कथित प्रतिष्ठीताचा दारु पिऊन वीज कंपनीत धिंगाणा! सुरक्षारक्षकाला मारहाण व शिवीगाळ; पोलिसांकडून मात्र ‘एनसी’वर बोळवण..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
रहिवाशी परिसरातील काही घरांच्या वीज पुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्याचे कारण पुढे करुन आज मध्यरात्री एका कथित प्रतिष्ठीताने बेधुंद होत वीज कंपनीत मनसोक्त धिंगाणा घातला. दारुच्या नशेत झिंगलेल्या या महाशयाने रात्रपाळीवरील सुरक्षारक्षकाला लक्ष्य करुन प्रवेशद्वारातूनच त्याच्यावर शिव्यांची लाखोळी वाहण्यास सुरुवात केली. सभ्यतेचा बुरखा पांघरुन शाळेवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नापासून जात प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या आमिषाने महिलेची आर्थिक फसवणूक करण्यापर्यंतच्या अनेक प्रकरणात वारंवार समोर येणार्‍या या महाभागाने एव्हढ्यावरच न थांबता चक्क शासकीय कर्तव्यावर असलेल्या ‘त्या’ कर्मचार्‍याला लाथाबुक्क्याने मारहाणही केली. मध्यरात्रीच्या सुमारास वीज कंपनीच्या आवारात जवळपास अर्धातास हा धिंगाणा सुरु होता. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शहरात या मनोवृत्तीविरोधात रोषही निर्माण झाला. त्यामुळे पोलिसांनी सदरचे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेण्याची अपेक्षा असताना प्रत्यक्षात मात्र तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या सुरक्षारक्षकाची केवळ ‘एनसी’वर बोळवण करण्यात आली. या प्रकाराने आरोपीच्या धांगडधिंग्याला पोलिसांचेही पाठबळ मिळाल्याचे दिसत असून काळ सोकावत असल्याचे भयानक चित्र उभे राहू पहात आहे.


याबाबत वीज कंपनीचे सुरक्षारक्षक तुषार शेटे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार बुधवारी (ता.22) नेहमीप्रमाणे ते संगमनेरच्या वीज वितरण कंपनीत रात्रपाळीवर कर्तव्य बजावत असताना मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास रईस बेपारी (रा.अलकानगर) हा दारुच्या नशेत झिंगलेला इसम तेथे आला व त्याने सुरक्षारक्षकालाच ‘आमच्या भागातील लाईट कशामुळे गेली आहे?’ असा प्रश्‍न करीत थेट शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी संबंधित सुरक्षारक्षकाने ‘मला त्याबाबत माहिती नसते, तुम्ही साहेबांशी बोलून घ्या’ असे सांगत त्याला मोबाईल क्रमांकही देवू केला. मात्र डोक्यात शिरलेली खोट्या प्रतिष्ठेची हवा आणि त्यात दारुचा अंमल यामुळे संबंधित कर्मचारी काय सांगतो यापेक्षा या महाशयांना शिव्यांची लाखोळी आणि सोबतसोबत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यातच रस असल्याने त्याने त्याकडे दुर्लक्ष करीत आपला कार्यक्रम सुरु ठेवला.


मध्यरात्रीच्या सुमारास वीज कंपनीच्या आवारात सुरु असलेला हा प्रकार जवळपास अर्धातासाने नशेबहाद्दर बेपारीच्या सोबत आलेल्या तरुणाच्या प्रयत्नाने थांबला. या दरम्यान संबंधित व्यक्तिने वीज कंपनीच्या नावाने चांगभले करीत वायरमनपासून कार्यकारी अभियंत्यापर्यंत सर्वांचा उद्धार करुन त्यांनाही शिव्यांच्या माळा घातल्या. आज (ता.23) सकाळी वरीष्ठ अधिकार्‍यांच्या सूचनेनंतर संबंधित सुरक्षारक्षकाने शहर पोलीस ठाण्यात जावून सदर प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. घडलेला प्रकार सुसंस्कृत शहराला न शोभणारा होता, वीज पुरवठा खंडीत झाला असला तरीही तो पूर्ववत करण्याची जबाबदारी कधीही सुरक्षारक्षकाची नसते हे लहान मुलांनाही समजते. मात्र असे असतानाही प्रतिष्ठेचा खोटा बुरखा पांघरुन समाजासाठी त्रासदायक ठरत असलेल्या या व्यक्तिने त्याला मारहाण, शिवीगाळ व धमक्या देण्याचा प्रकार सुरुच ठेवला होता. आरोपीसोबत असलेला तरुण वारंवार त्याला रोखण्याचाही प्रयत्न करीत होता, मात्र त्यावेळी त्याच्या डोक्यात दारुसह खोट्या प्रतिष्ठेची झिंग चढलेली असल्याने तो त्याला झुगारीत होता.


घडलेला प्रकार अतिशय संतापजनक आणि दहशत निर्माण करणारा होता. त्यामुळे या प्रकरणात तक्रारदार समोर येताच पोलिसांनी कठोर कलमान्वये गुन्हा दाखल करुन या कथित प्रतिष्ठीत महाभागाचा बुरखा फाडण्याची गरज होती. प्रत्यक्षात मात्र पोलिसांनी केवळ अदखलपात्र (एनसी) गुन्ह्याची नोंद करीत तक्रारदारासह या प्रकरणातून रोषण निर्माण झालेल्या प्रत्येकाचीच बोळवण केली. त्यामुळे आरोपीला आपली मनोवृत्ती वागवण्यासाठी पाठबळच मिळाले असून संबंध नसतांनाही थेट शासकीय कार्यालयात धुडगूस घालून कर्मचार्‍यांवर हात उचलल्यानंतरही काहीच होत नसल्याने काळ सोकावण्याचीही भीती निर्माण झाली आहे. या प्रकरणातील पोलिसांची भूमिका संशयास्पद असून वरीष्ठ अधिकार्‍यांनी वेळीच अशा प्रवृत्ती ठेचण्यासाठी कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता आहे.


संबंधित आरोपीने यापूर्वीही खोट्या प्रतिष्ठेचा बुरखा पांघरुन समाजात अनेकांना नागवल्याची चर्चा आहे. यापूर्वी त्याने एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेवर ताबा मिळवण्यासाठी त्या संस्थेच्या विश्‍वस्तांविरोधात मोठे कूभांड उभे केले होते. तर, मध्यंतरी एका खासगी रुग्णालयात काम करणार्‍या गरीब महिलेला ‘ओबीसी’ जात प्रमाणपत्र मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याने 50 हजारांची फसवणूकही केली होती. यासोबतच लोकांचे बेकायदा पुनर्वसन, त्यांना आधारकार्ड व रेशनकार्ड मिळवून देण्यातही हा महाभाग आघाडीवर असल्याचे गंभीर आरोप आहेत, मात्र असे असतानाही शहर पोलिसांकडून त्याला पाठीशी घालण्याचा प्रकार संशयास्पद असून वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.

Visits: 4 Today: 4 Total: 1745004

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *