राहुरीतील कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच शासनाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे पसरली संतापाची लाट


नायक वृत्तसेवा, राहुरी
25 जानेवारीपासून सुरू झालेल्या व शांततेत सुरू असलेल्या कृषी अभियांत्रिकी आंदोलक विद्यार्थ्यांना भावना अनावर झाल्या. गुरुवारी (ता.2) नवव्या दिवशीही कुठल्याही प्रकारचे आश्वासन न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे बैठे आंदोलन अधिकाधिक आक्रमक बनले. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर सर्व विद्यार्थी जमा होऊन विद्यापीठाचे काम बंद पाडण्यात आले. प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळच विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडल्यामुळे कर्मचार्‍यांना व अधिकार्‍यांना इमारतीमध्ये आत जाणे अशक्य बनले होते.

कृषी सेवा मुख्य परीक्षा 21 व 22 ला तत्काळ स्थगिती देऊन तसेच अभ्यासक्रम पूर्वीप्रमाणे करावा, स्वतंत्र कृषी अभियांत्रिकी संचलनालय स्थापन करून मृदा व जलसंधारण विभागांमध्ये कृषी अभियांत्रिकी शाखेच्या उमेदवारांची भरती करावी तसेच महाराष्ट्र राज्य सेवा 2023 च्या मुख्य परीक्षेमध्ये कृषी अभियांत्रिकी शाखेसाठी वैकल्पिक विषयाचा समावेश करावा या प्रमुख मागण्यांसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत तसेच इतरही कृषी विद्यापीठांतचे कृषी अभियांत्रिकीचे आजी-माजी सर्व विद्यार्थी गेल्या 25 जानेवारीपासून महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहे. आत्तापर्यंत राज्य शासनाने यांची कुठल्याही स्वरूपाची दखल न घेतल्यामुळे संतापाची लाट पसरली आहे.

दरम्यान महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रशांतकुमार पाटील, अधिष्ठाता डॉ. उत्तम चव्हाण, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, विद्यार्थी परिषदेचे डॉ. मुकुंद शिंदे, विद्यापीठाचे कुलसचिव प्रमोद लहाळे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून शासनाच्या संपर्कात असल्याचे समजते. 25 तारखेपासून सुरू असलेल्या या कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची माहिती नवव्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनास कळविल्याचे समजते.

या आंदोलनास आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार मोनिका राजळे, आमदार नीलेश लंके, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पद्मश्री पोपटराव पवार, राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण, माजी खासदार प्रसाद तनपुरे, भाऊसाहेब वाकचौरे, अभाविपचे ओंकार मगदूम, माजी आमदार शिवाजी कर्डिले, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, विद्यापीठ परिषदेचे संजीव भोर, भाजपचे जिल्हाध्यक्ष, सत्यजीत तांबे, माजी नगराध्यक्षा उषा तनपुरे यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या.

महाराष्ट्र राज्य कृषी परीक्षा मंडळाच्या परिपत्रकानुसार राज्यातील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या परीक्षा या 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार होत्या. मात्र आता त्या नवीन निर्णयानुसार 13 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

Visits: 102 Today: 1 Total: 1102475

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *