सप्टेंबर ठरला अठरा महिन्यातील उच्चांकी रुग्णसंख्येचा तिसरा महिना! तालुक्यात दुसर्‍या लाटेचा प्रभाव कायम; दररोज आढळताहेत सरासरी दीडशे रुग्ण..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अठरा महिन्यांपूर्वी तालुक्यात सुरु झालेला कोविडचा प्रादुर्भाव अद्यापही आटोक्यात येत नसल्याचे चित्र सध्या तालुक्यात पहायला मिळत आहे. एप्रिल आणि मे या दोन महिन्यात देशाने अनुभवलेला दुसर्‍या संक्रमणाचा फटका आता ओसरत असतांनाही संगमनेर तालुक्यात टिकून असलेली रुग्णसंख्या मात्र चिंताजनक ठरत आहे. एप्रिलमध्ये संगमनेर तालुक्याची दैनिक सरासरी रुग्णगती 183 तर मे महिन्यात 279 रुग्ण प्रतिदिवसांवर गेली होती. त्यानंतर राज्यासह जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यातील संक्रमण टप्प्याटप्प्याने नियंत्रणात आले. मात्र संगमनेर तालुका त्याला अपवाद ठरला असून मागील तीस दिवसांत दररोज सरासरी 150.5 रुग्ण या गतीने तालुक्यातून अठरा महिन्यातील तिसरी उच्चांकी रुग्णसंख्या समोर आली आहे.

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये संगमनेर शहरासह ग्रामीणभागात आठ रुग्ण समोर आले होते. त्यावेळी संपूर्ण देशात कडकडीत ‘लॉकडाऊन’ असल्याने सुरुवातीच्या काळात संक्रमणाचा वेग मर्यादीत होता. त्यानंतर मे महिन्यात सरासरीत काहीसा बदल होत 1.2 या गतीने महिन्याभरात 36, जूनमध्ये 65 रुग्ण समोर आले होते. जूनपासून लॉकडाऊन शिथील करण्याची प्रक्रीया सुरु झाल्याने रुग्णसंख्येवरही त्याचा परिणाम झाल्याचे जुलैमध्ये समोर येवून त्या एकाच महिन्यात रुग्णसंख्येत जवळपास दहापटीने वाढ होवून 650 रुग्ण आढळले होते. ऑगस्टमध्ये गणेशोत्सवासह अन्य सण-उत्सवांसाठी नागरीक घराबाहेर पडल्याने ऑगस्टमध्ये तालुक्याची सरासरी आणखी वाढून प्रतिदिवस 31 वर जावून ऑगस्टमध्ये तालुक्यात 961 रुग्ण आढळले.

त्यावेळी कोविडबाबत असलेली अपूर्ण माहिती, वैद्यकीय क्षेत्रातील संभ्रम आणि उपचारांच्या पद्धती यामुळे ऑगस्टमध्ये साजरे झालेले उत्सव व त्यासाठी झालेली गर्दी याचा परिणाम सप्टेंबरमध्ये रुग्णसंख्येने उसळी घेत थेट 1 हजार 529 रुग्णांवर मजल मारल्याने दिवाळीनंतर राज्यात संक्रमणाची दुसरी लाट येईल असा अंदाज वर्तविला गेला. मात्र नोव्हेंबरने तो फोल ठरवला आणि महिन्याभरात सरासरी खाली येवून दररोज 30 रुग्ण या गतीने तालुक्यातून अवघे 908 रुग्ण समोर आले. डिसेंबरमध्येही त्यात काहीशी घट होत सरासरी 26 रुग्ण या गतीने 817 रुग्ण आढळले. त्यातच डिसेंबरमध्ये व्हॅक्सीन तयार झाल्याची घोषणा झाल्याने देशभरात आनंदाचे भरते आले.

त्यामुळे जानेवारीत राज्य सरकारने अनेक गोष्टींवरील निर्बंध शिथील करतानाच ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा उठवला. या दरम्यान झालेल्या प्रचार सभा, प्रचार आणि प्रत्यक्ष निवडणूक आणि निकाल आदी प्रकीया होवूनही रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट होवून नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात सरासरी अगदी दहा रुग्णांवर येवून महिन्याभरात अवघे 301 रुग्ण आढळल्याने जिल्ह्यासह तालुक्यात हलगर्जीपणा वाढीस लागला. त्यातूनच नागरिकांना कोविडचा जणू विसर पडल्यासारखी स्थिती निर्माण झाल्याने फेब्रुवारीत नियमांची एैशीतैशी करीत धुमधडाक्यात विवाह सोहळेही साजरे होवू लागले. त्याचा परिणाम फेब्रुवारीपासूनच समोर यायला सुरुवात होवून संक्रमणाचा वेग वाढून सरासरी 18 रुग्णांवर गेला व फेब्रुवारीत 495 रुग्ण आढळले.

त्यातूनही ना शासनाने बोध घेतला, ना प्रशासनाने त्यामुळे हा हलगर्जीपणा कायम राहील्याने मार्चमध्ये कोविड संक्रमणाची दुसरी लाट उसळण्यास सुरुवात झाली आणि त्याचा मोठा फटकाही तालुक्याला बसला. मार्चमध्ये सरासरी 62 रुग्ण या गतीने तालुक्यात 1 हजार 916 रुग्ण आढळले. एप्रिल व मे या दोन महिन्यांनी तर राज्यभरात कोविडची स्थिती बिघडवली. एप्रिलमध्ये एकट्या संगमनेर तालुक्यातून सरासरी 183 रुग्ण इतक्या प्रचंड गतीने 5 हजार 491 रुग्ण तर मे महिन्यात त्यात आणखी वाढ होवून सरासरी 279 रुग्ण दररोज या गतीने तब्बल 8 हजार 655 रुग्णांची भर पडली. या दोन महिन्यात तालुक्यातील चारशेहून अधिक नागरिकांचा बळीही गेला. त्यानंतर जूनमध्ये मात्र राज्यातील रुग्णसंख्या खालावली, त्यात नगर जिल्ह्याचाही समावेश होता. मात्र प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांमध्ये नगरचाही समावेश झाल्याने जिल्ह्यात कठोर निर्बंध कायम ठेवण्यात आले होते.

मात्र या उपरांतही नागरिकांकडून नियमांची पायमल्ली होतच गेली आणि प्रशासनाचा हलगर्जीपणाला त्यात मिसळल्याने जुलैमध्ये एकीकडे जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यातील संक्रमणात घट होत असतांना संगमनेरसह पारनेर, अकोले, श्रीगोंदा, पाथर्डी व कर्जत सारखे तालुके मात्र त्याला अपवाद ठरु लागले. जुलैमध्ये संगमनेर तालुक्यातून सरासरी 74 रुग्ण या गतीने 2 हजार 301 तर ऑगस्टमध्ये त्यात वाढ होवून सरासरी 137 रुग्ण या गतीने 4 हजार 249 रुग्णांची भर पडल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष्य संगमनेर तालुक्यावर खिळले. मात्र जिल्ह्यात संक्रमणाचा मोठा फटका बसूनही नागरी हलगर्जीपणा आणि प्रशासकीय दुर्लक्ष यात कोणताही फरक न पडल्याने संगमनेर तालुका आजही चिंताजनक अवस्थेतच असून गेल्या महिन्याभरात दररोज सरासरी 150.5 रुग्ण या गतीने तालुक्यातून तब्बल 4 हजार 516 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील अन्य सर्व तालुक्यांपेक्षा ही रुग्णसंख्या कितीतरी अधिक आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक लोकसंख्येच्या अहमदनगर महापालिका क्षेत्रातील आजची सरासरी अवघी 17 असून महिन्याभरात तेथून अवघे 808 रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे संगमनेर तालुक्यात आजही दुसर्‍या लाटेचा प्रभाव कायम असून सप्टेंबरमध्ये गेल्या अठरा महिन्यातील कोविड काळातील तिसरी उच्चांकी रुग्णसंख्या समोर आली आहे.

Visits: 74 Today: 1 Total: 1099962

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *