घडल्याने आपल्याबरोबर अन्याय झाल्याची भावना त्यांच्या मनात घर करुन गेली. गेल्या पंचवार्षिकमध्ये (2016 ते 21) विरोधकांची पालिकेतील अवस्था अतिशय दयनीय होती. अशावेळी पालिकेत विरोधकांचा आवाज म्हणून मेघा भगत या एकमेव नगरसेविका होत्या. त्यांनी संख्येचा विचार न करता संपूर्ण सभागृह सत्ताधार्‍यांनी व्यापलेलं असतानाही आपला आवाज उमटवला, त्यांना यंदाही काम करण्याची संधी मिळेल असे अपेक्षित होते.


मात्र रेखा गलांडे यांच्याप्रमाणे त्यांनाही डावलण्याचे कारस्थान शिजलेले असल्याने त्यांना ‘डमी’ म्हणून नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरण्यास सांगून नगरसेवकपदाचे तिकिटं कापले. वास्तविक भाजपमधून ज्या काही उमेदवारांची नावे निश्‍चित मानली जात होती. त्यात भगत यांच्या नावाचा अग्रणी समावेश होता. मात्र सुकाणू समितीने त्यांच्याशीही दगा करीत ऐनवेळी त्यांना डावलल्याने त्यांनी नगराध्यक्षपदासाठी दाखल केलेला आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असून या निवडणुकीत अपक्ष म्हणून ते मतदारांच्या सामोरे येणारं आहेत.


भगत यांच्याप्रमाणेच पक्षासाठी अतिशय प्रामाणिकपणे काम करणार्‍या काही प्रभागातील कार्यकर्तेही अशाच पद्धतीने दुखावल्याने त्यांच्या मनातही खद्खद् आहे. त्यामुळे त्यांनी वेगळी वाट निवडताना सेवा समितीच्या उमेदवारांचा प्रचार सुरु केल्याचीही काही उदाहरणे आहेत. भाजपचे निष्ठावान अशी ओळख असलेल्या भगत यांच्या या भूमिकेने प्रभागनिहाय दुखावलेल्या कार्यकर्त्यांसह भाजपच्या समर्थकांना बळ मिळाल्याने महायुतीचे टेंशन वाढले आहे. त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता असून मेघा भगत यांच्या भूमिकेचे शहरातून स्वागत होत आहे.


मागील पंचवार्षिकमध्ये पालिका सभागृहात विरोधी आवाजाची वाणवा होती. अशावेळी भाजपच्या एकमेव महिला नगरसेविका मेघा भगत यांनी एकट्याने खिंड लढवत विरोधकांचा आवाज जिवंत ठेवण्याचे काम केले. त्यामुळे साहजिकच त्यांना यावेळीही संधी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र ऐनवेळी त्यांना डवलण्यात आल्याने त्यांनी ‘डमी’ म्हणून भरलेला नगराध्यक्षपदाचा आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला असून या कृतीतून त्यांनी पक्ष श्रेष्ठींचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या भूमिकेला पक्षातील नाराज कार्यकर्त्यांसह समर्थकांमधूनही पाठबळ मिळू लागले आहे.

Visits: 86 Today: 4 Total: 1098594

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *