माणूसकी शून्य असलेल्या डॉ.प्रशांत थोरातचे निलंबन करा! आमदार खताळांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी; मृतदेहाची तब्बल ‘36’ तास विटंबना..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या पंधरवड्यात घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात माणुसकीला काळिमा फासणारी आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढणारी संतापजनक घटना घडली होती. मयत तरुणाच्या नातेवाईकांची कोणतीही तक्रार नसताना, केवळ संशयाचा ‘बाऊ’ करुन तब्बल 36 तास मृतदेहाची विटंबना करणार्‍या आणि कर्तव्यात कसूर करणार्‍या वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत थोरात याच्या मुजोरशाहीचा बुरखा आता फाटला आहे. या अमानुष प्रकाराची गंभीर दखल घेत संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांना थेट पत्र पाठवून या मुजोर डॉक्टरचे तात्काळ निलंबन करण्याची आणि त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या पत्रामुळे आता डॉक्टर थोरातभोवतीचा कायदेशीर आणि प्रशासकीय फास आणखी आवळला गेला आहे.


गेल्या शुक्रवारी (8 मे) पहाटेच्या सुमारास मंगळापूर शिवारातील हॉटेल ग्रीनपार्कचा संचालक सिद्धांथ नितीनकुमार काद्री (वय 27, मूळ रा.उडपी, कर्नाटक) याचा हृदयविकाराने दुर्दैवी मृत्यू झाला होता. हॉटेलमधील कामगारांनी त्याला दुपारी एकच्या सुमारास घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करुन मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात ठेवला. मुलाच्या निधनाची वार्ता ऐकून त्याचे वडील नितिनकुमार काद्री दुसर्‍या दिवशी (9 मे) उडपीहून संगमनेरला पोहोचले. मात्र, शवागारात आपल्या एकुलत्या एक मुलाचा मृतदेह उघड्यावर, अस्ताव्यस्त पडलेला पाहून त्या अभागी पित्याचे हृदय पिळवटून निघाले.


त्या भावनाविवश झालेल्या पित्याने त्यावेळी कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत थोरात यांची भेट घेऊन, आमची कोणाबद्दलही तक्रार नाही, आम्हाला मृतदेह घेऊन लांब उडपीला जायचे आहे, कृपया शवविच्छेदन करुन द्या, अशी वारंवार विनवणी केली. मात्र, माणूसकी शून्य असलेल्या या वैद्यकीय अधिकार्‍याने त्यांच्या विनंतीकडे साफ दुर्लक्ष केले. लोणीला घेऊन जा.. असा एकच हेकट हेका धरुन डॉ.थोरातने त्या दुर्दैवी पित्याला अत्यंत अपमानास्पद वागणूक देत रुग्णालयातून अक्षरशः हाकलून लावले.


हतबल झालेल्या या पित्याने यानंतर रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांकडे धाव घेतली. अधीक्षकांनी गांभीर्य ओळखून डॉ.थोरातला तात्काळ शवविच्छेदन करण्याचे आदेश दिले. परंतु, उद्धटपणाचा कळस गाठत या दुय्यम वैद्यकीय अधिकार्‍याने आपल्या वरिष्ठांचे आदेशही कचर्‍याच्या टोपलीत फेकून दिले आणि शवविच्छेदन करण्यास स्पष्ट नकार दिला. अखेर घुलेवाडी रुग्णालयाच्या या गचाळ आणि अमानुष व्यवस्थेला विटून, तब्बल 36 तास उघड्यावर पडलेला आपल्या लाडक्या मुलाचा देह घेऊन त्या पित्याला लोणीच्या रुग्णालयात जावे लागले. आणि तब्बल 40 तासांचा मानसिक छळ आणि संघर्षानंतर शवविच्छेदन झालेला मृतदेह घेवून तो अभागी पिता कर्नाटककडे रवाना झाला होता.


ग्रामीण रुग्णालयाचा हा भोंगळ, मनमानी आणि क्रूर कारभार ‘दैनिक नायक’ने रोखठोकपणे जनतेसमोर आणला. आपल्या पापाचा घडा भरल्याचे पाहून बिथरलेल्या डॉ.प्रशांत थोरातने प्रशासकीय नियमांना तिलांजली देत, चक्क ‘दैनिक नायक’चे संपादक व कार्यकारी संपादक यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. मात्र, ‘दैनिक नायक’ची बांधिलकी केवळ आणि केवळ जनतेशी व समाजाशी आहे! लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जनसामान्यांच्या न्यायासाठी प्रसंगी कारागृहात जाण्याची आमची तयारी आहे, या ठाम भूमिकेतून ‘नायक’ने या मुजोर डॉक्टरच्या हुकूमशाहीविरुद्धचा लढा अधिक तीव्र केला आहे.


या संपूर्ण प्रकरणाची कुणकुण लागताच संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालय संगमनेर तालुक्यातील प्रमुख सार्वजनिक आरोग्य केंद्र असून नागरिक प्रथमोपचारासाठी व शवविच्छेदनासाठी यावर अवलंबून आहेत. अशा संवेदनशील ठिकाणी डॉ.प्रशांत थोरात हा अधिकारी तालुक्यातील नागरिकांना वेठीस धरत अरेरावीची व उद्धट भाषा वापरतो. इतकेच नव्हे, तर कर्मचार्‍यांना आणि नागरिकांना ‘एट्रॉसिटी’ कायद्यानुसार कारवाई करण्याची धमकी देतो. त्यांच्या या मानसिक त्रासाला रुग्णालयातील कर्मचारी व अधिकारीही कंटाळले आहेत.


आमदार खताळ यांनी पत्रात पुढे नमूद केले आहे की, वरिष्ठांची कोणतीही परवानगी न घेता वृत्तपत्राच्या संपादकांवर गुन्हे दाखल करणार्‍या या उद्दाम वैद्यकीय अधिकार्‍यावर तात्काळ ‘निलंबनाची’ कारवाई करण्यात यावी. या पत्राच्या प्रती त्यांनी आरोग्य सेवा विभागाचे आयुक्त, नाशिकचे उपसंचालक व जिल्हा शल्यचिकित्सकांनाही पाठवल्या आहेत. त्यामुळे डॉ.प्रशांत थोरातच्या अडचणी वाढल्या असून एकीकडे आरोग्यमंत्र्याकडे निलंबनाची मागणी होत असताना दुसरीकडे मयत तरुणाच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीचीही जिल्हा शल्य चिकित्सकांनी दखल घेतली असून संगमनेर, अहिल्यानगर, नाशिक आणि मुंबई अशा चार स्तरावरुन त्याच्या भोवतीचा फास आवळला जात आहे. त्याच्या निलंबनासोबतच मृतदेहाची 36 तास विटंबना करुन तिष्ठत ठेवल्याबद्दल त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचीही मागणी होत आहे.


वैद्यकीय पेशालाच काळीमा फासणार्‍या या प्रकाराने भावनाविवश झालेल्या मयताच्या वडीलांनी या संपूर्ण प्रकरणाचा उल्लेख करीत जिल्हा शल्य चिकित्सकांकडे लेखी तक्रार केली आहे. त्याशिवाय दैनिक नायकने दोन दिवस रोखठोक लिखाणाद्वारा या संपूर्ण घटनेवर प्रकाश टाकल्यानंतर संगमनेरच्या वैद्यकीय अधीक्षकांनीही त्याची चौकशी सुरु केली असून आमदार अमोल खताळ यांनी थेट आरोग्यमंत्र्यांकडे त्याच्या निलंबनाची मागणी केल्याने मुजोर डॉ.प्रशांत सुरेश थोरात याचा पाय खोलात गेला असून शिस्तभंगासह त्याला मृतदेहाची विटंबना केल्यावरुन कायदेशीर कारवाईचाही सामना करावा लागू शकतो.

Visits: 20 Today: 20 Total: 1827592

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *