माजीमंत्री थोरातांच्या गडात नव्या उत्तराधिकार्याचे संकेत? गांधींच्या विधानाने समीकरणांना धक्का; तांबे-थोरातांच्या वारशात नवा राजकीय अध्याय?..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला प्रश्न कोण जिंकणार हा नसून पुढे कोण? हा आहे. चार दशकांहून अधिक काळ काँग्रेसचा अभेद्य राजकीय बुरुज सांभाळणार्या माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचा राजकीय वारशाच्या उत्तराधिकारी कोण याची उत्सुकता दाटलेली असतानाच काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी नाशिकमध्ये दिलेल्या एका संदेशाने या चर्चेला अनपेक्षित धार आली आहे. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तरुण नेतृत्वाला संघटनेत पुढे आणायचे आणि आजचे कार्यकर्तेच उद्याचे आमदार-खासदार होतील, असे सांगणार्या राहुल गांधींच्या भूमिकेचा संगमनेरच्या राजकारणाशी संबंध जोडला जात असताना, थोरातांच्या राजकीय वर्तुळात नव्या पिढीची पावलं अधिक ठळक होताना दिसत आहेत.

काँग्रेसच्या ‘सृजन संघटन’ शिबिराच्या समारोपासाठी नाशिकमध्ये आलेल्या राहुल गांधींनी जिल्हाध्यक्षांशी संवाद साधला. या कार्यक्रमात संघटना तळागाळात नेण्याबरोबरच तरुण नेतृत्व तयार करण्यावर त्यांनी भर दिला. एवढेच नव्हे तर शारीरिक तंदुरुस्ती, आत्मरक्षण आणि मानसिक क्षमता यांचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी जिल्हाध्यक्षांसमोर मार्शल आर्टचे प्रात्यक्षिकही करुन दाखवले. पुढील निवडणुकांमध्ये शिबिरार्थींमधून आमदार घडतील, असा सूचक विश्वास व्यक्त करत त्यांनी काँग्रेसच्या पारंपरिक राजकीय चौकटीत अमुलाग्र बदलांचे थेट संकेत दिले. त्यामुळे नाशिकमधील त्यांचे भाषण केवळ प्रशिक्षण शिबिराचा समारोप न राहता काँग्रेसच्या भावी नेतृत्वाची दिशा ठरवणारा राजकीय संदेश ठरला आहे.

त्यांच्या या संदेशाला संगमनेरच्या राजकारणात वेगळे महत्त्व प्राप्त होण्याचे कारण ओझर विमानतळावरील त्यांच्या आगमनप्रसंगात आहे. विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ.जयश्री उपस्थित होत्या. स्वागता दरम्यान त्यांचा थोरात यांच्या कन्या म्हणून परिचय झाल्यानंतर राहुल गांधी यांनी त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. हा प्रसंग औपचारिक असला तरी त्याच दिवशी राहुल गांधींनी काँग्रेसच्या भविष्यासाठी तरुण नेतृत्वाचा उच्चार करणे आणि संगमनेरच्या राजकीय वारशाशी संबंधित नव्या पिढीचा चेहरा त्यांच्या संपर्कात येणे, या दोन घटनांची राजकीय सांगड घालण्याचा मोह दैनिक नायकला आवरता येत नाही.

मागील विधानसभा निवडणुकीत थोरातांच्या राजकीय समीकरणाला मोठा धक्का बसला होता. चार दशकांच्या त्यांच्या राजकीय वर्चस्वाला पहिल्यांदाच शिवसेनेचे गंभीर आव्हान मिळाले. तत्पूर्वी आपल्या राजकीय वारशाची पुढील दिशा निश्चित करण्याच्या त्यांच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. सामाजिक कामाच्या माध्यमातून सार्वजनिक जीवनात स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न, एकवीरा फाउंडेशनच्या माध्यमातून तरुणी आणि महिलांशी निर्माण झालेला संपर्क आणि त्यानंतर तालुका काँग्रेसच्या संघटनात्मक कामात वाढलेला सहभाग, या घडामोडींकडे स्वतंत्र घटनांप्रमाणे न पाहता मोठ्या राजकीय प्रक्रियेचा भाग म्हणून पाहिले जात आहे.

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या राजकीय प्रवासाचा विचार करता त्यांच्या कुटुंबाभोवती उभ्या असलेल्या राजकीय वर्तुळाकडे दुर्लक्ष करता येत नाही. त्यांचे मेव्हणे डॉ.सुधीर तांबे यांनी विधानपरिषदेच्या राजकारणात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. त्यांची बहीण दुर्गा तांबे यांनीही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून आपला राजकीय ठसा उमटवला. पुढे याच राजकीय परिवारातील सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसच्या पारंपरिक वाटेऐवजी अपक्ष राजकारणाचा प्रयोग केला आणि तो यशस्वी करुन दाखवला. त्यामुळे थोरात-तांबे परिवाराचा राजकीय प्रभाव एकाच दिशेने वाहणारा राहिला नाही, त्यातून वेगवेगळ्या राजकीय भूमिका आणि वाटा निर्माण झाल्या आहेत.

विशेषतः आमदार सत्यजीत तांबे यांची भूमिका संगमनेरच्या आगामी राजकारणातील महत्त्वाचा घटक ठरणार आहे. काँग्रेसच्या पारंपरिक राजकीय चौकटीतून त्यांनी स्वतःला वेगळे केले असले तरी त्यांची राजकीय मुळं मात्र याच प्रभावक्षेत्रात खोलवर रुजलेली आहेत. त्यामुळे एका बाजूला थोरातांच्या काँग्रेस विचारांचा वारसा, दुसर्या बाजूला सत्यजीत तांबे यांची स्वतंत्र राजकीय वाटचाल आणि तिसर्या बाजूला महायुतीची वाढतीताकद, अशा तिहेरी प्रवाहाच्या छेदनबिंदूवर 2029 चे राजकारण उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मात्र त्याचवेळी येथूनच थोरातांसमोरील खरी राजकीय कसरत सुरु होते. पराभव पचवून पक्षाच्या विचारांशी असलेली निष्ठा कायम ठेवणे ही त्यांची एक बाजू असली, तरी त्यांच्या राजकीय वारशाला पुढील पिढीपर्यंत सुरक्षितपणे हस्तांतरित करणे ही त्यापेक्षा खूप मोठी कसोटी ठरणार आहे. काँग्रेसला राज्यात पुन्हा उभे करण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न आणि थोरातांकडून संगमनेरमध्ये सुरु झालेली संघटनात्मक पिढीबदलाची प्रक्रिया यांचा मेळ बसला, तर स्थानिक राजकारणात मोठा बदल घडू शकतो. मात्र त्यासाठी केवळ कौटुंबिक वारसा पुरेसा ठरणार नाही. नव्या नेतृत्वाला स्वतःचे राजकीय व्यक्तिमत्त्व, संघटनशक्ती आणि मतदारांशी स्वतंत्र नाते सिद्ध करावे लागेल. यामुळेच नाशिकमधील राहुल गांधींचे वक्तव्य संगमनेरसाठी एक प्रकारे राजकीय आरसाच ठरले आहे. ‘ज्येष्ठांच्या सावलीतून तरुण नेतृत्वाकडे’ हा काँग्रेसचा प्रवास खरोखर सुरु झाला, तर त्याचा पहिला मोठा प्रयोग पारंपरिक बालेकिल्ल्यांमध्ये पाहायला मिळू शकतो. संगमनेर त्यासाठी सर्वाधिक नैसर्गिक प्रयोगभूमी ठरु शकते.

माजीमंत्री थोरात यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण? या प्रश्नाचे उत्तर आजवर अधिकृतपणे मिळालेले नाही. मात्र उत्तराधिकारी जाहीर करण्यापूर्वी त्याला राजकीय मैदान तयार करुन देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे का, हा प्रश्न आता अधिक महत्त्वाचा ठरणार आहे. तालुका काँग्रेसमधील सक्रियता, तरुणाईशी वाढता संपर्क, सामाजिक कामाचा विस्तार आणि देशपातळीवरील नेतृत्वाशी निर्माण होणारा संवाद या सगळ्या धाग्यांची वीण एकत्र पाहिली, तर आगामी काळात संगमनेरच्या राजकारणात एका नव्या चेहर्याची भूमिका केवळ समोर येण्याचेच संकेत मिळतात.

2029 च्या विधानसभा निवडणुकीला अजून बराच अवकाश आहे. त्यामुळे आजच राजकीय गणितं मांडणे घाईचे ठरेल. मात्र राजकारणात निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच समीकरणे तयार होतात आणि उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच राजकीय चेहरे घडवले जातात. संगमनेरमध्ये सध्या सुरु असलेल्या हालचाली त्याचाच भाग आहेत का, याचे उत्तर येणारा काळच देईल. मात्र माजीमंत्री थोरात यांच्या राजकीय वारशाचा पुढचा अध्याय आता केवळ भूतकाळातील प्रवासातून लिहिला जाणार नाही, तर त्यासाठी नव्या पिढीचे राजकीय पान उघडले जाईल हे निश्चित.

संगमनेरच्या राजकारणाचे गणित आता विजय-पराभवापेक्षाही अधिक गुंतागुंतीचे बनले आहे. थोरातांचा काँग्रेसमधील प्रदीर्घ वारसा, तांबे परिवारातून पुढे आलेली स्वतंत्र राजकीय वाटचाल आणि महायुतीकडून मिळणारे कडवे आव्हान, या तीनही गोष्टींची दिशा 2029 च्या आधी ठरवली जाणार आहे. त्यामुळे नव्या पिढीच्या नेतृत्वाला थोरातांचा वारसा आपल्या राजकीय ओळखीत रुपांतरित करण्यासह आमदार सत्यजीत तांबे यांच्या स्वतंत्र प्रभावाचा सामना आणि महायुतीच्या संघटनात्मक आव्हानाला प्रत्यूत्तर देण्याचे दिव्य पार पाडावे लागणार आहे.

