संगमनेरच्या ‘सहकार’ बँकेत भोंदू खरातचे ‘अस्सल’ खाते! दोन वर्षांपूर्वी दुय्यम निबंधक कार्यालयात हजेरी; ‘त्या’ जागेच्या व्यवहारासाठीही सहकार बँकेचाच वापर..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
राहाता तालुक्यातील एका पतसंस्थेत शंभरावर बनावट खात्यांच्या आधाराने भोंदू अशोक खरातने कोट्यवधीचे आर्थिक व्यवहार केल्याचे समोर आल्यानंतर आता त्याचे लोण संगमनेरपर्यंत येवून पोहोचल्याचेही उघड झाले आहे. दोन वर्षांपूर्वी त्याने गोल्डनसिटीच्या परिसरात खरेदी केलेल्या 17 गुंठे जागेसाठी विविध क्रमांकाच्या पाच धनादेशांद्वारा 70 लाख 50 हजार रुपयांची रक्कम एकूण पाच खातेदारांना अदा केली होती. या व्यवहारासाठीच्या मुद्रांक शुल्कासह नोंदणीसाठीच्या खर्चाची रक्कमही त्याने संगमनेरातील सहकार क्षेत्रात नावाजलेल्या ‘त्या’ बँकेच्या माध्यमातून दिल्याचे आता स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण व्यवहारासाठी वापरण्यात आलेले धनादेश भोंदू अशोक खरातच्या नावानेच दिले गेल्याने संगमनेरातील या सहकार बँकेत त्याच्या नावाने ‘अस्सल’ खाते असल्याचेही स्पष्ट झाले असून सदरील बँकही आता ‘ईडी’च्या रडारवर आली आहे. धक्कादायक म्हणजे मुलीच्या नावे झालेल्या या व्यवहारासाठी भोंदू खरात स्वतः संगमनेरच्या दुय्यम निबंधक वर्ग दोन यांच्या कार्यालयात प्रत्यक्ष हजर असल्याचे पुरावेही समोर आले असून एरव्ही सामान्यांना दिवसभर ताटकळत ठेवणार्‍या या विभागाने त्याचा त्यावेळी ‘खास पाहुणचार’ केल्याच्या चर्चांनाही आता वाटा फूटल्या आहेत.


भोंदूगिरीच्या आडून राज्यातील मोठे राजकारणी, उद्योजक व व्यावसायिकांकडून कोट्यवधीचे घबाड कमावणार्‍या नाशिकच्या अशोक खरातचे एकामागून एक नवनवीन किस्से रोजच चर्चेत येत असल्याने राज्यात सध्या खळबळ उडालेली आहे. अशातच या भोंदू बाबाने त्याच्याकडे येणार्‍या भाविकांच्या नावाचा वापर करुन विविध बँका व सहकारी पतसंस्थांमध्ये शेकडों बनावट खाती उघडली. या खात्यांद्वारा ठराविक काळात त्याने कोट्यवधीचे आर्थिक व्यवहार केल्याचेही तपासातून समोर आले असून अशा खात्यांच्या ‘वारसदार’ कॉलममध्ये त्याने आपले नाव व खात्यातून होणार्‍या व्यवहारासाठी स्वतःचा मोबाईल क्रमांक नोंदवून शासनाचीही कोट्यवधींची फसवणूक केली आहे. त्याच्या आर्थिक गैरव्यवहाराचा रोज समोर येणारा धक्कादायक खुलासा पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष तपास पथकासह आता अंमलबजावणी संचालनालयालाही (ईडी) या प्रकरणाचा तपास सोपवल्याने विविध जिल्ह्यात भोंदू खरातने केलेले अशाप्रकारचे सर्व व्यवहार आणि त्यासाठी वापरण्यात आलेल्या बँका आणि पतसंस्थांचे धाबे दणाणले आहेत.


भोंदू खरातचे कारनामे उघड होत असतानाच त्याने दोन वर्षांपूर्वी 17 मे 2024 रोजी त्याची मुलगी श्रुष्टी खरातच्या नावाने संगमनेर शहरात वेगाने विकसित होत असलेल्या गुंजाळवाडी शिवारातील गोल्डनसिटीतील गट क्रमांक 135/167 मधील 17 गुंठे क्षेत्राची खरेदी केल्याचे प्रकरणही चर्चेत आले. त्याचा शोध घेत असताना अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या असून वादात असलेली संगमनेरातील ही जागा आहे त्या स्थितीत घेण्याच्या बोलीवर त्याचा 70 लाख 50 हजार रुपयांच्या मोबदल्यात व्यवहार झाल्याचे नोंदणीकृत दस्तावरुन स्पष्ट झाले आहे. या व्यवहारासाठी खूद्द भोंदू अशोक खरात त्याच्या कन्येसह संगमनेरात आला होता. त्यावेळी त्याने व्यवहारात ठरलेली संपूर्ण रक्कम एकूण पाच खातेदारांच्या नावाने वेगवेगळ्या क्रमांकाच्या धनादेशाद्वारा अदा केली असून ‘ते’ सर्व धनादेश संगमनेरच्या सहकार क्षेत्रात नावाजलेल्या एका सहकारी बँकेतील त्याच्या स्वतःच्या नावाच्या खात्यातून देण्यात आल्याचेही समोर आले आहे.


विशेष म्हणजे शुक्रवार 17 मे 2024 रोजी दुपारी संगमनेरच्या दुय्यम निबंधकांच्या कार्यालयात पोहोचलेल्या भोंदू अशोक खरातसाठी ‘खास व्यवस्था’ करण्यात आली होती. दुपारी बरोबर 2 वाजून 17 मिनिटे आणि 25 सेकंदांनी तो कार्यालयात पोहोचताच दुय्यम निबंधकांनी आपले संपूर्ण कार्यालय त्याच्यासाठी रिकामे केले. त्यानंतर अवघ्या एका मिनिटांतच तत्पूर्वीच नोंदवलेल्या दस्तावर साक्षीदार म्हणून त्याच्या हाताचे ठसे व स्वाक्षर्‍यांसह त्याचे छायाचित्रही घेतले गेले आणि अवघ्या एकाच मिनिटांतच म्हणजे दुपारी 2 वाजून 18 मिनिट आणि 31 सेकंदांनी तो कार्यालयातून बाहेर पडला आणि पुढील तीनच मिनिटांत त्याचा व्यवहार पूर्ण होवून 2 वाजून 21 मिनिटे आणि 51 सेकंद इतक्या जलदगतीने त्याला त्याचा नोंदणीकृत दस्तही सोपवला गेला. विशेष म्हणजे ज्या दिवशी खरेदी झाली त्याच दिवशी गुंजाळवाडी सज्जाचे तलाठी गणेश शिंदे यांनी मालमत्ता नोंदीला नावे घेवून त्याचा उताराही भोंदूबाबाच्या पायाशी ठेवला.


त्यावरुन भोंदू अशोक खरातचा ‘जलवा’ संगमनेरातही अनुभवायला मिळाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे ज्या दुय्यम निबंधक कार्यालयात सामान्य नागरिकांना आपल्या कामासाठी दिवस खर्ची घालावा लागतो, त्याच कार्यालयात अवघ्या एका मिनिटांत दस्त नोंदणीचा नवा विश्‍वविक्रमही प्रस्थापित झाला. तर, या कार्यालयाच्याच पावलावर पाऊल ठेवत कामगार तलाठ्यानेही आपल्या हातातील सर्वकामे बाजूला ठेवून केवळ भोंदू खरातची मर्जी राखण्यातच धन्यता मानल्याने खरातची जादू संगमनेरातही काम करीत असल्याचे दिसून आले. या व्यवहारासाठी त्याने संगमनेरातील एका प्रसिद्ध सहकारी बँकेचा वापर केला असून त्यासाठी सदरील बँकेचेच धनादेश वापरण्यात आले आहेत. जागेच्या पोटी देण्यात आलेल्या धनादेशांवर भोंदूबाबाच्याच स्वाक्षर्‍या असल्याने ‘त्या’ बँकेत त्याचे ‘अस्सल’ खाते असल्याचे सांगण्यासाठी कोणाही तज्ञाची गरज नाही. एकंदरीत महिला अत्याचारांसह आता खरात प्रकरणात आर्थिक गैरव्यवहारांचे घबाड बाहेर निघू लागल्याने या प्रकरणातील आर्थिक तपासाचे सूत्रे आता ‘ईडी’कडे सोपवण्यात आल्याने येणार्‍या कालावधीत संगमनेरातील या सहकारी बँकेची कसून चौकशी होणार हे निश्‍चित आहे.


संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणार्‍या नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणाचे ओघळ आता थेट संगमनेरच्या सहकार बँकेपर्यंत येवून पोहोचल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून येणार्‍या कालावधीत या बँकेच्या अडचणी वाढणार आहेत. या प्रकरणाचा तपास आता विशेष पथकासह ‘ईडी’ही करणार असल्याने संगमनेरातील ‘त्या’ सहकार बँकेत त्याचे कधीपासून खाते आहे?, या बँकेत खाते उघडावे असा त्याला कोणी सल्ला दिला होता की कोणी मदत केली होती?, शहरातील 17 गुंठे जागेच्या व्यवहारासह या बँकेतील खात्याद्वारा त्याने अन्य कोणता व्यवहार केला आहे का?, खाते सुरु झाल्यापासून त्याच्या खात्यातून किती रकमेचे कोणते व्यवहार झाले आहेत?, त्याच्या खात्यात कोठून पैसा येत होता? अशा अनेक प्रश्‍नांची उकल होणार असून संगमनेरच्या ‘त्या’ बँकेने राज्याची उत्कंठा वाढवली आहे.

Visits: 3 Today: 3 Total: 1681242

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *