हिंदू व मुस्लिम दोघांनाही नकोत मग कोणासाठी सुरु आहेत? संगमनेरचे गोवंश कत्तलखाने; मुस्लिम समाजाच्या विरोधानंतर पुन्हा चर्चेत..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तीन वर्षांपूर्वी अहमदनगर पोलिसांच्या सर्वात मोठ्या छाप्यानंतर संगमनेरातील बेकायदा कत्तलखान्यांचा विषय राज्यभर चर्चेत आला होता. त्यावेळी हिंदू समाजाने मोठे आंदोलन केल्यानंतर काहीकाळ पोलिसांनी ते कडकडीट बंदही केले. मात्र त्यानंतर अल्पावधीतच आता बंद असलेले सगळेच कत्तलखाने जोमात सुरु झाले आहेत. त्यातून पैगंबर जयंतीला वाद निर्माण झाल्याने आता मुस्लिम धर्मियांकडूनही त्या विरोधात आवाज उठवण्यात आला असून कारवाईसाठी गुरुवारी पोलिसांना निवेदनही देण्यात आले आहे. याचाच अर्थ पिढ्यान् पिढ्या शांततेत नांदणार्‍या या दोन्ही समुदायांना आपल्या आरोग्यासह शहरी शांततेसाठी संगमनेरातील कत्तलखाने नकोसे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र असे असतानाही पोलिसांकडून कोणतीही कठोर कारवाई होत नसल्याने मोठे आश्‍चर्य निर्माण झाले असून सदरील कत्तलखाने कोणासाठी सुरु आहेत असाही प्रश्‍न उपस्थित झाला आहे.


तीन वर्षांपूर्वी 2 ऑक्टोबर 2021 रोजी पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके यांच्या नेतृत्त्वाखाली अहमदनगर पोलिसांनी भारतनगर परिसरातील साखळी कत्तलखान्यांवर एकाचवेळी छापा घालून 31 हजार किलो गोवंशाच्या कापलेल्या मांसासह जवळपास सव्वा कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यावेळी नवाज जावेद कुरेशी या कसायाच्या वाड्यात पोलिसांना तीन वेगवेगळ्या डायर्‍याही सापडल्या होत्या. त्या डायर्‍यांमधील काही नावेही त्यावेळी चांगलीच चर्चेत आली होती. राज्यातील आजवरच्या सर्वात मोठ्या समजल्या जाणार्‍या त्या कारवाईतून संगमनेरातील गोवंश कत्तलखान्यांचे भयाण वास्तवही समोर आल्याने त्या विरोधात हिंदुत्त्ववादी संघटनांनी मोठे आंदोलन उभारले होते. त्यामुळे दबावात आलेल्या पोलिसांनी एकाही गोवंशाची कत्तल होवू देणार नाही अशी वल्गना करीत भारतनगरमधील कत्तलखाने पाडण्यात आल्याचा बनावही रचला.


मात्र त्यानंतर काही महिन्यातच सगळेच कत्तलखाने पुन्हा उभेही राहिले आणि त्यातून दररोज मोठ्या प्रमाणात गोवंशाचे बळीही दिले जावू लागले. गेल्याच आठवड्यात कसायांचे वाहन पकडले म्हणून 20 ते 25 जणांच्या टोळक्याने हिवरगाव टोलनाक्यावर जावून धुडगूस घातला आणि बजरंग दलाचे संयोजक कुलदीप ठाकूर यांना जीवे ठार मारण्याची धमकी भरीत पकडलेले वाहनही पळवून नेले होते. त्यावेळीही तालुका पोलिसांची भूमिका गायींच्या रक्ताचे ओघळ त्यांच्यापर्यंत पोहोचत असल्याचे सांगणारी ठरली. आतातर मुस्लिम समाजातील एका मोठ्या गटानेच त्या विरोधात आवाज उठवला असून पोलिसांना दिलेल्या निवेदनात यामागील घटनांचाही उल्लेख केला आहे. त्यामुळे जी गोष्ट हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही समाजाला नकोय मग ती गोष्ट नेमकी कोणाला हवी आहे असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.


याबाबत गुरुवारी (ता.19) मोर्चाने पोलीस ठाणे गाठून मुस्लिम समाजाच्या एका गटाने येथील कत्तलखान्यांविरोधात कारवाईसाठी दिलेल्या निवेदनात अनेक धक्कादायक गोष्टी नमूद केल्या आहेत. त्यानुसार शहरातील भारतनगर, मौलाना आझाद मंगल कार्यालयाच्या पाठीमागील बाजू, जमजम कॉलनी या भागात सर्रासपणे गुंडशाहीने गोवंशाची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असल्याचा स्पष्ट उल्लेख केला होता. या भागात होणार्‍या कत्तलीतून काढले जाणारे गोमांस केवळ राज्यातच नव्हेतर थेट आंध्रप्रदेशची राजधानी हैद्राबाद, कर्नाटकातील गुलबर्गा येथेही दररोज पाठवले जात असल्याचे सांगण्यात आले आहे.


वरील परिसरात केल्या जाणार्‍या गोवंशाच्या कत्तलीतून निघणारे टाकावू अवयव व जनावरांचे रक्त बेदरकारपणे आझाद मंगल कार्यालयाच्या पाठीमागील बाजूने वाहणार्‍या नाटकी नाल्यात टाकले जातात. त्यामुळे आसपासच्या परिसरात दुर्गंधी पसरुन तेथील रहिवाशांना विविध आरोग्य समस्यांनी पछाडल्याचाही उल्लेख निवेदनात आहे. याबाबत तेथील स्थानिकांनी कत्तल करणार्‍यांसह नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाला वेळोवेळी आर्जवेही केली, मात्र त्याचा कोणाताही परिणाम ना यंत्रणांवर झाला, ना कसायांवर. उलट प्रत्येक तक्रारीनंतर कसायांच्या दादागिरीत वाढच होत गेल्याने त्याचे पडसाद थेट पैगंबर जयंतीसारख्या पवित्र सणाच्या मिरवुणकीतही उमटल्याचे बघायला मिळाले.


याच निवेदनात कसायांच्या दादागिरीमागे त्यांना मिळणारे पोलिसांसह राजकीय पुढार्‍यांचे आशीर्वाद कारणीभूत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. येथील कत्तलखान्यांचा केवळ हिंदू समाजालाच नव्हेतर मुस्लिम समाजालाही तितकाच त्रास होत असल्याचे आणि त्यातून आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाल्याने ते पूर्णतः बंद करण्याची मागणीही करण्यात आली आहे. तीन वर्षांपूर्वी या विषयावरुन हिंदू समाजाने केलेल्या आंदोलनानंतर काही दिवस बंद असलेले कत्तलखाने आजच्या स्थितीत सुरळीतपणे सुरु असल्याचा दावाही या निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.


एकंदरीत संगमनेरातील बेकायदा गोवंश कत्तलखान्यांचा हिंदू धर्मियांसोबतच आता मुस्लिम समाजालाही त्रास होवू लागल्याने संगमनेरचे कत्तलखाने पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यातून ज्या गोष्टीला हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजाचा तीव्र विरोध आहे, मग ती गोष्ट नेमकी कोणाच्या आर्थिक हितासाठी सुरु आहे असाही प्रश्‍न समोर आला आहे. त्यातून वारंवार संगमनेरात जातीय तणावाची स्थिती निर्माण होत असून पैशांच्या लालसेपोटी पोलिसांकडून शहर अशांत करणार्‍यांना पाठबळ दिले जात असल्याचेही समोर येवू लागले आहे. आता मुस्लिम समाजानेच या विषयावर सविस्तर झोत टाकल्याने उघडे पडलेले पोलीस नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


यंत्रणांना हाताशी धरुन तीन वर्षांपूर्वी बंद पडलेले सर्वच गोवंश कत्तलखाने पुन्हा नव्याने उभारण्यात नवाज जावेद कुरेशी याचा मोठा हातभार असल्याचा उल्लेख मुस्लिम समाजाच्या निवेदनात आहे. मध्यंतरी पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी त्याच्या विरोधात कठोर भूमिका घेत शहर पोलिसांना त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव पाठवण्याचा आदेशही दिला होता. मात्र तत्कालीन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी पाठवलेल्या प्रस्तावात जाणीवपूर्वक त्याच्या नावातच बदल केल्याने नोटीस बजावण्यासाठी पोलिसांना शेवटपर्यंत त्याचा शोध लावता आला नाही. त्यावरुन येथील कत्तलखान्यांना कोणाचे पाठबळ आहे हे पुन्हा एकदा ठळकपणे समोर आले होते. आता पुन्हा एकदा कत्तलखान्यांच्या या म्होरक्यासह जवळपास अर्धाडझन कसायांची नावे समोर आल्याने पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख त्या विरोधात काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Visits: 281 Today: 3 Total: 1585322

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *