गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या ‘दलाला’चा संशयास्पद ‘संमती’ योग! नैतिक लागेबांधे की आर्थिक लाभ; ‘त्या’ संमतीदारावर 22 लाखांची खैरात..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
अंकशास्त्राच्या नावाखाली राजकारण्यांना भुरळ घालणार्‍या आणि धनदांडग्यांना लुटणार्‍या नाशिकच्या भोंदू अशोक खरातने संगमनेरच्या सहकार बँकेतही आपले हातपाय पसरल्याचे वृत्त ‘दैनिक नायक’ने प्रसिद्ध करताच संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, या प्रकरणाचा गुंता केवळ एका बँकेपुरता मर्यादित नसून, खरातला संगमनेरातील मोक्याच्या जागा दाखवणारा ‘तो’ पडद्यामागचा सूत्रधार कोण? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे, गुंजाळवाडी शिवारातील 17 गुंठे जागेच्या व्यवहारात ज्या ‘दलाला’ने आणि ‘संमतीदाराने’ मध्यस्थी केली, त्याचा पूर्वेतिहास कमालीचा संशयास्पद असून, या व्यवहारातील पैशांचे वाटप पाहता यात मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचाही वास येत आहे.


भोंदू अशोक खरातने दोन वर्षांपूर्वी 17 मे 2024 रोजी केलेल्या या जमीन व्यवहाराची कागदपत्रे तपासली असता त्यातून विसंगत बाब समोर आली आहे. या व्यवहाराची एकूण किंमत 70 लाख 50 हजार रुपये दाखवण्यात आली आहे. नियमानुसार ही संपूर्ण रक्कम मूळ मालकांना मिळणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात मूळ जागामालकांना त्यातील अवघे 48 लाख रुपये मिळाले, तर ज्याचा या जागेवर कोणताही मालकी हक्क नव्हता, अशा केवळ ‘संमती देणार’ म्हणून सही करणार्‍या व्यक्तीच्या पदरात चक्क 22 लाख 50 हजार रुपये पडले आहेत. एका संमतीदाराला एकूण व्यवहारातील जवळपास 32 टक्के रक्कम कशासाठी दिली गेली?, ही रक्कम भोंदू खरातला जागा दाखवण्याचे ‘कमिशन’ होते की एखाद्या मोठ्या गुन्हेगारी साखळीला गप्प ठेवण्यासाठी दिलेली ‘सुपारी’? असा सवाल आता उपस्थित झाला आहे.


‘दैनिक नायक’ने या प्रकरणाचा अधिक खोलात जाऊन शोध घेतला असता, या व्यवहारात संमती देणारा ‘तो’ महाशय पांढरपेशी नसून त्याचा गुन्हेगारी इतिहास असल्याचे समोर आले आहे. संबंधित व्यक्तीवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात महिला अत्याचाराचा (कलम 376) गंभीर गुन्हा दाखल असून, याप्रकरणात त्याला दीर्घकाळ तुरुंगाची हवाही खावी लागली आहे. अशा गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीचा भोंदू खरातच्या जमीन व्यवहारात झालेला सक्रिय सहभाग अनेक शंका निर्माण करणारा आहे. नाशिकचा भोंदू बाबा आणि संगमनेरातील गुन्हेगारी वृत्तीची अशी माणसं यांच्यात नेमकं काय साटेलोटं होतं, याचा तपास आता ‘ईडी’ (अंमलबजावणी संचालनालय) आणि विशेष तपास पथकाला करावा लागणार आहे.


संगमनेर शहरात जमिनीचे भाव गगनाला भिडलेले असताना, गोल्डनसिटी सारख्या मोक्याच्या परिसरातील जागा ‘कवडीमोल’ भावात खरातला कशी मिळाली? हे कोडे अद्याप सुटलेले नाही. स्थानिक दलालांच्या मदतीशिवाय बाहेरील व्यक्तीला इतक्या सहजपणे आणि जलदगतीने असा व्यवहार करणेही अशक्य आहे. दुय्यम निबंधक कार्यालयात अवघ्या एका मिनिटात झालेली दस्त नोंदणी आणि त्यानंतर तातडीने झालेला फेरफार, यावरुन या ‘दलाला’चे वजन प्रशासकीय वर्तुळात किती मोठे आहे, हे देखील स्पष्ट होते. या व्यवहारासाठी संगमनेरच्या ‘त्या’ नामांकित सहकारी बँकेचीच निवड करणे, हे देखील एका सुनियोजित कटाचा भाग असल्याचे दिसून येते.


भोंदू खरातने आपल्या मुलीच्या नावे ही जागा खरेदी करताना वापरलेले धनादेश ज्या बँकेचे होते, त्या बँकेतील खरातच्या खात्याची चौकशी आता अनिवार्य आहे. हा दलाल केवळ जमीन दाखवण्यापुरता मर्यादित होता की, खरातचा संगमनेरातील आर्थिक व्यवहार सांभाळणारा ‘फ्रंटमॅन’ होता? अशा चर्चांनाही आता उधाण आले आहे. ज्या पद्धतीने या व्यवहारातील रकमेचे तुकडे करण्यात आले, त्यातून काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न झाला असल्याचीही दाट शक्यता आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास ‘ईडी’कडे सोपवल्याने, आता संगमनेरातील ‘त्या’ दलालाचे आणि संशयास्पद संमतीदाराचे धाबे दणाणले आहेत. लवकरच या प्रकरणातील ‘मोठा मासा’ गळाला लागण्याची शक्यता असून, ‘दैनिक नायक’ या प्रकरणाचा पाठपुरावा सुरुच ठेवणार आहे.


भोंदू अशोक खरातचे राजकीय संबंध सर्वश्रुत आहेत. संगमनेरातील या जमीन व्यवहारात ज्या दलालाची चर्चा आहे, त्याची कोणत्या राजकीय पक्षाच्या नेत्यांशी जवळीक आहे? हे आता तपासाचे मुख्य केंद्र बनले आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या संमतीदाराला 22 लाखांचे पाठबळ कोणामुळे मिळाले, याचे उत्तर मिळाल्यास संगमनेरातील भोंदबाबा अशोक खरातचे रॅकेट उघडकीस येऊ शकते. मात्र त्यासाठी तपास यंत्रणांनी खोलात जावून तपास करण्याची गरज आहे.

Visits: 14 Today: 14 Total: 1685751

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *