सदाबहार गीतांच्या कार्यक्रमाने संगमनेरकर मंत्रमुग्ध! संगमनेर फेस्टिव्हल; पार्श्वगायक कुलकर्णीने प्रेक्षकांना डोलायला लावले


नायक वृत्तसेवा, संगमनेर
मनामनात दरवळणारी सुगंधीत गाणी.. सुमधूर आवाजातून सादर होणार्‍या एकामागून एक सुरेल रचना.. हिंदी, चित्रपट गीतांपासून ते अलिकडच्या काळात तरुणाईत प्रचंड गाजलेली सुफी गाणी व रिमिस.. निवेदकाचे समयोचित निवेदन आणि बहारदार संगीताने संगमनेर फेस्टिव्हलचा दुसरा दिवस गाजला. विविध दूरचित्र वाहिन्यांवरील कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या कलाकारांच्या सुमधूर आवाजातील गाण्यांनी सजलेल्या मैफीलीने संगमनेरकर रसिकांना मंत्रमुग्ध केले.

राजस्थान युवक मंडळ आणि मालपाणी उद्योग समूहाने आयोजित केलेल्या संगमनेर फेस्टिव्हलच्या दुसर्‍या दिवशी फेस्टिव्हलचे अध्यक्ष मनीष मालपाणी, सीए. कैलास सोमाणी, राणीप्रसाद मुंदडा, सोनू राजपाल, नवनीत कोठारी, सत्यम वारे, राजकुमार गांधी, अजित भोत आदिंच्या हस्ते गणरायांची आरती करण्यात आली.

चित्रपट सृष्टीतील पार्श्वगायनात अल्पावधीतच उंची गाठणार्‍या चैतन्य कुलकर्णी याच्यासह गौरी गोसावी, रवींद्र खोमणे व श्रावणी महाजन यांनी झी, सोनी आणि स्टार या वाहिन्यांवरील विविध कार्यक्रमांतून आपली प्रतिभा ठळकपणे उमटविली आहे. या तरुण गायकांच्या सुमधूर आवाजातील नव्या-जुन्या हिंदी चित्रपट गीतांवर आधारित असलेला ‘द बेस्ट ऑफ बॉलीवूड लाईव्ह’ हा बहारदार कार्यक्रम ऐकण्याची व पाहण्याची संधी संगमनेरकरांना मिळाली. तुडूंब भरलेल्या प्रेक्षागारासह रिमझिम कोसळणार्‍या पावसाच्या साक्षीने सुरु झालेल्या या कार्यक्रमाने एकामागून एक गाजलेली गाणी सादर करीत उपस्थितांना शेवटपर्यंत खिळवून ठेवले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला गायक रवींद्र खोमणे यांनी गणेश वंदना सादर केली. त्यानंतर पार्श्वगायिका गौरी गोसावी यांनी सादर केलेल्या सुफी गीताने उपस्थितांमध्ये टाळ्या आणि शिट्ट्यांचा अक्षरशः पाऊस पाडला. सूत्रसंचालकाच्या बहारदार निवेदनातून सादर होणार्‍या प्रत्येक गीताचा इतिहास उलगडला. चैतन्य कुलकर्णी याने सादर केलेल्या सुफी-हिंदी-पंजाबी रिमिस गीतांच्या तालावर तर अक्षरशः उपस्थितांना जागेवरच उभे राहून डोलायलाही लावले. जवळपास तीन तासांहून अधिक वेळ रंगलेल्या या संगीत मैफिलीचा शेवट वंदे मातरम्ने करण्यात आला.

Visits: 275 Today: 1 Total: 1423117

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *