अंधश्रद्धेच्या बाजारात ‘शिवपुराण’ कथेचा बनाव! भोंदू गडगेचे साम्राज्य कर्माच्या फेर्‍यात; हायटेक डिजिटल रुमही सापडली..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील पुसट रेषेचा फायदा घेत, सामान्य जनतेच्या अगतिकतेवर आपले आर्थिक साम्राज्य उभे करणार्‍या वडगावपान येथील तथाकथित ‘दत्तधाम सरकार’ अर्थात राजेंद्र बापू गडगे याच्या पापाचा घडा अखेर भरला आहे. स्वतःला दैवी शक्तीचा अवतार म्हणवून घेणारा आणि कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराच्या गाठी केवळ हाताच्या स्पर्शाने वितळवण्याचा दावा करणार्‍या या भोंदू बाबाचा पर्दाफाश संगमनेर तालुका पोलिसांनी केला. त्याच्या तपासात आता धक्कादायक माहिती समोर आली असून, आपले काळे साम्राज्य पाढरे करण्यासाठी हा भोंदू लवकरच आपला मार्ग बदलून ‘शिवपुराण’ कथावाचक म्हणून स्वतःला प्रस्थापित करण्याच्या तयारीत होता, मात्र तत्पूर्वीच तो कर्माच्या फेर्‍यात अडकला आणि त्याचा बनाव उघड झाला.


गेल्या काही वर्षांपासून देशभरात आणि राज्यात शिवपुराण कथेचे मोठे ‘फॅड’ निर्माण झाले आहे. श्रोत्यांची मिळणारी अलोट गर्दी आणि त्यातून मिळणारी प्रतिष्ठा पाहून राजेंद्र गडगे याने आपला मोर्चा आता कथावाचनाकडे वळवण्याचा घाट घातला होता. आपल्याला कधीही अटक होऊ शकते किंवा आपला हा बनाव उघडकीस येऊ शकतो, याची कुणकूण त्याला लागली होती. त्यामुळेच, ‘दैवी शक्तीने आजार बरे करतो’ या दाव्याला धार्मिक कथावाचनाची जोड देऊन समाजात आपली प्रतिमा उजळवण्याचा त्याचा कट होता.


पोलीस तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, त्याने आपल्या मालकीच्या सहा एकर जमिनीवर कथावाचनासाठी भव्य-दिव्य तयारीही सुरु केली होती. एकदा का ‘कथावाचक’ म्हणून मोहोर उमटली की, पोलीस किंवा प्रशासन आपल्या वाटेला जाणार नाही, असा त्याचा कयास होता. मात्र, ‘पेरावे तसे उगवते’ या उक्तीप्रमाणे त्याच्या कर्माने त्याला खिंडीत गाठले आणि कथावाचक होण्यापूर्वीच त्याची रवानगी कारागृहात झाली.


वडगावपान येथील ‘दत्तधाम’ हा आश्रम केवळ भक्तांच्या दर्शनासाठी नव्हता, तर ते एक आधुनिक मार्केटिंग केंद्र होते. पोलिसांनी केलेल्या झाडाझडतीत या आश्रमात एक अत्यंत आलिशान आणि ‘हायटेक डिजिटल रुम’ सापडली आहे. या रुमचे स्वरुप पाहून खुद्द पोलीसही चक्रावून गेले. या रुममध्ये उच्च दर्जाचे ग्राफिक्स असलेले महागडे संगणक, व्यावसायिक कॅमेरेे आणि व्हिडिओ एडिटिंगसाठी लागणारी अत्याधुनिक इलेक्ट्रिक साधने आढळली आहेत. येथूनच भोंदू बाबाचे ‘चमत्कार’ दाखवणारे व्हिडिओ तयार केले जात होते. रुग्णांना बरे केल्याचे खोटे दावे करणारे व्हिडिओ एडिट करुन यूट्यूब आणि फेसबुकवर प्रसारित केले जात, जेणेकरुन लांबून येणारे भक्त या जाळ्यात अडकतील.


यासर्व तांत्रिक विभागाची जबाबदारी राजेंद्र गडगे याचा मुलगा शिवम गडगे सांभाळत असल्याचेही समोर आले आहे. बापाचा अंधश्रद्धेचा बाजार ‘ग्लोबल’ करण्यासाठी मुलाने तंत्रज्ञानाचा आधार घेतला होता. त्यामुळे शिवम गडगे याच्यावरही अटकेची टांगती तलवार असून, त्याला या प्रकरणात सहआरोपी केले जाण्याची दाट शक्यता आहे. संगमनेर तालुका पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये मुख्य सूत्रधार राजेंद्र गडगे याच्यासह अन्य एकाला अटक करण्यात आली आहे. आज त्यांची पाच दिवसांची पोलीस कोठडी संपत असून, तपासात मिळालेले नवीन धागेदोरे पाहता पोलीस न्यायालयात वाढीव कोठडीची मागणी करणार आहेत.


उर्वरित तीन आरोपी अद्याप फरार असून, त्यांनी अटकेपासून वाचण्यासाठी न्यायालयात ‘अटकपूर्व जामीन’ मिळवण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. मात्र, पोलिसांनी त्यांच्या विरोधात भक्कम पुरावे गोळा केले असून, तांत्रिक विश्लेषणाअंती या प्रकरणात आणखी काही जणांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. भोंदू राजेंद्र गडगे कर्करोगाच्या रुग्णांना लक्ष्य करत असे. तुमच्या शरीरातील गाठी मी दैवी शक्तीने वितळवून टाकीन, असा दावा करुन तो रुग्णांना वैद्यकीय उपचार घेण्यापासून परावृत्त करत असल्याचेही समोर आले आहे. आधुनिक वैद्यकशास्त्राला आव्हान देणार्‍या या भोंदूगिरीमुळे अनेकांचे प्राण धोक्यात आले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भोंदूकडून फसवणूक झालेल्या रुग्णांनी पुढे यावे असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.


तालुका पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे आणि त्यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास अत्यंत बारकाईने सुरु ठेवला आहे. जप्त करण्यात आलेल्या संगणकातील डेटा, संशयास्पद बँक व्यवहार आणि आश्रमातील कागदपत्रे यांची कसून चौकशी केली जात आहे. केवळ संगमनेरच नव्हे, तर जिल्ह्याबाहेरील अनेक लोक या जाळ्यात अडकल्याची शक्यता असल्याने या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे दिसत असून पोलिसांनी त्याच्या मालमत्तेचा शोध घेण्यासाठी संबंधित विभागांशी पत्रव्यवहारही केला आहे.


आम्ही डिजिटल पुराव्यांचे सखोल विश्लेषण करत आहोत. या प्रकरणाच्या तपासात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता असून वैद्यक कायद्यान्वये कारवाई देखील प्रस्तावित आहे. भोंदूगिरीला खतपाणी घालणार्‍या कोणाचीही गय केली जाणार नाही. नागरिकांनी अशा चमत्कारांवर विश्वास न ठेवता विज्ञानाची कास धरावी.
– डॉ.कुणाल सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर

Visits: 2 Today: 2 Total: 1744998

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *