अरे देवा! शिपाई हाकतोय स्थानिक गुन्हे शाखाचा गाडा? संगमनेरच्या अवैध धंद्यांवर नगरी ‘धाक’; सगळ्याच तडजोडीने मात्र गुन्हेगारीत वाढ..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
पोलीस अधीक्षकांना आपापल्या कार्यक्षेत्रात सगळीकडेच पोहोचणे अशक्य असल्याने स्थानिक गुन्हे शाखेची संकल्पना राबविली जाते. स्थानिक पोलीस ठाणे आणि मुख्यालय यांच्यातील दुव्याचे काम करतानाच ‘एखाद्या’ किचकट प्रकरणात अधीक्षकांच्या आदेशाने तपासाची सूत्रे हाती घेत तो तडीस लावण्याची भूमिकाही ‘एलसीबी’ नावाने ओळखल्या जाणार्‍या या शाखेला सांभाळावी लागते. सोबतच अधीक्षकांच्या मनाईनंतरही कार्यक्षेत्रात कोठेही अवैध व्यवसाय सुरु असल्यास त्यावर थेट कारवाई करण्याचे अधिकारही या शाखेकडे असतात. साहजिकच त्यामुळे जिल्ह्यातील कानाकोपर्‍यात ‘एलसीबी’चा मोठा दरारा असतो. परंतु गेल्या काही काळापासून या शाखेतून अनागोंदीच्या खबरा उसळू लागल्या असून जिल्ह्यात घडणार्‍या सगळ्याच घटना आणि घडामोडींसह अवैध व्यवसायावर थेट नियंत्रण मिळवण्याचे प्रकार वाढले आहेत. श्रीगोंदे तालुक्यातील खून प्रकरणाच्या तपासापासून संगमनेरात ‘एलसीबी’चा वेगळाच ‘धाक’ निर्माण झाला असून त्यातून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होवू लागली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सध्या एलसीबीत कार्यरत असलेला एक पोलीस शिपाईच शाखेचा गाडा हाकीत असल्याचीही जोरदार चर्चा कानावर आली आहे. अर्थात या गोष्टीच्या सत्यतेवर दैनिक नायक भरवसा ठेवीत नाही. यावरुन एलसीबीकडून जिल्ह्यात सुरु असलेला ‘धिंगाणा’ मात्र ठळकपणे समोर येवू लागला आहे.

गणेशोत्सवादरम्यान श्रीगोंदा तालुक्यात सापडलेल्या अनोळखी इसमाच्या खुनाचे धागेदोरे संगमनेरपर्यंत पोहोचले होते. हा सगळा प्रकार घडण्यापूर्वी आरोपींनी मयतासाठी एका डॉक्टरकडून भुलीच्या इंजेक्शनची चिठ्ठी घेवून रुग्णालयाच्या बाजूलाच असलेल्या मेडिकलमधून ते घेतले होते. या खून प्रकरणाचा तपास साहजिकच श्रीगोंदा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखाही समांतरपणे करीत होती. आरोपींचा माग काढीत शाखेचे एक पथक खासगी वाहनातून संगमनेरात आले होते. त्यांनी सुरुवातीला संबंधित डॉक्टर आणि त्यानंतर औषध दुकानदार या दोघांनाही उचलले. आडवळणाच्या रस्त्यावरील ढाब्यांवर नेवून त्यांना ‘धाक’ दाखवला गेला आणि मोठा कार्यक्रम करुन त्यांना मुक्तही करण्यात आले.

याच प्रकरणात आरोपी असलेला मनोज गोसावी हा भाजीपाला व्यापारी आहे. त्यामुळे त्याचा नियमितपणे अन्य भाजीपाला व्यापार्‍यांशीही संपर्क होत असे. या प्रकरणाचा ‘खोलवर’ तपास करीत एलसीबीच्या पथकाने गुन्ह्याच्या पहिल्या दिवशी व घटनेच्या दिवशीच्या ‘सीडीआर’नुसार या व्यापार्‍यांकडेही चाचपणी केली. जिल्ह्यात सध्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या चोर्‍या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मात्र त्यांचा क्वचितच तपास लागल्याची उदाहरणे आहेत. मध्यंतरी समोर आलेल्या घटनेतून चोरलेल्या गाड्यांचे सुटे भाग करुन ते भंगारवाल्यांना विकले जात असल्याचे समोर आले होते. एलसीबीने त्याचाही तपास हाती घेत जिल्हाभर आपला दरारा निर्माण केला. संगमनेरात तर वेगळाच ‘धाक’ निर्माण झाला आहे.

काही दिवसांपूर्वी घारगाव शिवारात मोठ्या प्रमाणात सुपारी आणि सुगंधीत तंबाखू पकडण्यात आली होती. अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनेच मिळालेल्या माहितीच्या आधारावर हा प्रताप गाजवला होता. कौतुकाच्या मथळ्यांनी शाबासकीची थाप मिळालेल्या एलसीबीने नंतर आपले सगळेच लक्ष संगमनेरकडे वळविले. वास्तविक गुटख्याचा ‘तो’ माल पुणे जिल्ह्याच्या हद्दीत पकडला गेला होता, मात्र तो अचानक घारगाव शिवारात प्रकटला. त्याशिवाय संबंधित पुरवठादाराकडे मोठ्या प्रमाणात रोकडही होती, प्रत्यक्षात ती कोठेही दर्शविण्यात आली नाही अशीही जोरदार चर्चा घारगाव परिसरात सुरु आहे.

मध्यंतरी संगमनेर खुर्दमधील जुगार अड्ड्यावर छापा घालण्यातही जिल्ह्यात अचानक कर्तव्यदक्ष झालेल्या स्थानिक गुन्हे शाखेचाच सिंहाचा वाटा होता. या प्रकरणाचा शेवटही जवळजवळ झाला होता, मात्र एका पत्रकाराने छाप्याबाबतची माहिती विचारल्याने पुढील योजना रद्द करावी लागली. अहमदनगर नंतर संगमनेरातील गुन्हेगार व अवैध व्यावसायिकांवर एलसीबीकडून वेगळाच ‘धाक’ निर्माण केला जात असून त्यामुळे संगमनेरातील गुन्हेगारी कारवायांमध्ये वाढ होवू लागली आहे. शिवाय शहरात सगळ्याच प्रकारच्या अवैध धंद्याचे अक्षरशः स्तोम माजल्याचे दिसत असून सर्वत्र अनागोंदी माजल्याचे चित्र दिसत आहे.


‘साहेब, थोडं जिल्ह्याकडे बघा; आपण पालक आहात हो आमचे’…

जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिले जाते. त्यांच्याच जिल्ह्यातील बहुतेक सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये सध्या असेच प्रकार सुरु आहेत. कोणाचेही कोणावर नियंत्रण नसल्यागत सर्वत्र फक्त गल्ले भरण्याची स्पर्धा लागली असून गुन्हेगारीचा स्तर वाढण्यासोबतच तपासाची गती मात्र शून्याकडे जात आहे. वाळू धोरणाचाही बट्ट्याबोळ झाल्याने तस्करांच्या मनमानीत सामान्य माणूस भरडला जात आहे. त्यामुळे ‘साहेब, थोडं जिल्ह्याकडे बघा; आपण पालक आहात हो आमचे’ असं म्हणायची वेळ सामान्यांवर आली आहे.

Visits: 33 Today: 1 Total: 118477

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *