संगमनेरच्या गोतस्करीला तालुका पोलिसांचे पाठबळ! अपघातातून झाली दूष्कृत्याची पोलखोल; करुल्यात पर्यायी कत्तलखान्याचीही चर्चा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
सामाजिक व राजकीय दबावातून संगमनेर शहरातील पारंपरिक गोवंश कत्तलखान्यांसह गोतस्करीला मर्यादा आल्याने शहरातील कसायांनी आता आपला मोर्चा शहरालगतच्या ग्रामीणभागात वळवल्याचे समोर येवू लागले आहे. त्यासाठी तालुका पोलीस ठाण्यातील काही कर्मचार्‍यांना हाताशी धरुन बिनबोभाटपणे हा धंदा जोमात आला असून तळेगावनजीकच्या एका ओसाड माळरानावर काहींनी ‘अदृष्य’ कत्तलखाना सुरु केल्याची धक्कादायक चर्चाही कानावर आली आहे. बुधवारी याच कत्तलखान्यासाठी गोवंश जनावरांची चोरटी वाहतूक करणार्‍या वाहनाला अपघात झाल्याने तालुका पोलिसांचे बिंग फूटले. त्यामुळे नाईलाजास्तव पोलिसांना तिघा गोस्करांवर कारवाई करुन कत्तलीसाठी निघालेल्या पाच गायींसह सहा जनावरांना जीवदान द्यावे लागले. या प्रकाराने शहरातील हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांचा संताप झाला असून तालुका पोलिसांच्या या दूष्कृत्याची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाईची मागणी होत आहे.


गेल्या बुधवारी (ता.8) सायंकाळी पाचच्या सुमारास संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दितील जांभुळवाडी शिवारात विमानतळाकडे जाणार्‍या रस्त्यावर भरधाव वेगाने येणारी पिकअप उलटली. त्यामुळे ही अपघाती घटना समजून आसपासच्या नागरिकांनी मदतीसाठी अपघातस्थळी धाव घेतली असता वाहनात अतिशय निर्दयीपणाने दाटीवाटीत पाच जर्शी गायींसह एक गोर्‍हा बांधून ठेवल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांनी याबाबत तालुका पोलिसांना कळविल्यानंतर त्या बीटच्या हवालदाराने घटनास्थळी जात या अपघातात जखमी झालेला गोतस्कर सोमनाथ मारुती रुपवते (रा.समनापूर) याला उपचारांसाठी रवाना करुन वाहनात डांबलेल्या सहाही जनावरांची सुटका करीत त्यांना सायखिंडीच्या जीवदया पांजरापोळमध्ये रवाना केले.


या प्रकरणाची माहिती वार्‍याच्या वेगाने परिसरात पोहोचल्याने घटनास्थळी बजरंगदलासह अन्य हिंदुत्त्ववादी संघटनांचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले होते. त्यातूनच सदरचे वाहन व त्यातील जनावरे पशूपालकाचे नसून गोतस्कर म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या इसमांचे असल्याचे उघड झाले. त्यामुळे तालुका पोलिसांचा नाईलाज झाल्याने घटना घडून गेल्यानंतर तब्बल सहा तासांनी मध्यरात्रीच्या सुमारास सव्वाअकरा वाजता महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा व प्राण्यांना निर्दयीपणाने वागणूक देणार्‍या कायद्यान्वये आरोपी सोमनाथ मारुती रुपवते, बाळा रमेश रुपवते व अन्य एकावर गुन्हा दाखल झाला व पोलिसांनी गुन्ह्यासाठी वापरलेला पिकअप टेम्पो (क्र.एम.एच.15/एफ.व्ही.7390) ताब्यात घेवून सदरचे प्रकरण सामान्य घटनांप्रमाणेच असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला.


प्रत्यक्षात मात्र गेल्या पाच वर्षांपासून संगमनेरातील गोवंश कत्तलखान्यांबाबत हिंदुत्त्ववाद्यांकडून वारंवार आंदोलने होत असल्याने पोलिसांवरील सामाजिक व राजकीय दबाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातून शहरातील कत्तलखान्यांचा कुप्रसिद्ध परिसर असलेल्या भारतनगर, जमजम कॉलनी, रहेमतनगर, मोगलपूरा, कोल्हेवाडीरोड अशा सर्वच संशयीत ठिकाणांवर पोलिसांनी वारंवार छापे घालण्यास सुरुवात केल्याने स्थानिक कसायांचे कंबरडे मोडले. त्यातच गेल्या दीड वर्षांपूर्वी संगमनेर विधानसभा मतदारसंघात सत्ता बदल होवून हिंदुत्त्ववादी पक्षाचा उमेदवार विजयी झाल्याने गोप्रेमींसह हिंदुत्त्वावाद्यांना बळ मिळाल्याने पोलिसांना वारंवार कारवाया करणं भाग पाडलं. मध्यंतरी प्रशासनाला आजवर केवळ पाडकामाचा ‘शो’ दाखवण्यात आलेले बेकायदा कत्तलखानेही जमीनदोस्त करावे लागले. या सगळ्यांचा परिणाम स्थानिक कसायांवर उपासमारीची वेळ येवू लागल्याने काहींनी अन्य व्यवसाय शोधून कानाला खडा लावला, तर काहींनी जागा बदलून बदलून आजही धोका पत्करुन हा धंदा सुरुच ठेवल्याचेही अधुनमधून समोर येत असते.


त्यासोबतच गेल्या काही वर्षात तालुक्याच्या विविध भागात बजरंग दलाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाल्याने गावोगावी असलेल्या या संघटनेच्या कार्यकर्त्यांमुळे ग्रामीणभागातून कत्तलीसाठी आणल्या जाणार्‍या जनावरांवरही मर्यादा आल्या. त्यावर उपाय शोधताना शहरातील काही मोठ्या कसायांनी शहर हद्द सोडून तळेगाव परिसर लक्ष्य करण्यास सुरुवात केली असून पूर्वाश्रमीच्या एका कसाई धार्जीण्या शहर पोलीस निरीक्षकांचा ‘कलेक्टर’ म्हणून संगमनेरात अक्षरशः धिंगाणा घालणार्‍या पोलीस कर्मचार्‍यासह तालुका पोलीस ठाण्यातील ‘काहींना’ हाताशी धरुन तळेगाव व कोकणगाव परिसरातून हिंदू गोतस्करांचा वापर करुन जनावरे संकलित करण्यास सुरुवात केल्याची व अलिकडच्या काळात तळेगावनजीकच्या करुल्यात एका ओसाड माळरानावर ‘अदृष्य’ गोवंश कत्तलखाना सुरु केल्याची धक्कादायक चर्चाही कानावर आली आहे.


विशेष म्हणजे या परिसरातील शेतकर्‍यांकडून कत्तलीसाठीची जनावरे संकलित करुन त्याचा पुरवठा करणार्‍या करुल्याच्या गणेश दगडू कदम या गोतस्कराचे कारनामे यापूर्वी अनेकदा समोरही आले आणि त्याच्यावर अनेकदा गुन्हेही दाखल झाले. मात्र त्याला न जुमानता हा तस्कर आपला उद्योग कायम ठेवून आहे. बुधवारी जांभुळवाडी शिवारात झालेल्या अपघातातूनही ही गोष्ट ठळकपणे समोर आली असून संगमनेरातील कत्तलखाने करुल्यासारख्या ग्रामीणभागात सुरु होवू लागल्याच्या चर्चांनी शहरासह आता ग्रामीणभागातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍नही ‘आऽ’ वासून उभा राहू लागला आहे. वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी वेळीच याची दखल घेवून तालुका पोलिसांचे हे परस्पर उद्योग नियंत्रणात न आणल्यास भविष्यात या गोतस्करीसह कथित करुल्याच्या नूतन कत्तलखान्यावरुन तालुक्याचे सामाजिक स्वास्थ बिघडण्याची भीती वर्तवली जात आहे.


राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाल्यापासून गेल्या दशकभरात संगमनेरातील कुप्रसिद्ध कत्तलखान्यांवर शेकडों वेळा पोलिसांचे छापे पडले असून आजवर लाखों किलो कांपलेल्या गोवंशाच्या मांसासह हजारों जिवंत जनावरांची मुक्तताही झाली आहे. मात्र या बेकायदा उद्योगातून कसायांसह यंत्रणाही मालामाल होत असल्याने इतक्या कारवाया झाल्यानंतरही येथील कत्तलखाने कधीही पूर्णतः बंद झालेले नाहीत हे वास्तव आहे. दीड वर्षापूर्वी संगमनेर मतदारसंघात बदल होवून हिंदुत्त्ववादी विचारांच्या शिवसेनेचा उमेदवार विजयी झाल्याने शहरातील अशा सर्व बेकायदा कत्तलखाना चालकांचे व स्थानिक पोलिसांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे कसायांनी या उद्योगासाठी आता पर्यायी जागांचा शोध सुरु केला असून करुल्यात अशाप्रकारचा पहिला ‘अदृष्य’ कत्तलखाना सुरु झाल्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. शिवाय कत्तलीसाठीच्या जनावरांची वाहतूक करताना बजरंगदलाकडून होणारा विरोध टाळण्यासाठी काही कसायांकडून ‘हिंदू’ गोतस्करांचा वापर करण्यास सुरुवात झाल्याने भविष्यात गोवंश कत्तलखान्यावरुन शहरापाठोपाठ तालुक्याच्या ग्रामीणभागाचे सामाजिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आमदार अमोल खताळ यांच्यासह जिल्ह्याच्या वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी ही गोष्ट वेळीच गांभीर्याने घेण्याची गरज आहे.

Visits: 4 Today: 4 Total: 1689977

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *