ग्रामसभेच्या माध्यमातून रंगले तालुक्यात राजकीय द्वंद्व! दाखल प्रकरणात आता अॅट्रोसिटी; ग्रामस्थांकडून होणारे आजचे आंदोलनही स्थगित..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
सत्ताधार्यांच्या विरोधात सतत वेगळा सूर, ग्रामसभेत वादाच्या प्रश्नांचा उल्लेख आणि त्यातच ग्रामपंचायतीतल्या संपूर्ण वर्चस्वाला खिंडार पाडून एका प्रभागात उगवलेला विरोध या सर्वांची गोळाबेरीज आवाज उठवणार्याचा गळा दाबण्यापर्यंत पोहोचली. त्यातून सत्ताधारी गटाच्या समर्थकांकडून एकाच्या हिंमतीवरच हल्ला करण्याचा प्रकार घडला. त्याच्या बरोबरच्या मंडळींनी वेळीच पोलिसांशी संपर्क साधल्याने आणि त्यांनीही अगदी वेळेवर ‘एन्ट्री’ केल्याने ‘त्या’ कार्यकर्त्याचा जीव जाताजाता वाचला. मात्र, त्यातून विद्यमान विरुद्ध माजी महसूल मंत्र्यांमध्ये राजकीय द्वंद्वाची ठिणगी पेटली आणि त्याची झळ थेट साकूरचे सर्वेसर्वा समजल्या जाणार्या खेमनर कुटुंबापर्यंत पोहोचली. सुरुवातीला या प्रकरणात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी कलम लावण्यात आले होते. आता त्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची (अॅट्रोसिटी) कलमेही वाढवण्यात आल्याने सत्ताधारी गटाच्या समर्थकांच्या अडचणींमध्ये मोठी भर पडली आहे. त्यातच ही कारवाई चुकीची असल्याचे सांगण्यासाठी आज आंदोलनाची हाक देण्यात आली होती, मात्र पोलिसांनी परवानगी नाकाल्याने आजचे आंदोलनही स्थगित करावे लागले आहे.
गेल्या महिन्यात तालुक्यातील सदतीस ग्रामपंचायतींसह साकुरचीही निवडणूक पार पडली. या निवडणुकीत साकूर परिसरात संपूर्ण वर्चस्व असलेल्या शंकरपाटील खेमनर यांच्या गटाला धक्का देत विरोधकांचे एक सीट निवडून आले. तत्पूर्वी साकूरमध्ये काही घटना घडल्याने निवडणुकीपूर्वीच वातावरणातील ताप वाढलेला होता. त्यातच एक सदस्य विरोधकांचा निवडून आल्याने साकुरमध्ये सत्ताधारी गटाचा रोष खदखदत होता. त्यातूनच 30 डिसेंबर रोजी झालेल्या ग्रामसभेतील एका प्रश्नाने या रोषाच्या अग्नीत तेल ओतण्याचे काम झाले. साकूर परिसरातील सुनील नामदेव ईघे या तरुणाने तो प्रश्न विचारला होता. त्याच्या बदल्यात त्याला थेट व्हाया यमपुरीमार्गे रुग्णालयातील खाटेवरच जावे लागले.
गेल्या शुक्रवारी (ता.30) झालेल्या साकुरच्या ग्रामसभेत सुनील ईघे याने जोगे पठारभागातील ग्रामस्थांना पाणी पुरवठा का केला जात नाही? असा सवाल उपस्थित केला. त्यावरुन सभेच्या अध्यक्षस्थानी असलेल्या शंकर खेमनर यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी त्याला विरोध करण्यास सुरुवात केली. हा आपला हक्क असल्याचे सांगत त्या तरुणाने आपली हिंमत दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्याला शिवीगाळ आणि लाथाबुक्क्यांनी सन्मानित करण्यात आले. त्यामुळे त्यानेही आपली निडरता छातीत भरुन सरळ घारगाव पोलीस ठाणे गाठून झाल्या प्रकाराची कैफीयत मांडली.
सत्ताधारी गटाला त्याचाही राग अनावर झाला आणि ‘याचा आता गेमच करायचा’ असा जणू त्यांनी चंग बांधला. त्यातून त्याच दिवशी रात्री पावणे दहाच्या सुमारास सुनील ईघे हा बिलाल सजन शेख व प्रभाकर सुकदेव कदम यांच्यासह मोटारसायकलवरुन हिवरगाव घाटातून जात असताना पाठीमागून दोन वाहनांमधून आलेल्या 25 ते 30 जणांनी टॉमी, गज व लाकडी काठ्यांच्या सहाय्याने त्या तिघांवरही हल्ला चढवला. या गदारोळात ईघे सोबतच्या दोघांनी तेथून धूम ठोकली व काही अंतरावर जावून त्यांनी घारगाव पोलिसांशी संपर्क करीत घडत असलेल्या प्रकाराची माहिती दिली.
ग्रामसभेत सकाळी सवाल करणार्या ईघेचे नशीब बलवत्तर म्हणून योगायोगाने घारगाव पोलिसांचे गस्ती वाहन त्यावेळी हाकेच्या अंतरावर असल्याने बिनतारीवरुन संदेश प्राप्त होताच काही वेळातच पोलिसांचे वाहन घटनास्थळी पोहोचले. पोलीस आल्याचे पाहून जीव घेण्याच्या उद्देशाने आलेल्या त्या टोळक्याने तेथून पळ काढल्याने गंभीर जखमी होवूनही सुनील ईघे हा तरुण जिवंत अवस्थेत श्वास घेतच राहिला. त्याची अवस्था पाहून पोलिसांनी तत्काळ त्याच्यासह त्याच्या अन्य दोघा सहकार्यांना रुग्णालयात दाखल केले.
दुसर्या दिवशी (ता.31) त्याने रुग्णालयात नोंदविलेल्या जवाबावरुन घारगाव पोलिसांनी सुजीत अशोक खेमनर, अनमोल शंकर खेमनर, आबा वाकचौरे, बाजीराव सतू खेमनर, संतोष धोंडीभाऊ खेमनर, उमेश अशोक गाडेकर, गणपत बाळासाहेब पवार, किशोर बापू गाडेकर, रफिक सिकंदर चौगुले, भागवत सुभाष शेंडगे, बालम सुलेमान पटेल, दत्तात्रय सुभाष रेणुकादास, फिरोज सरदार पटेल, सुधीर सयाजी फटांगरे, कल्पेश गडगे यांच्यासह अज्ञात 10 ते 15 जणांविरोधात सुरुवातीला भा.दं.वि. ललम 307, 329, 143, 147, 148, 149, 427, 341 प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्यातील बाजीराव सतू खेमनर, संतोष धोंडीभाऊ खेमनर व सुधीर सयाजी फटांगरे या तिघांना अटक केली आहे. सध्या 4 जानेवारीपर्यंत ते पोलीस कोठडीत आहेत.
अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने मारहाणीचे हे षडयंत्र राबविले गेल्याचा संशय असल्याने या प्रकरणात साकूर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाची एन्ट्री अपेक्षितच होती. त्यानुसार ग्रामविकास अधिकारी नागेश श्रीराम पाबळे यांनी मार खाऊन अर्धमेल्या झालेल्या सुनील ईघे याने ग्रामसभेत विषयांतर करुन प्रश्न विचारले, गावकर्यांसह आपण समाजावून सांगितले असता त्याने शिवीगाळ व अरेरावी केली. ग्रामसेवकाने विषयानुरुप सूचना मांडण्यास सांगितले असता राग येवून त्याने सभेचे इतिवृत्त लिहिण्याची नोंदवही व कामकाजाची फाईल हिसकावून घेत फाडून टाकली व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची फिर्याद दिली. त्यावरुन सुनील ईघे विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला.
तालुक्यातील साकूर ग्रामपंचायतीवर नेहमीच माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या गटाचे वर्चस्व राहिले आहे. शंकर खेमनर यांना साकूरचे सर्वेसर्वा मानले जाते, त्यांच्याच ताब्यात साकूर ग्रामपंचायतीचा कारभार आहे. यावर्षी मात्र त्यांच्या संपूर्ण सत्तेला खिंडार पडून गावठाण भागातील प्रभाग क्रमांक चारमध्ये दादा पटेल यांच्या रुपाने विरोधक उगवल्याने ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाच्या दिवशीच साकुरमध्ये राजकीय वावटळं उठणार असल्याचे संकेत मिळत होते. प्रत्यक्षात 10 दिवसांनंतर ग्रामसभेतून ती उठली आणि तीची परिणीती विरोधात बोलणार्याचा गळा दाबण्यापर्यंत पोहोचून सत्ताधारी गटातील 25 ते 30 जणांवर जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नासह आता वाढीव अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल होण्यात झाली.
सुनील ईघे यांना मारहाण करण्याच्या प्रकारातून प्रतिष्ठीतांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असा आरोप करीत सत्ताधारी गटाच्या समर्थकांनी शनिवारी साकूर बंद ठेवल्यानंतर आज (ता.2) पुणे-नाशिक महामार्ग रोखण्यासह साकूरमध्ये आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र घारगाव पोलिसांनी कायद्याचा बडगा दाखवल्यानंतर आज होणारे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.