गर्भलिंगनिदान प्रकरणाची व्याप्ती आता नाशिकपर्यंत! निफाडच्या दोघा डॉक्टरांना अटक; आत्तापर्यंत सात डॉक्टरसह अठरा जण गजाआड..


नायक वृत्तसेवा, लोणी
लोणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आलेल्या गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपात प्रकरणाच्या तपासाला आता 15 दिवस पूर्ण होत आले असून, पोलिसांच्या सखोल तपासातून दररोज या काळ्या धंद्याची नवनवीन आणि थरारक माहिती समोर येत आहे. सुरुवातीला स्थानिक पातळीवर वाटणार्‍या या गुन्ह्याची व्याप्ती प्रत्यक्षात अनेक जिल्ह्यांमध्ये पसरली असल्याचे उघड झाले असून, आता हे रॅकेट नाशिक जिल्ह्यापर्यंत जावून पोहोचले आहे. पुण्यातून अटक केलेल्या दोघा डॉक्टरसह तिसर्‍याच्या चौकशीतून प्रसूतीपूर्व गर्भचाचणीचा हा खेळ नाशिकमध्येही पसरल्याचे समोर येताच श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने आज भल्या पहाटे छापा घालून दोघा डॉक्टरांना अटक केली आहे. त्यामुळे पिंपरी निर्मळसारख्या छोट्याशा गावातून समोर आलेल्या या धक्कादायक साखळीत आत्तापर्यंत सात डॉक्टरांसह एकूण 18 जणांना अटक झाली असून त्यात गर्भचाचणी केलेल्या सहा महिलांच्या पतींचाही समावेश आहे.


अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्याच्या वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी पिंपरी निर्मळ प्रकारणाचे ओघळ पुण्यापर्यंत पोहोचल्यानंतर पोलिसांनी शिरुर आणि लोहगावमधून दोन डॉक्टरांसह सोनोग्राफी मशिनवचा पुरवठा करणार्‍या एकाला अटक केली होती. त्यांच्याकडील कसून चौकशीत नाशिक कनेक्शन समोर आले. पुणे येथील मेडिकल साहित्य विक्रेत्याकडून निफाड येथील डॉक्टरांनी बेकायदेशीर पोर्टेबल सोनोग्राफी मशीन खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यानुसार श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने आज पहाटे निफाड परिसरात छापा घालून तिघांना जेरबंद केले.


या प्रकरणात निफाडमधून अटक झालेल्या डॉ.कुणाल प्रभाकर वल्टे (वय 33, रा. सरस्वती नगर, निफाड) याचा करंजगाव (ता.निफाड) येथे दवाखाना असून, तो या प्रकरणातील मुख्य सूत्रधार डॉ.भणगे याचा वर्गमित्र आहे. त्याने पुण्यातील ठाकरेकडून विनानोंदणी सोनोग्राफी मशीन विकत घेतले होते. तर, सागर शांताराम उल्हाळ (वय 25, रा.नांदूर मधमेश्वर, ता.निफाड) याची डॉ.वल्टे याच्या शेजारीच ब्लड टेस्टिंग लॅब आहे. पोलिसांनी पकडू नये म्हणून डॉ.वल्टे याने आपले बेकायदेशीर मशीन लपवण्यासाठी त्याच्या लॅबचा वापर केला होता. निफाडमधून अटक केलेल्या दोघाही आरोपींना आज (ता.22) न्यायालयात हजर केले असता, त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


गेल्या दोन आठवड्यांपासून सुरु असलेल्या या तपासात एजंट आणि डॉक्टरांच्या अभद्र युतीचा अत्यंत धक्कादायक पर्दाफाश झाला आहे. ग्रामीण भागातील 8 ते 10 गर्भवती महिलांना एकत्र करुन, त्यांच्या नातेवाईकांकडून आधीच रोख रक्कम उकळली जायची. त्यानंतर नातेवाईकांना दूर ठेवून, एजंट स्वतःच्या चारचाकी वाहनातून त्या महिलांना गुप्त आणि अज्ञातस्थळी घेऊन जायचे. तिथे पोर्टेबल मशीनद्वारे बेकायदेशीर गर्भलिंग निदान केले जायचे. एका चाचणीसाठी डॉक्टरला 10 हजार तर, एजंटला 3 हजार रुपये मिळायचे. या चक्रव्यूहात अडकलेल्या अनेक महिलांची ओळख पटवून त्यांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरु असून, 3 महिलांचे अवैध गर्भपात झाल्याचेही तपासात सिद्ध झाले आहे.


या गुन्ह्याचा माग काढत असतानाचा पोलिसांनी बेकायदेशीर मशीन पुरवणार्‍या पुणे जिल्ह्यातील मावळच्या टोळीचाही पर्दाफाश करुन गुन्ह्यात वापरात असलेली चार पोर्टेबल सोनोग्राफी मशिन्स आणि तीन चारचाकी वाहनेही जप्त केली आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेली मशिन्स अधिकृतपणे कुठेही नोंदणीकृत नव्हती. पुण्याचे डॉ.आकाश मलगुंडे, डॉ.नीलकंठ जाधव आणि विक्रेता नरेंद्र ठाकरे यांनी ही मशिन्स पुरवली होती. याच साखळीचा शोध घेताना मावळच्या मारुती ढोरे या भोंदू डॉक्टरकडेही एका मशीनचा शोध लागला.


तसेच, बेकायदेशीर गर्भपातासाठी लागणार्‍या गोळ्यांचा पुरवठा करणारा श्रीरामपूरचा डॉ.राज अजीज शेख आणि डॉ.रविंद्र कुटे यापूर्वीच गजाआड गेले आहेत. गेल्या 6 मे रोजी उघडकीस आलेल्या या धक्कादायक प्रकरणात लोणी पोलिसांनी आतापर्यंत सात डॉक्टर्स, पाच दलाल व मशिन पुरवठादार आणि सहा गर्भवती महिलांचे पती अशा 18 जणांना अटक केली आहे.


गेल्या 15 दिवसांपासून पोलीस प्रशासन केवळ एक कायदेशीर कारवाई म्हणून नव्हे, तर सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून या प्रकरणाचा अत्यंत बारकाईने तपास करत आहेत. या काळ्या धंद्याची पाळेमुळे आणखी कोणत्या जिल्ह्यात पसरली आहेत आणि यात आणखी कोण कोण सामील आहेत, याचा अजूनही शोध सुरु आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, अप्पर अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती व लोणीचे सहाय्यक निरीक्षक युवराज आठरे या आंतरजिल्हा रॅकेटचा पुढील तपास करत आहेत.

Visits: 9 Today: 9 Total: 1827574

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *