मानवाधिकार फाउंडेशनचे कार्य सर्वसामान्यांसाठी प्रेरणादायी ः आ. डॉ. तांबे ‘आपले मानवाधिकार जनता दरबार’ व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात


नायक वृत्तसेवा, संगमनेर
आपले मानवाधिकार फाउंडेशन समाजासाठी अनेक प्रेरणादायी कार्य करत असून त्यांचे उपक्रम, राज्यघटना व मानवतेसाठी असलेले अधिकार व कर्तव्य यांचा प्रचार-प्रसार सध्या महाराष्ट्रभर करत आहेत, असे प्रतिपादन विधान परिषद सदस्य डॉ. सुधीर तांबे यांनी केले.

डॉ. दीपेश पष्टे संचालित ‘आपले मानवाधिकार जनता दरबार’ व पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयातील के. बी. दादा सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली, तर संविधान वाचन देखील करण्यात आले. सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी, न्यायासाठी, अधिकारासाठी लढणारे आपले मानवधिकार फाऊंडेशन असून, छत्रपती शिवरायांची शिकवण, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर आधारित कार्य करत आहे. याची पायाभरणी ही डॉ. दीपेश पष्टे यांनी केली आहे. या फाउंडेशन अंतर्गत नवीन संकल्पना ‘आपले मानवाधिकार जनता दरबार’ नव्याने सुरू करण्यात आली. याचे उद्घाटन आणि पुरस्कार वितरण करण्यात आले होते.

याप्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून आपले मानवाधिकार फाऊंडेशनचे संचालक डॉ. दीपेश पष्टे यांनी फाउंडेशनचे कार्य, उद्देश व उद्दिष्टे उपस्थितांना प्रभावीपणे सांगितले. नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी आपल्या मनोगतातून समाजात सध्या महिलांसमोर असणार्‍या समस्या विशद केल्या. यावेळी संगमनेर तालुका पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, परफेक्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनीता कोडे, माझे माहेर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुषमा कासारे, आपले मानवधिकार वर्धा जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल भटकर, स्ट्रॉबेरी शाळेच्या संचालिका संज्योत वैद्य, ज्येष्ठ पत्रकार किसन हासे, साई समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप अरगडे, बी. एस. टी. कॉलेजचे प्राचार्य डॉ. डी. डी. पाटील, प्रा. ज्ञानेश्वर गोंटे, दत्तात्रय घोलप, अरुण गोडसे आदिंसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

समाजात विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय कार्य करणार्‍या गुणीजनांचा आपले मानवाधिकार फाउंडेशनच्यावतीने पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. प्रास्ताविक जिल्हा सचिव रेणुका दिघे यांनी केले. आभार प्रदर्शन दर्शन जोशी व सूत्रसंचालन संदीप सातपुते यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आपले मानवधिकार फाऊंडेशनचे पदाधिकारी स्वाती राऊत, नम्रता दिघे, विजय सातपुते, बजरंग जेडगुले, विनायक ताजणे, पूनम घुले, सुनील दिघे, शैलेश वाव्हळ, भूषण उकिर्डे, संतोष दिघे आदिंनी विशेष मेहनत घेतली.

Visits: 177 Today: 4 Total: 1110448

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *