सेवेचा ‘श्रीगणेशा’ ते ‘महासंचालकांचे’ पदक! संगमनेरच्या मातीशी नातं सांगणारा पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखेंचा गौरवशाली प्रवास..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
पोलीस दलातील कर्तव्यपूर्ती केवळ एक नोकरी नसून ते जनतेच्या सुरक्षेसाठी घेतलेले व्रत असते. या व्रताचे तंतोतंत पालन करत, आपल्या प्रदीर्घ आणि निष्कलंक सेवेच्या बळावर संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी खात्यातील अत्यंत प्रतिष्ठेचे ‘पोलीस महासंचालक पदक’ पटकावले आहे. ज्या संगमनेर तालुक्यातून 15 वर्षांपूर्वी त्यांच्या पोलीस सेवेचा ‘श्रीगणेशा’ झाला होता, त्याच भूमीत दीड दशकानंतर कर्तव्यपूर्तीचे हे सर्वोच्च शिखर सर करण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे. हा योग केवळ एका अधिकार्‍याच्या कारकिर्दीचा आलेख उंचावणारा नसून, संगमनेरच्या मातीशी असलेल्या त्यांच्या ऋणानुबंधावरही प्रकाश टाकणारा आहे.


शुक्रवारी (ता.15) अहिल्यानगर येथे आयोजित एका शानदार प्रशासकीय समारंभात जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, जिल्हाधिकारी पंकज आशिया आणि पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांना हे सन्मानपत्र व पदक प्रदान करण्यात आले. या पुरस्काराने त्यांच्या संवेदनशील आणि दबंग कार्यपद्धतीची चर्चा आहे. यावर्षी जिल्ह्यातून अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, तालुका पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, नियंत्रण कक्षातील मुक्तारखान पठाण, प्रल्हाद गिते आणि राज्य गुप्तवार्ता विभागाचे विशाल मेन्द्रे या पाच प्रमुख अधिकार्‍यांसह चार कर्मचार्‍यांना हा सर्वोच्च बहुमान प्राप्त झाला आहे.


पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या आजवरच्या प्रवासाचा आलेख पाहता, त्यात आव्हाने आणि क्लिष्ट गुन्ह्यांची मालिका दिसून येते. 15 वर्षांपूर्वी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर, त्यांनी अत्यंत क्लिष्ट गुन्ह्यांचे धागेदोरे शोधून आपल्या तपासातील कौशल्याची प्रचिती दिली होती. संगमनेर शहरात उद्भवलेल्या जातीय तणावाच्या काळात त्यांनी अत्यंत कणखर, निष्पक्ष आणि धाडसी भूमिका बजावली. परिस्थिती चिघळू न देता शहरात शांतता कायम ठेवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. आवेशात असलेल्या जमावात जावून त्यांच्याशी बोलणारा अधिकारी म्हणून त्यावेळी ‘दबंग’ अशी त्यांची प्रतिमा तयार झाली होती.


नाशिकमधील हर्सूल येथे आदिवासी समाजातील दंगलीत आणीबाणीच्या आणि स्फोटक स्थितीतही साळुंखे यांनी अतिशय संयमाने जमावाला नियंत्रित करुन शांत केले. केवळ कायदा-सुव्यवस्था राखणे नव्हे, तर गुन्हेगारीचा कणा मोडण्यात त्यांचा हातखंडा आहे. मनमाड येथे कार्यरत असताना, येवला येथील नाशिक जिल्हा बँकेची 50 लाखांची रोकड चोरी केवळ 24 तासांत उघडकीस आणून त्यांनी संपूर्ण मुद्देमालही हस्तगत केला होता. जळगाव जिल्ह्यातील नशिराबादचे प्रभारी अधिकारी असताना कोविड काळात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. सांगली जिल्ह्यातील पलूस पोलीस ठाण्याचे प्रभारी असताना, त्यांनी बनावट अपघाताचा छडा लावून तो खून असल्याचे उघड केले. नंदूरबारच्या गुन्हे अन्वेषण विभागात कार्यरत असतानाही त्यांनी अनेक गुन्ह्यांची उकल केली.


काळाची चक्र फिरली आणि दीड दशकानंतर पदोन्नती होऊन प्रवीण साळुंखे पुन्हा एकदा त्याच संगमनेर तालुक्यात पोलीस निरीक्षक म्हणून परतले. सध्या त्यांच्या कार्यकाळात संगमनेर तालुका पोलीस ठाणे विहित वेळेत गुन्हे निर्गतीकरण करण्यात आणि हद्दित शांतता अबाधित ठेवण्यात आघाडीवर आहे.


एखाद्या ठिकाणी तुमच्या सेवेला सुरुवात व्हावी आणि नंतर कालचक्राने महाराष्ट्राच्या चारही दिशांना फिरवून बढतीसह तुम्हाला पुन्हा त्याच ठिकाणी पोहोचवावं हे अकल्पनीय आहे. त्यातही पोलीस महासंचालकांकडून कामाचे कौतुक झाल्याचा आनंदही खूप मोठा आहे. या मातीशी माझे भावनिक नाते आहे, शेवटी माझ्या व्यावसायिक जीवनाची सुरुवातच येथून झालेली आहे. त्यातही हा बहुमानही मला इथेच कार्यरत असताना मिळाल्याने मी खूप आनंदी आहे. या सन्मानाने आणखी नवी ऊर्जा मिळाली असून त्याचे प्रतिबिंब अधिक गतीमान कामातून उमटतील हा आत्मविश्‍वास दुणावला आहे.
प्रवीण साळुंखे
पोलीस निरीक्षक, संगमनेर तालुका

Visits: 3 Today: 3 Total: 1814141

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *