अकोले तालुक्यातील महिलांचे कोरोना संकटातील कार्य प्रेरणादायी ः पिचड
अकोले तालुक्यातील महिलांचे कोरोना संकटातील कार्य प्रेरणादायी ः पिचड
भाजप महिला आघाडीच्यावतीने विविध क्षेत्रातील महिलांचा ‘नवदुर्गा’ पुरस्काराने गौरव
नायक वृत्तसेवा, अकोले
कोरोना संकटकाळात अकोले तालुक्यातील विविध क्षेत्रातील महिलांनी केलेले कार्य प्रेरणादायी आहे. सर्व क्षेत्रातील कोरोना योद्धा महिला या खर्या ‘नवदुर्गा’ आहेत म्हणून त्यांचा उचित गौरव भाजपा महिला आघाडीच्यावतीने करण्यात आला, असे गौरवोद्गार माजी आमदार वैभव पिचड यांनी काढले.

अकोले येथे नुकताच भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्यावतीने नवदुर्गा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी पिचड बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुष्पा वाणी होत्या. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, अकोले एज्युकेशन संस्थेचे सचिव यशवंत आभाळे, नगराध्यक्षा संगीता शेटे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सोनाली नाईकवाडी, जिल्हा सचिव लता देशमुख, ज्ञानेश पुंडे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना माजी आमदार तथा भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य पिचड म्हणाले, आज महिला घरातील सर्व जबाबदारी पार पाडून नोकरी, व्यवसायसह सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे. महिलांच्या हाती दिलेली जबाबदारी त्या उत्तमप्रकारे पार पाडतात. स्वतःला सिद्ध करण्याचे काम महिलांनी केले आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान होणे गरजेचे होते. हीच गोष्ट हेरून आमच्या भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सोनाली नाईकवाडी यांनी नुकत्याच झालेल्या नवरात्र महोत्सव प्रसंगी ही संकल्पना सांगितली व आज त्यानुसार हा नवदुर्गा पुरस्कार देऊन तालुक्यातील उल्लेखनीय कार्य करणार्या, समाजाच्या हितासाठी काम करणार्या महिलांचा सन्मान करण्यात आला. जगाबरोबर आपल्या तालुक्यातील महिलाही कुठे कमी नाहीत. वैद्यकीय क्षेत्रातील महिलांनी प्रसंगी आपल्या जीवाची काळजी न करता नागरिकांना वैद्यकीय सेवा देण्याचे काम केले. तालुका पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलिसांनी तर लॅाकडाऊनच्या सुरूवातीच्या काळात सगळे भयभीत असताना, सर्व रस्ते, गाव निर्मनुष्य असताना चौकात उन्हातान्हात दिवस-रात्र उभे राहून कर्तव्य निभावले. अशा या सर्व क्षेत्रातील कोरोना योद्धा महिला खर्या नवदुर्गा आहेत म्हणून त्यांचा आज हा उचित सन्मान झाला आहे.

बीजमता राहिबाई पोपेरे म्हणाल्या, कोरोनाच्या काळात ज्या महिलांनी उत्कृष्ट कार्य केले अशा आशासेविका, वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी सेविका, पोलीस यांचा सन्मान केला ही अतिशय भूषणावह गोष्ट आहे. आपल्याला रोगापासून वाचायचे असेल तर विषमुक्त शेती करून देशी वाण व देशी गायीचे संगोपन करावे असा सल्लाही त्यांनी आवर्जुन दिला.
प्रास्तविक करताना भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा नाईकवाडी म्हणाल्या, आज महिला सगळीकडे उत्तम काम करत आहे. एकूणच समाजाला दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण काम महिला करत आहेत. मात्र, हे सगळे होत असताना महिलेने महिलेसाठी उभे रहावे असे सांगून, आज महिलांच्या सन्मानासाठी एवढ्या मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहिल्या यावरूनच तालुक्यातील महिला आता कशातही मागे राहणार नाही हे दाखवून दिल्याचे नमूद केले.

स्वागत रेश्मा गोडसे, सूत्रसंचालन सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे तर आभार शारदा गायकर यांनी मानले. यावेळी वैद्यकीय, सामाजिक, राजकीय, कृषी, विधी, बचतगट, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेविका व क्रीडा आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सन्मान नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. बीजमाता तथा पद्मश्री राहिबाई पोपेरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सुधा देशपांडे, वैद्यकीय डॉ.उमा कुलकर्णी, डॉ.सुरेखा पोपेरे, डॉ.ज्योती भांडकोळी, डॉ.पूनम कानवडे, विधीज्ञ अॅड.पुष्पा चौधरी, कृषी कुमुदिनी पोखरकर, उत्कृष्ट तलाठी सोनाली देशमुख (वलवे), नगरपंचायत उत्कृष्ट काम शबाना शेख, पोलीस पाटील प्रणाली धुमाळ, सविता गायकर, अंंगणवाडी सेविका आशा ढगे, कविता गायकर, वारकरी शीतल गुंजाळ, काव्या कदम, शिक्षिका विमल भोईर, प्रतिमा सूर्यवंशी, पोलीस संगीता आहेर (मालुंजकर), पार्वती साबळे, आरती पानसरे, विमल वायकर, आशासेविका भारती गायकवाड, फरिदा पठाण, सुनीता गजे, अनिता वाकचौरे, नैना पांडे, स्वाती ताजणे, सुनीता पथवे, उषा अडांगळे, वर्षा पांडे, अरूणा चव्हाण, अनिता शिंदे, शालिनी वाकचौरे, कविता बोडके, मंदा पांडे, सुजाता गायके, अलका गिर्हे, मनीषा भांगरे, संगीता साळवे, नगरपंचायत कर्मचारी शांताबाई साळवे, सिंधुबाई आढाव, लीलाबाई भांगरे, समिता गायकवाड, उषा लवांडे, कावेरी अवचिते, मुक्ता घाटकर, प्रिती जेधे, रूपाली बनकर, चारुशीला गोंदके, नगरपंचायत अभियंता निवेदिता कुलकर्णी, खेळाडू नेहा गोरे, साक्षी कोळपकर, प्रियंका बांगुर्डे, प्रतिभा फापाळे, पुष्पा कुरकुटे, मीना चौधरी, सुनीता बोर्हाडे, आरोग्य सेविका छाया शिंदे यांचा नवदुर्गा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला .

