राजेंद्र गडगेच्या भोंदूगिरीला आता कायद्याचा ‘महाफास’! ‘पीसीपीएनडीटी’ंअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश; गडगे प्रकरणात आणखी एका महिला तक्रारदाराची ‘एन्ट्री’..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अंधश्रद्धेच्या नावाखाली गोरगरीब जनतेची आर्थिक आणि मानसिक लूट करणार्या वडगाव पान येथील ‘दत्तधाम सरकार’ या तथाकथित केंद्राचा सूत्रधार राजेंद्र बापू गडगे याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. संगमनेर तालुका पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायद्यान्वये बेड्या ठोकल्यानंतर, आता जिल्हा आरोग्य विभागानेही या भोंदूविरुद्ध एल्गार पुकारला आहे. उघडपणे ‘मुलगा’ होण्यासाठी औषधोपचार करण्याचा दावा करुन पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गडगे विरुद्ध तातडीने फौजदारी खटला दाखल करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिले आहेत. या नवीन कारवाईमुळे या भोंदूसह त्याच्या टोळीला आता दीर्घकाळ कोठडीत घालवावा लागणार आहे. गेल्या तीन दशकांपासून सुरु असलेल्या या उद्योगातून भोंदू गडगेने प्रचंड माया जमवली असून त्याचा शोध आणि मोजदाद सुरु आहे, त्यातून एकूण संपत्ती समोर आल्यानंतर गडगेचा पाय आणखी खोलात जाण्याचीही शक्यता आहे.

अंनिसच्या राज्यसचिव रंजना गवांदे यांच्या तक्रारीचा आधार घेत तालुका पोलिसांनी वडगावपानचा भोंदूबाबा राजेंद्र गडगे याला अटक केली होती. सध्या तो पोलीस कोठडीत असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. ‘दत्तधाम सरकार’ नावाने सुरु असलेल्या त्याच्या आश्रमात येणार्या रुग्णांचे प्रकार आणि त्याच्याकडून केले जाणारे उपचार याची सांगड घालण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरु आहे. त्यातच लेक लाडकी अभियानाच्या अॅड.वर्षा देशपांडे यांनी नोटीस पाठवित या भोंदूच्या आश्रमात येणार्या महिलांना ‘पुत्रप्राप्ती’साठी औषधे दिली गेल्याचे व तो उपचार यशस्वी झाल्याचा दावा केल्याचे पुरावे सादर करुन जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले होते. संबंधित भोंदूने पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केल्याने त्याच्यावर 15 दिवसांत प्रचलित कायद्यान्वये कारवाई न झाल्यास हेच पत्र कायदेशीर नोटीस समजून ‘लेक लाडकी अभियाना’मार्फत थेट न्यायालयात दाद मागितली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला होता.

त्याची गांभीर्याने देखल घेत जिल्हा शल्यचिकित्सकांनी घुलेवाडीच्या वैद्यकीय अधीक्षकांना ‘तालुका समुचित प्राधिकारी’ म्हणून नियुक्त केले असून, 15 दिवसांच्या आत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्यांकडे राजेंद्र गडगे विरोधात पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम 6, 22, 25 आणि 26 चे उल्लंघन केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या ‘सरकार’ आणि त्याच्या टोळीच्या समस्या आणखी वाढणार आहेत.

राजेंद्र गडगे सध्या पोलीस कोठडीत असतानाच, जिल्हा शल्यचिकित्सकांनी त्याला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावून तात्काळ खुलासा सादर करण्याचेही आदेश दिले आहेत. केवळ गडगेच नव्हे, तर त्याला या अघोरी कृत्यात मदत करणार्या इतर सहकार्यांचा शोध घेऊन त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे ‘दत्तधाम’च्या नावाखाली रुग्णलुटीचा उद्योग करणार्या या टोळीचे धाबे दणाणले आहेत. अशा प्रकारे ‘पुत्रप्राप्ती’ किंवा ‘गंभीर आजार’ बरे करण्याचे दावे करणार्या भोंदूंच्या आमिषाला बळी पडू नका, विज्ञानाचा आधार घ्या आणि अशा फसवणुकीची माहिती तात्काळ प्रशासनाला द्या, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. धर्माच्या आडोशाने अधर्माचा बाजार मांडणार्या गडगे टोळीवर आता आरोग्य विभागाचा प्रहार म्हणजे अंधश्रद्धेविरुद्धच्या लढ्यातील मोठा विजय आहे. विज्ञानाला आव्हान देणार्या या भोंदूचा परिपूर्ण ‘इलाज’ आता कायद्याच्या दवाखान्यातच होणार हे मात्र निश्चित.

कॅन्सरसारख्या असाध्य रोगाच्या गाठी पातळ करण्याची सोशल माध्यमात जाहिरात करुन हा भोंदू आणि त्याची टोळी सर्वप्रकारचे वैद्यकीय उपचार करुन हात टेकलेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये आशेचा किरण जागवायचे. त्यानंतर जगण्याच्या आशेने ‘तो’ रुग्ण भोंदूच्या संपर्कात यायचा आणि तेथूनच लुटीचा खेळ सुरु व्हायचा. अशाचप्रकारे सोशल जाहिराती करुन पुत्रप्राप्तीसाठीच्या आपल्या उपचाराने अनेक महिलांना यश आल्याचा दावा केल्याचा पुराव्यासह आरोपही करण्यात आला आहे. यासर्व भोंदूगिरीतून राजेंद्र गडगेनेे प्रचंड माया जमवली आहे. दहावीपर्यत जाताजाता शिक्षणाचा गाडा उलटलेल्या या भोंदूला अलिशान वाहनांचा मात्र भारी शोक असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. त्याच्या एकूण संपत्तीचाही शोध घेतला जात असून त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त झाल्याची चर्चा असल्याने या प्रकरणात आयकर विभागाची ‘एन्ट्री’ होण्याची शक्यता आहे.

