श्रीरामपूर शहरासह तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेची छापेमारी 10 जणांविरुद्ध गुन्हे दाखल तर 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीरामपूर शहर व तालुक्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या मटका, दारु, जुगार अड्डे या अवैध धंद्यांवर छापे टाकून 21 हजार 865 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या छापेमारीतील 10 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

श्रीरामपूर शहरातील प्रभाग दोनमध्ये देशी-विदेशी दारुची अवैध विक्री करताना आढळून आलेल्या समीर लतीफ पिंजारी (वय 24) याच्याकडील दारुच्या बाटल्या हस्तगत करून त्याला अटक केली. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई मयूर गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. त्यानंतर शहरात रेल्वे स्थानकासमोर एका टपरीच्या आडोशाला मटक्याचा अड्डा चालवत असताना रवींद्र भीमा चव्हाण (वय 49) याला अटक करण्यात आली. या प्रकरणी पोलीस शिपाई गायकवाड यांनी फिर्याद दिली. याचबरोबर डावखर रस्त्यावरील योगेश हॉटेल शेजारी एका टपरीच्या आडोशाला प्रमोद बबन त्रिभुवन (वय 33) याची अंगझडती घेतली असता कल्याण मटका खेळण्याचे साहित्य आढळले. या प्रकरणी पोलीस नाईक लक्ष्मण बोकले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशोकनगर फाटा निपाणी ते श्रीरामपूर रस्त्यावर एका पत्र्याच्या शेडमध्ये 3 ते 4 जण जुगार खेळताना आढळून आले. माधव नानासाहेब इंगळे (वय 30), अण्णासाहेब रंगनाथ इंगळे (वय 46), सर्जेराव तुकाराम पगारे (वय 58, तिघेही रा. वडाळा महादेव), बहिरू रामकृष्ण गोरे (वय 29, रा. कारेगाव) यांच्याकडून जुगाराचे साहित्य व 5 हजार 340 रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली. या प्रकरणी पोलीस नाईक खोकले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर एका टपरीच्या आडोशाला मटका खेळविताना आढळलेल्या इमान अहमद पठाण (वय 19) याच्याकडून 1 हजार 820 रुपयांची रोकड व मटक्याचे साहित्य हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई कमलेश पाथरुट यांनी फिर्याद दिली आहे. बस स्थानकासमोर योगेश हॉटेललगत बाजूला एका टपरीच्या आडोशाला उभा असलेल्या शकील अहमद जमील शहा (वय 32) याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून कल्याण मटक्याचे साहित्य व 1 हजार 650 रुपये हस्तगत करण्यात आले. पोलीस शिपाई कमलेश पाथरुट यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यानंतर शहरातील डावखर रस्ता येथे एका टपरीच्या आटोशाला उभा असलेल्या राहुल बबन पांडे (वय 43) याची अंगझडती घेतली असता कल्याण मटक्याचे साहित्य व 2 हजार 130 रुपये रोख आढळले. याप्रकरणी पोलीस शिपाई मयूर गायकवाड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल कण्यात आला आहे. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, उपनिरीक्षक सोपान गोरे, पोहेकॉ. संदीप पवार, मनोज गोसावी, पोना. शंकर चौधरी, लक्ष्मण खोकले, मयूर गायकवाड, कमलेश पाथरुट यांनी ही कारवाई केली.
