संगमनेरच्या कुख्यात ‘कसाईटोळी’वर अखेर ‘संघटीत गुन्हेगारी’चा ठपका! श्रीरामपूर अपर अधीक्षकांचा ऐतिहासिक बडगा; नवाज कुरेशी टोळीच्या पापाचा घडा भरला..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू होऊनही संगमनेर शहरातील कुप्रसिद्ध, बेकायदा कत्तलखान्यांचे उघडमाथा चालणारे साम्राज्य आणि त्यातून निर्माण होणारा सामाजिक व जातीय तणाव हा नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. ‘दैनिक नायक’ने या भीषण वास्तवाविरोधात, खाकीतील काही पाठीराख्यांवर आणि या रॅकेटवर नेहमीच रोखठोक व निर्भीडपणे आवाज उठवला आहे. वारंवार होणार्या कारवायांना आणि जप्तीला केवळ ‘व्यावसायिक खर्च’ मानून पुन्हा त्याच जोमाने कत्तलखाने सुरु ठेवणार्या संगमनेरातील कुख्यात कसाईटोळीला आतापर्यंतचा सर्वात मोठा हादरा बसला आहे. श्रीरामपूर उपविभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी शहरातील या संघटीत गुन्हेगारीच्या समूळ उच्चाटनाचा चंग बांधला आहे. एकाच टोळीकडून वारंवार गुन्हे घडण्याची अखंड मालिका पाहता, पोलिसांनी नवीन कायद्यातील अस्त्र उपसले असून, संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 111 (संघटीत गुन्हेगारी) प्रमाणे वाढीव कलम लावून ऐतिहासिक कारवाई केली आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे जिल्ह्यात बेकायदा गोवंश कत्तल करणार्या माफियांचे आणि त्यांना छुपे पाठबळ देणार्यांचे धाबे दणाणले आहेत.

संगमनेर शहरात कत्तलखान्यांच्या माध्यमातून दररोज लाखो रुपयांची अवैध उलाढाल होते. या अफाट पैशांच्या लालसेपोटी या कसायांनी ना कधी कायद्याचा आदर केला, ना कधी पोलिसांना जुमानले. अनेकदा या बेकायदा धंद्यामुळे संगमनेर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला, जातीय तणावाच्या ठिणग्या उडाल्या. मात्र, प्रत्येक कारवाईनंतर जागा बदलून, किंवा तात्पुरती शांतता राखून हा काळा धंदा पुन्हा जोमाने सुरु व्हायचा. यामागे स्थानिक पोलीस ठाण्यातील काहींना हाताशी धरुन हा खेळ सुरु असल्याचेही अनेकदा समोर आले.

तीन वर्षांपूर्वी सोमनाथ वाघचौरे संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यरत होते, तेव्हा त्यांनी शहरातील प्रमुख कसायांवर ’टू-प्लस’ (दोनपेक्षा अधिक गुन्हे) अंतर्गत तडीपारीची कारवाई करण्याचे आदेश दिले होते. परंतु, तत्कालीन पोलीस निरीक्षकांनी वरिष्ठांच्या आदेशाला उघडउघड चुना लावला. कसाईटोळीचा म्होरक्या ‘नवाज जावेद कुरेशी’ याला वाचवण्यासाठी जाणीवपूर्वक त्याच्या प्रस्तावात ‘नवाज सलिम कुरेशी’ असे चुकीचे नाव पाठवले. परिणामी, त्या नावाचे अनेकजण परिसरात असल्याने मूळ आरोपीपर्यंत नोटीसच पोहोचू शकली नव्हती. गुन्हेगारांचे आणि पोलिसांचे हे साटेलोटे ‘दैनिक नायक’नेही चव्हाट्यावर आणले होते.

गेल्या 14 एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी जमजम कॉलनीतील एका पत्र्याच्या शेडवर छापा टाकला होता. त्यावेळी आरोपी नवाज जावेद कुरेशी, समद जावेद कुरेशी, नावेद जावेद कुरेशी आणि इतर 3 ते 4 अनोळखी इसमांनी संगनमत करुन, कायद्याने बंदी असतानाही गोवंशीय जनावरांची कत्तल केल्याचे पुन्हा एकदा आढळून आले होते. या छाप्यात पोलिसांनी दोन लाख 87 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता, ज्यामध्ये 950 किलो गोमांस, चाकू, डिजिटल वजन काटा आणि जिवंत जनावरांचा समावेश होता.

या ताज्या गुन्ह्यानंतर संगमनेरचे विद्यमान उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे यांनी या आरोपींचा गुन्हेगारी इतिहास (अभिलेख) उकरुन काढला. त्यातून एकाच कुटुंबातील आणि टोळीतील या सदस्यांवर गुन्ह्यांचा डोंगर उभा असल्याचे समोर आले. या टोळीचा म्होरक्या नवाज जावेद कुरेशीवर 2016 ते 2026 या 10 वर्षांत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तब्बल 14 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचे भाऊ अनुक्रमे समद जावेद कुरेशीवर अशाचप्रकारचे अकरा 11 गुन्हे दाखल असून, त्यात हाणामार्या, बेकायदेशीर हत्यारे बाळगणे आणि गोवंश कत्तलीचे गंभीर गुन्हे आहेत.

नावेद जावेद कुरेशी याच्यावर चालू वर्षातच गोवंश हत्येचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. हा संपूर्ण अहवाल पाहिल्यानंतर, ही टोळी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संघटीतपणे गुन्हे करत असल्याचे आणि गोवंशाला चारा-पाण्याविना डांबून ठेवणे, कत्तल करणे, वाहतूक व गोमांस विक्री करणे अशी बेकायदेशीर कृत्ये सातत्याने करत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे डॉ.कुणाल सोनवणे यांनी या तिघांविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या कलम 111 (संघटीत गुन्हेगारी) प्रमाणे कारवाईचा प्रस्ताव श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पाठवला होता. अपर अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी या प्रस्तावाचे सखोल अवलोकन करुन या ऐतिहासिक कारवाईला मंजुरी दिली आहे.

अपर अधीक्षकांकडून कडक कारवाईचा बडगा उगारला जाताच शहर पोलिसांनी तात्काळ चक्रे फिरवून या टोळीतील समद जावेद कुरेशी (वय 28, रा. जमजम कॉलनी, संगमनेर) याला बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, या कसाईटोळीचा मुख्य सूत्रधार नवाज जावेद कुरेशी आणि त्याचा दुसरा भाऊ नावेद जावेद कुरेशी हे दोघेही पोलिसांची चाहूल लागताच पसार झाले आहेत. पोलीस सध्या त्यांचा कसून शोध घेत असून, या कुख्यात आरोपींबाबत नागरिकांना कोणतीही माहिती मिळाल्यास त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

