संगमनेरच्या वैद्यकीय क्षेत्रातील ‘स्टेंट’ बाजीला रक्ताची धार! दोघा नामांकित डॉक्टरांवर ठपका; जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालातही शिक्कामोर्तब..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्राला हादरवणारी अतिशय धक्कादायक घटना संगमनेर शहरातून समोर आली आहे. अकोले तालुक्यातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील रुग्णाचा सोनांबेकर हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या कथित हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याच्या कारणाने तक्रार दाखल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या उच्चस्तरीय समितीने चौकशीअंती दिलेल्या अहवालावरुन संगमनेर शहर पोलिसांनी सदरील रुग्णावर प्रत्यक्ष उपचार करणार्या डॉ.अभिजीत भाऊसाहेब कोरडे यांच्यासह रुग्णालय व्यवस्थापक म्हणून डॉ.अजिंक्य अशोक सोनांबेकर या दोघा प्रतिष्ठित वैद्यकीय व्यावसायिकांवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीचा अडाणीपणा आणि डॉक्टरांचा पैशांचा हव्यास यांच्या कात्रीत एका निष्पाप रुग्णाचा बळी गेल्याचे दाखल तक्रारीवरुन दिसत असल्याने संगमनेरच्या वैद्यकीय क्षेत्रात अलिकडे फोफावत असलेल्या कथित ‘तज्ञ’ डॉक्टरांच्या ‘स्टेंट’ बाजीला आता रक्ताची धार लागल्याचेही स्पष्ट झाले आहे.

याबाबत पिंपळगाव निपाणी येथील मंगल दत्तात्रय दळवी यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे पती दत्तात्रय यांना गेल्यावर्षी 27 फेब्रुवारी 2025 रोजी छातीत वेदना होवू लागल्याने सुरुवातीच्या तपासणीत त्यांचे सर्व तपासणी अहवाल, विशेषतः किडनीशी संबंधित ‘क्रिएटीन’ आणि रक्तातील लालपेशींचे प्रमाण सामान्य होते. 28 फेब्रुवारी रोजी त्यांना संगमनेरच्या सोनांबेकर हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर तेथील हृदयरोगतज्ञ डॉ.अभिजीत कोरडे यांनी त्यांना हृदयातील कथित बिघाडाची भीती घालून त्यांना ‘स्टेंट’ टाकण्याचा सल्ला दिला. मात्र, तत्पूर्वीच 1 मार्चच्या मध्यरात्री अचानक आणीबाणी निर्माण व्हावी त्याप्रमाणे डॉ.कोरडे यांनी अतिशय घाईत शस्त्रक्रिया उरकली.

रुग्णावरील शस्त्रक्रियेनंतर त्याच्या हाताला गँगरीन झाल्याचे डॉक्टरांनी त्यावेळी मान्य केले, पण तरीही ‘पेशंट व्यवस्थित आहे’ असा दिलासाही रुग्णाच्या पत्नीला दिला. धक्कादायक म्हणजे, फिर्यादीला कोणतीही पूर्वकल्पना न देता रुग्णाचे रक्त तपासले गेले आणि अचानक ‘क्रिएटीन’ 4.91 वर गेल्याचे सांगून रुग्णाच्या कुटुंबाला दहशतीखाली आणले गेले. खरेतर, अशा गंभीर टप्प्यावर हॉस्पिटलच्या पॅनलवरील ‘युरोलॉजिस्ट’ किंवा ‘नेफरोलॉजिस्ट’चा सल्ला घेणे आवश्यक असताना, डॉ.कोरडे यांनी केवळ पैशांची मागणी करण्यावरच संपूर्ण भर दिला आणि ‘पैसे नसतील तर पेशंटला घेऊन जा’ असे ठणकावल्याचा गंभीर आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.

पैशांच्या कारणांनी सोनांबेकर हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबाची मोठी फरपट झाली. ठणठणीत दाखल करुन अत्यवस्थ झालेल्या रुग्णाला घेवून त्यांनी नाशिकच्या नाईन प्लस हॉस्पिटल गाठले. तेथे गेल्यावर महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा सगळा लाभ सोनांबेकर हॉस्पिटलने त्यापूर्वीच घेतल्याचे त्यांना समजल्यानंतर या सामान्य शेतकरी कुटुंबाच्या पायाखालची जमिनच सरकली. सोनांबेकर रुग्णालयात दाखल असताना डॉ.कोरडे यांनी रुग्णाला मिळणार्या सरकारी योजनेतील सगळे लाभ आपल्या खिशात घातल्याने त्या रुग्णावर उपचार करण्यासाठी योजनाच राहीली नाही. त्यामुळे नाईलास्तव त्याला घोटीच्या एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले.

मात्र या सगळ्या प्रक्रियेसाठी मोठा वेळ खर्ची पडल्याने हलगर्जीपणाच्या उपचारांनी आधीच अर्धमेल्या झालेल्या रुग्णाची अवस्था आणखी खालावली. मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. त्यातच रुग्णाच्या किडन्याही निकामी झाल्याचे तपासणीतून समोर आल्याने या गरीब शेतकरी कुटुंबावर आभाळच कोसळले त्यातून सावरण्याची धडपड सुरु असतानाच गेल्यावर्षी 22 मार्च 2025 रोजी दत्तात्रय दळवी यांचे निधन झाले.

अलिकडच्या काळात वैद्यकीय क्षेत्रात ‘तज्ञ’ म्हणून मिरवणार्या काही वैद्यकीय व्यावसायिकांनी माणुसकी आणि सेवा खुंटीला टांगून पैशांसाठी रुग्णांच्या जीवाशी अक्षरशः खेळ मांडला आहे. उपचारांदरम्यान आवश्यकता असतानाही तज्ज्ञांचा सल्ला न घेता केवळ सरकारी योजनेच्या लाभाला वाटा नको म्हणून केलेल्या अपुर्या उपचारांमुळेच दत्तात्रय दळवी या अवघ्या 44 वर्षीय शेतकर्याला आपला जीव गमवावा लागला. जिल्हा शल्यचिकित्सकांनीही या प्रकरणात हॉस्पिटलला थेट जबाबदार धरले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांच्या मनमानी कारभाराला काही काळ चाप बसण्याची अपेक्षा आहे. या प्रकरणात संगमनेर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 106 (1) प्रमाणे गुन्हा दाखल केल्याने, यापुढे वैद्यकीय हलगर्जीपणाच्या प्रकरणात केवळ दंडात्मक नव्हेतर फौजदारी कारवाईचा सामना करावा लागेल असा संदेशही गेला आहे.

