कोपरगाव पालिकेच्या कारभाराविरोधात शहरवासियांत संतापाची लाट

कोपरगाव पालिकेच्या कारभाराविरोधात शहरवासियांत संतापाची लाट
अक्षय काळे, कोपरगाव
कोपरगाव शहरात कोरोना बाधितांची संख्याघटीचे विक्रम घडत असल्याने बाजारपेठ फुलत आहे. परंतु पालिकेच्या दुर्लक्षाने शहरवासियांना जीवघेण्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाविरुद्ध संतापाचे वातावरण पसरले आहे. या संतापाच्या अतिरेकाने पुन्हा असंवेदनशील शहर म्हणून कोपरगावची शासन दरबारी नव्हे तर राज्यात बदनामीचे शहर गाजले जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

कोपरगाव शहरात ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये कोरोना विषाणूंनी धुमाकूळ घातला. मार्च ते जून या कालावधीत शहर व तालुका कोरोनामुक्त राहिला. या काळात तहसीलदार योगेश चंद्रे, पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, पालिका मुख्याधिकारी प्रशांत सरोदे या त्रिकुटाच्या योग्य समन्वय व नियोजनाने मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले नाही. परंतु मार्च ते सप्टेंबर या सहा महिन्यात लॉकडाऊनमुळे शहर व तालुक्यात कडेकोट बंदमुळे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले. उपासमारीच्या घटना वाढत राहिल्या. शेवटी केंद्र शासनाने ढिलाई दिल्यानंतर सर्वत्र बाजारपेठ फुलू लागल्या. खरेदी व व्यवसायासाठी नागरिक हजारोंच्या संख्येने बाहेर पडले. तर सहा महिन्यात केवळ डाळ-भात खाऊन वैतागलेल्या नागरिकांनी मोकळा श्वास घेत शहरात जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली.

परंतु गावातील एकही रस्ता सध्या सुरक्षित नाही. सर्वत्र पाऊस पडल्यामुळे शहरातील नळजोडण्या फुटल्या, जलवाहिन्या आणि गटारींमुळे रस्त्यावर खड्डे पडून पाणी साचत आहे. शहरात डबरवर शिडकाव केलेल्या डांबरीकरणाचे रस्ते एकाच पावसात उखडले जात असल्याने सर्वत्र डबकी तयार झाली आहेत. यामुळे डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत आहे. तसेच गटारमिश्रीत पाण्यामुळे अनेक रोगांनी ठाण मांडले आहे. तर वैद्यक कोरोना बाधेच्या भीतीने आपले दवाखानेच बंद ठेवत आहे. अशा परिस्थितीत दीपावली निमित्ताने नागरिक व व्यापारी वेगवेगळ्या प्रकारची खरेदी करण्यात मग्न आहेत. परंतु शहरात सर्वत्र वाहुतुकीचा बट्याबोळ झाला असल्याने वाहनचालक व नागरिकांतील वादाच्या फैरी उडत आहे. तर वयोवृद्ध नागरिक व वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अपघातांच्या प्रमाणाने शेवटचे टोक गाठले आहे. अशा परिस्थितीत नगराध्यक्ष, नगरसेवक, पालिका प्रशासन रोज येणार्‍या तक्रारींबाबत ‘रोज मरे त्यासाठी कोण मरे’ या प्रवृत्तीने दुर्लक्ष करत असल्याने शहरवासियांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

किमान दसरा, दीपावली सणाच्या काळात तरी सुधारणा होईल या आशेने नागरिक आपले दैनंदिन व्यवहार पार पाडत आहे. मात्र, माध्यमांतून समस्यांना वाचा फोडूनही पालिका प्रशासन काहीच हालचाल करताना दिसत नाहीये. याबात तातडीची बैठक घेतली नाही तर ऐन दीपावलीत पालिका प्रशासनाविरुद्ध शहरवासिय तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, असा उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

Visits: 30 Today: 1 Total: 306765

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *