नियोजनशून्य वाळू धोरण उठलंय नद्यांच्या मुळावर! अहोरात्र वाळू उपसा सुरुच; तस्करांवर ‘मोक्कान्वये’ कारवाईची गरज..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गंगामाई परिसरात व्यायामासाठी येणार्या पर्यावरणप्रेमींनी अनेकदा आंदोलने करीत घाटांवरुन होणार्या वाळू चोरीला विरोध केला. त्यातून नदीकडे जाणार्या रस्त्यावर प्रवेशद्वारही उभारले गेले, मात्र त्याचे नियंत्रण कोणी करावे हा विषय तसाच राहिल्याने आजही घाटांवरुन होणारा वाळू उपसा तसाच आहे. बुधवारी सकाळी गंगामाईवर आलेल्या नागरिकांनी घाटांवर भरुन ठेवलेल्या गोण्या नष्ट केल्या, त्याची मर्दुमकी समाज माध्यमात व्हायरल होत असतानाच रात्री त्याच ठिकाणी प्रशासनाला पुन्हा तितक्याच गोण्या वाळू भरुन ठेवल्याचे आढळून आले. या सर्व घटनांमधून राज्याचे वाळू धोरण नियोजनाच्या अभावाने नद्यांच्या मुळावरच उठल्याचे दिसत असून राक्षसी मानसिकता झालेल्या तस्करांवर संघटित गुन्हेगारी कायद्यातील (मोक्का) तरतुदींन्वये गुन्हे दाखल करण्याची गरज निर्माण झाली आहे.

संगमनेर शहरालगतच्या प्रवरा नदीपात्रात अबालवृद्धांचा वावर आणि पोहण्यासाठी येणार्यांची संख्या लक्षात घेता घाटांचा परिसर ‘वाळू उपशासाठी’ प्रतिबंधीत असायला हवा. प्रत्यक्षात मात्र आजच्या स्थितीत सर्वाधिक प्रमाणात याच भागातून वाळू चोरी होत असून दररोज सूर्यास्तानंतर वाळू चोरांच्या टोळ्या या भागात हैदोस घालीत आहेत. त्याचा परिणाम संपूर्ण नदीपात्रात जागोजागी भलेमोठे खड्डे तयार झाल्याने त्यात बुडून निष्पापांना आपले जीव गमवावे लागत आहेत. गेल्या महिन्यात गंगामाई घाटावर अकोल्यातील अवघ्या 18 वर्ष वयाचे दोन विद्यार्थी बुडाले होते, त्यांच्या मृत्यूला वाळूतस्करांनी केलेले खड्डेच कारणीभूत असल्याचे समोर आलेले असताना काल (ता.14) मासेमारी करणारा एकजण गंगामाई घाटासमोरील विहिरी लगतच्या डबक्यात बुडाल्याचेही समोर आले असून अद्याप त्याचा थांगपत्ता लागलेला नाही.

संगमनेरच्या घाटांवर वारंवार घडणार्या बुडीताच्या घटना, चोरीची वाळू घेवून भरधाव धावणारी वाहने यातून संतप्त झालेल्या गंगामाईप्रेमी व वृक्ष परिवाराने यापूर्वी अनेकदा आंदोलने करुन घाटांच्या परिसरातील वाळू उपशाला विरोध केला. मात्र त्यांचा आवाज कधीही ऐकला गेला नाही, त्यामुळे या नागरिकांनीच आक्रमक भूमिका घेत दोन महिन्यांपूर्वी घाटांच्या परिसरातून राजरोस वाळू चोरी करणार्या तस्करांना पिटाळून लावले आणि त्यांनी भरुन ठेवलेल्या शेकडो वाळूच्या गोण्याही नदीपात्रात टाकून देण्यात आल्या. त्यावेळी या सर्व पर्यावरणप्रेमींनी घाटांवर ठिय्या आंदोलनही केल्याने पालिकेने तातडीची पावले टाकीत गंगामाईपासून नदीकडे जाणार्या रस्त्यावर लोखंडी प्रवेशद्वार उभे केले. तेव्हापासून घाटांच्या परिसरातील वाळू तस्करी थांबल्याचा आभास निर्माण निर्माण झाला होता, त्याचा बुधवारी फुगा फुटला.

गंगामाईवर येणार्यांचा विरोध होतो म्हणून तस्करांनी तो घाट सोडून त्या लगतच्या घाटांवर आक्रमण केले असून गेली दोन महिने रात्रीच्या अंधारात सुरु असलेला हा उद्योग बुधवारी सकाळीही सुरु असल्याने नागरिकांनी पुन्हा दोन महिन्यापूर्वींची रीऽ ओढली. यावेळी एकही तस्कर हाती लागला नाही, मात्र त्यांनी गोळ्या केलेली शेकडो गोण्या वाळू संतप्त लोकांनी नदीत सोडून देत रिकाम्या गोण्यांची होळी केली. या कारवाईने वाळू तस्करांवर ‘धाक’ निर्माण झाला असेल असा अंदाज लावला जात असतांना त्याच दिवशी रात्री तहसीलदार धीरज मांजरे व पोलीास निरीक्षक भगवान मथुरे यांच्या संयुक्त पथकाने या भागात भेट दिली असता सकाळी होत्या त्यापेक्षा कितीतरी अधिक गोण्या वाळू भरुन त्याची थप्पी त्याच घाटावर मांडून ठेवल्याचे त्यांना आढळून आले. यावेळी या दोन्ही पथकांनी सकाळप्रमाणेच रात्रीही गोण्या ओतून देण्याचा आणि रिकाम्या पेटवण्याचा प्रयोग केला, पण त्याचा उपयोग काय? हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून गेल्या 1 मे पासून राज्यात आदर्श वाळू धोरण लागू झाले. मात्र या गोष्टीला आता दीड महिन्याचा कालावधी उलटूनही लोकांना वाळूच मिळत नसल्याने त्यांना तस्करांकडून वाळू विकत घ्यावी लागत आहे. त्यामुळे अवघेे सहाशे रुपये ब्रासचे गाजर दाखवूनही लोकांना आजही त्याच एक ब्रास वाळूसाठी तीन हजार रुपये मोजावे लागत आहे. संगमनेरातील वाळू चोरांचा हा हैदोस थांबवण्यात नूतन प्रांताधिकारी शैलेश हिंगे आणि तहसीलदार धीरज मांजरे सपशेल अपयशी ठरल्याचे यासर्व घटनाक्रमातून ठळकपणे दिसून आले असून वाळू धोरणाबरोबरच शासनाने बेकायदा पद्धतीने संघटितपणे नद्यांवर दरोडे घालणार्या वाळूतस्करांवर संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) गुन्हे दाखल करुन त्यांना कारागृहात डांबण्याची गरज निर्माण झाली आहे, अन्यथा चोर-पोलिसांचा हा खेळ थांबण्याची शक्यता दूरदूरपर्यंत दिसत नाही.

या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वाळू चोरीचे उच्चाटन करण्याचा मनोदय व्यक्त करताना प्रांताधिकार्यांसोबतच्या संयुक्त बैठकीत काही दूरगामी निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. शहरात वाळू चोरीसाठी भंगारातील रिक्षांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने उपप्रादेशिक परिवहन विभागाशी पत्रव्यवहार करुन त्यांना संगमनेरातील रिक्षांचे परवाने तपासण्याची मोहीम सुरु करण्याची विनंती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय महसूल विभागाचे दिवस व रात्र अशी दोन स्वतंत्र पथकेही कार्यान्वित करण्यात आली असून पोलिसांनाही नद्यांच्या भागातील दिवस-रात्रीच्या गस्तीत वाढ करण्यास सांगण्यात आले आहे. सोबतच गंगामाई घाटावरील प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यात आले असून बुधवारी रात्री या परिसरातून एका रिक्षासह अन्य ठिकाणाहून एक ट्रॅक्टर व पिकअप टेम्पो आणि आज सकाळी गाढवावरुन वाळू वाहणार्या दोघांना ताब्यात घेण्यात आले आल्याचे त्यांनी सांगितले.

संगमनेरातील वाळू चोरी थांबवण्यासाठी प्रांताधिकार्यांसोबत संयुक्त बैठक घेण्यात आली असून ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करण्यात आला आहे. लवकरच उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून शहरातील सर्व रिक्षांचे परवाने तपासण्याची मोहीम राबविली जाणार आहे. कारवाई करण्याच्या हेतूने महसूलची दोन स्वतंत्र पथके कार्यान्वित करण्यात आली असून पोलिसांनाही नदी परिसरात गस्त वाढवण्याची सूचना दिली आहे. याशिवाय गंगामाई घाटावरील प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यात आले असून तेथील सीसीटीव्ही कॅमेर्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. रात्री एक ट्रॅक्टर, पिकअप व रिक्षावर कारवाई केली असून आज सकाळी गाढवावरुन वाळू वाहणार्या दोघांना पकडले आहे.
– धीरज मांजरे
तहसीलदार – संगमनेर

