दिवाळीनंतरच्या पंधरवड्यात कोविड संक्रमणाचा वेग झाला दुप्पट! महिन्यातील एकूण रुग्णसंख्येत नंतरच्या पंधरा दिवसांतच वाढले 63 टक्के रुग्ण

नायक वृत्तसेवा, संगमनेर
नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात आटोक्यात असलेल्या कोविड संक्रमणात दिवाळीनंतरच्या पंधरवड्यात तब्बल दुप्पट वेगाने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच चालू महिन्याच्या पहिल्याच दिवशी तब्बल 49 रुग्णांची भर पडल्याने या महिन्यातही कोविडचा आलेख उंचावत जाणारा ठरतो की काय अशी भितीही निर्माण झाली आहे. सप्टेंबरमध्ये तालुक्यातील रुग्णसंख्येचा उच्चांक नोंदविला गेल्यानंतर ऑक्टोबरमध्ये त्यात घट झाली होती, तोच सिलसिला नोव्हेंबरनेही राखला होता. मात्र दिवाळीनंतरच्या पंधरा दिवसांनी त्यावर पाणी फेरले असून संक्रमणाची गती वाढल्याने तालुक्याच्या चिंता वाढल्या आहेत. सद्यस्थितीत तालुक्याची एकूण रुग्णसंख्या 5 हजार 248 वर पोहोचली आहे तर आत्तापर्यंत 45 जणांचे जीवही गेले आहेत.

एप्रिलपासून सुरु झालेल्या तालुक्यातील कोविड संक्रमणाने टप्प्याटप्प्याने सप्टेंबरमध्ये दररोज 51 रुग्ण या गतीने तब्बल 1 हजार 529 रुग्णांची विक्रमी भर घातली होती. ऑगस्टमधील सण-उत्सवांचा परिणाम म्हणून सप्टेंबरमध्ये वाढलेल्या रुग्णसंख्येकडे पाहीले गेले, त्याप्रमाणे घडलेही. मात्र त्यानंतर ऑक्टोबरमध्ये रोजच्या सरासरीत घट होवून 33.58 रुग्ण दररोज या गतीने 1 हजार 41 रुग्णांची भर पडली. मागे सरत चाललेला कोविडचा हा आलेख नोव्हेंबरमध्येही टिकून राहील असा काहींचा अंदाज होता, तर दिवाळीनिमित्त घराबाहेर पडणार्या नागरिकांमुळे संक्रमणाची गती वाढेल असा वैद्यकीय जाणकारांचा अंदाज होता. तो तंतोतंत खरा ठरल्याचेच महिन्याभरातील एकूण आकडेवारीवरुन लक्षात येते. कमी झालेल्या संक्रमणाला गती देत चिंता वाढवणार्या नोव्हेंबरने मृत्यूदरात घट करुन संगमनेरकरांना मात्र मोठा दिलासा दिला आहे.

1 ते 15 नोव्हेंबर या पहिल्या पंधरवड्याचा विचार करता संगमनेर तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येत दररोज सरासरी 22.33 रुग्ण या वेगाने 335 रुग्णांची भर पडली. यात शहरी भागात अवघ्या सहा रुग्ण रोज या सरासरीने 91 रुग्णांची तर ग्रामीणभागात रोज 16.27 रुग्ण या सरासरीने 244 रुग्ण वाढले. ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या पंधरा दिवसांत संगमनेरकरांना दररोज दिलासा मिळत गेल्याने दिवाळीपूर्वी कोविडचे संक्रमण आटोक्यात आल्याचा उत्साह नागरिकांच्या मनात भरला आणि इथेच कोविडचे फावले. दिवाळीच्या पूर्वी चार दिवसांत संगमनेरच्या बाजारपेठा मानवी गर्दीने अक्षरशः ओसंडून वाहिल्याने अदृष्य कोविडने या गर्दीत अनेकांना चावा घेतला. त्याचा परिणाम दिवाळीच्या दुसर्याच दिवसापासून समोर यायला सुरुवात झाली, आणि आटोक्यात येत असलेली स्थिती पुन्हा काहीशी विस्कळीत झाली.

पहिल्या पंधरवड्याच्या तुलनेत दिवाळीनंतरच्या 16 ते 30 नोव्हेंबर या कालावधीचा विचार करता तालुक्याच्या एकूण रुग्णगतीत तब्बल सोळा टक्क्यांनी वाढ होवून 38.27 रुग्ण रोज या सरासरीने तब्बल 574 रुग्णांची भर पडली. पहिल्या पंधरवड्यात आढळलेल्या एकूण रुग्णांपेक्षा ही संख्या 189 रुग्णांनी जास्त आहे. गेल्या महिन्याच्या सुरुवातीपासून शहरी रुग्णसंख्येचे प्रमाण खूप कमी होत असल्याचे निरीक्षण होते. मात्र दिवाळीने शहरातील संक्रमणालाही दुप्पट गती देत 11.33 रुग्ण दररोज या सरासरीने 170 रुग्णांची भर घातली. तर तालुक्याच्या संक्रमणात सरासरी दहा टक्क्यांनी वाढ होवून 404 रुग्णांची भर पडली. या संपूर्ण महिन्याचा दोन दिवाळीपूर्वी आणि नंतर अशा दोन भागात विचार करता महिन्याभरात समोर आलेल्या एकूण रुग्णसंख्येतील 36.85 टक्के रुग्ण पहिल्या पंधरवड्यात तर 63.15 टक्के रुग्ण दिवाळीनंतरच्या पंधरवड्यात समोर आले. त्यामुळे महिन्याभरात एकूण 910 रुग्णांची भर घालीत तालुक्याची कोविडसंख्या 5 हजार 248 वर पोहोचली आहे. त्यातील 1 हजार 546 रुग्ण शहरी तर 3 हजार 792 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

या महिन्यात तालुक्यासह शहराचीही रुग्णगती वाढली असली तरीही मृत्यूदरात मात्र मोठी घट झाल्याने व रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणातही वाढ झाल्याने संगमनेरकरांना चिंतादायक वातावरणातही दिलासा मिळाला आहे. या महिन्यात 2 नोव्हेंबर रोजी म.फुले नगरमधील 70 वर्षीय इसम, 14 नोव्हेंबर रोजी मंगळापूर येथील 73 वर्षीय इसम, 19 नोव्हेंबर रोजी आश्वी बु.मधील 74 वर्षीय महिला, 26 नोव्हेंबर रोजी घुलेवाडी येथील 84 वर्षीय इसम व 28 नोव्हेंबर रोजी शहरातील नायकवाडपूरा येथील 77 वर्षीय इसमाचा कोविडने बळी घेतला. त्यामुळे तालुक्यातील बळींचा सरकारी आकडा आता 45 वर पोहोचला आहे. आजच्या स्थितीत तालुक्यातील कोविड मृत्यूचा दर अवघा 0.86 टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.67 टक्के इतके आहे.

डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी तब्बल 49 रुग्ण आढळले..!
दिवाळीनंतरच्या पंधरवड्याने तालुक्याच्या रुग्णवाढीला दिलेली गती डिसेंबरच्या पहिल्याच दिवशीही कायम राहिल्याने या महिन्यातही कोविड संक्रमणाचा आलेख उंचावत जातो की काय अशी चिंता निर्माण झाली आहे. मंगळवारी एकूण 49 जणांचे स्राव चाचणी अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले असून त्यात शहरीभागातील बारा रुग्णांचा समावेश आहे. त्यात शहरातील गणेश नगरमधील 35 व 19 वर्षीय महिला, कुंभार आळ्यावरील 55 वर्षीय इसम, मालदाड रोडवरील 76 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, शास्त्री चौकातील 82 वर्षीय महिला, अकोले नाक्यावरील 45 वर्षीय इसम, शिवाजी नगरमधील 34 वर्षीय तरुण, साळीवाड्यातील 39 वर्षीय तरुण, अभंगमळ्यातील 56 वर्षीय इसम, साईश्रद्धा चौकातील 59 व 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व केवळ संगमनेर असा पत्ता असलेल्या 26 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

यासोबतच ग्रामीणभागातील आश्वी बु्र. येथील 28 वर्षीय तरुण, डोळासणे येथील 27 वर्षीय तरुण, गुंजाळवाडीतील लक्षमीनगर परिसरातील 58 व 53 वर्षीय इसमांसह 36 वर्षीय तरुण, 41 व 33 वर्षीय महिला, घारगावमधील 57 वर्षीय इसमासह 38 व 30 वर्षीय तरुण व 50 वर्षीय महिला, खंदरमाळ येथील 45 वर्षीय इसम, वेल्हाळे येथील 48 वर्षीय इसम, साकूरमधील 74 व 45 वर्षीय इसम, रायते येथील 75 व 35 वर्षीय महिलांसह 45 वर्षीय इसम, खांडगाव येथील 55 वर्षीय महिलेसह 21 वर्षीय तरुण, कर्हे येथील 55 वर्षीय महिला व 27 वर्षीय तरुण, पिंपळगाव माथा येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 25 वर्षीय तरुण, उंबरी बाळापूरमधील 51 वर्षीय इसमासह 28 वर्षीय तरुण, बोटा येथील 44 वर्षीय इसमासह 38 वर्षीय महिला, धांदरफळ बु. येथील 80 व 74 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, घुलेवाडीतील 54 वर्षीय इसमासह 34 व 30 वर्षीय तरुण, कोकणगावमधील 68 वर्षीय महिला, निमगाव टेंभी येथील 55 वर्षीय महिला, पोखरी हवेली येथील 56 वर्षीय इसम व मंगळापूर येथील 80 वर्षीय ज्येष्ठ नागरिक. मंगळवारी अशा एकूण 49 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याने तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 5 हजार 248 वर पोहोचली आहे.

