निमोणच्या भोंदूगिरीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न! वैद्यकीय अधिकार्‍याला ताटकळत ठेवले; पोलिसांच्या भूमिकेवर संशयाची सुई..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
नाशिकमधील भोंदू खरातच्या पोलीस चौकशीतून एकामागून एक धक्कादायक प्रकार उघड होत असतानाच आता संगमनेर तालुक्यातील निमोणमधूनही असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे नाशिकच्या प्रकरणाचा धडा घेवून तालुका पोलिसांनी तत्काळ ऍक्शन घेण्याची गरज असताना वैद्यकीय अधिकार्‍याला अनेकतास ताटकळत ठेवून पोलीस निरीक्षकांनीच चक्क कलटी मारली, त्यामुळे वैतागलेला फिर्यादी अखेर निघून गेला. या प्रकरणाची माध्यमांमध्ये चर्चा सुरु होताच उपरती झालेल्या पोलिसांनी दुसर्‍या दिवशी चक्क संभाजीनगरहून निमोणसारख्या आडवळणाच्या ठिकाणी येवून गावदेवळात परस्पर उपचारकेंद्र चालवणार्‍या मुन्नाभाईसह त्याच्या तिघा साथीदारांवर वैद्यकीय व्यवसायी व राष्ट्रीय चिकित्सा आयोगाच्या अधिनियमातंर्गत गुन्हा दाखल करुन आरोपीच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात झाडपाला आणि अन्यप्रकारची औषधे हस्तगत केली आहे. धक्कादायक म्हणजे या मुन्नाभाईकडून उपचार करुन घेण्यासाठी सुमारे दोनशेहून अधिक रुग्ण निमोणच्या मारुती मंदिरात जमले होते, मात्र या ‘दवाखान्या’ची भणक निमोणच्या सरपंचांनाही लागली नाही. मंदिरात अचानक झालेली गर्दी आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये नोंदणी झालेली अलिशान वाहने पाहून संशय बळावल्याने हा प्रकार उघड झाला, मात्र त्यानंतर तालुका पोलिसांनी कारवाईबाबत दाखवलेली उदासिनता कायद्याच्या अंमलबजावणीपेक्षा आरोपींना वाचवण्याकडेच अधिक असल्याचेे दिसून आल्याने घारगाव पाठोपाठ तालुका पोलिसांचा भ्रष्टाचारही आता चव्हाट्यावर येवू लागला आहे.


बुधवारी (ता.1) निमोणचे सरपंच संदीप देशमुख आपल्या वाहनातून जात असताना त्यांना गावदेवळाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात माणसांची वर्दळ आणि राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये नोंदणी झालेली असंख्य वाहने दिसून आली. त्यावरुन त्यांनी आपल्या सोबत असलेल्या सहकार्‍यांकडे गावात अथवा देवळात काही खासगी कार्यक्रम आहे का? अशी विचारणा केली. त्यातून नकारात्मक प्रतिसाद आल्यानंतर केवळ चौकशी म्हणून त्यांनी देवळाकडे जावून तेथे जमलेल्या रुग्णवजा भक्तांकडे विचारणा केली असता तेथे जमलेली माणसं उपचारासाठी आल्याचे समोर आले. याबाबत त्यांनी संबंधित मुन्नाभाईबाबत चौकशी सुरु केली असता त्याच्या पंटर्सनी मोर्चा सांभाळून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला.


त्यातून सरपंच देशमुख यांचा संशय बळावल्याने त्यांनी खोलवर चौकशी केली असता कोणतीही वैद्यकीय पदवी अथवा शिक्षण नसताना वसंत सांडू लांडगे हा छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणारा खोटा डॉक्टर आपल्या नावापुढे राजरोस पदवी लावून लोकांवर उपचार करीत असल्याचे व प्रत्येक रुग्णाकडून नऊशे रुपये तपासणी फी घेवून त्यांना चार हजारांची वेगवेगळी औषधे देत असल्याचेही त्यांना दिसले. त्यातून सगळा प्रकार उघड झाल्यानंतर सरपंच व अन्य गावकर्‍यांनी संबंधित डॉक्टरकडे पदवीची मागणी केली असता सुरुवातीला उडवाउडवी करीत वेळ मारुन नेणार्‍या या टोळीचे कारनामे उघड झाले आणि हा सगळाप्रकार सपशेल खोटा असल्याचे व लोकांची फसवणूक सुरु असल्याचे स्पष्ट झाले.


यानंतर सरपंच देशमुख यांनी निमोणच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अतुल घुले यांना या प्रकाराबाबत माहिती देत त्यांना पथकासह मारुती मंदिरात पाचारण केले. या पथकाने कायदेशीर पद्धतीने या टोळीची झाडाझडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची औषधी आणि वेदनाशामक पावडर आढळून आली. धक्कादायक म्हणजे या टोळीतील काहींनी सरपंचांकडून चौकशी सुरु असतानाच औषधाची एक पिशवी पळवून तिची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सावध गावकर्‍यांनी तो हाणून पाडला. सदरील व्यक्तिंकडे ना वैद्यकीय पदवी होती ना औषधे विकण्याचा परवाना, त्या उपरांतही त्यांच्याकडून रुग्णांवर उपचार सुरु होते आणि त्यासाठी राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून जवळपास दोनशेहून अधिकजण अलिशान वाहनांमधून तेथे जमा झाले होते.


हा सगळा प्रकार बनावट असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर डॉ.घुले यांनी मुद्देमालासह आरोपींना घेवून तालुका पोलीस ठाणे गाठले, मात्र पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी तत्पूर्वीच कलटी मारुन एकप्रकारे सदरचा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ सुरु केली. जवळपास तीन ते चार तास पोलीस ठाण्यात अधिकार्‍यांच्या आगमनाची प्रतीक्षा करीत ताटकळल्यानंतर निमोणच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी मुद्देमाल आणि आरोपी तालुका पोलिसांच्या भरवशावर सोडून आपले घर गाठले, मात्र त्याचे कोणतेही सोयरसुतक तालुका पोलिसांना नव्हते. दुसर्‍या दिवशी गुरुवारी (ता.2) या प्रकरणाची माध्यमांमध्ये वाच्चता झाली. त्याची खबर लागताच उपरती झालेल्या तालुका पोलिसांनी रात्री उशिराने निमोणच्या वैद्यकीय अधिकार्‍यांना पाचारण करुन या प्रकरणी तक्रार नोंदवून घेतली.


त्यावरुन पोलिसांनी मुन्नाभाई डॉ.वसंत सांडू लांडगे (रा.नाईकनगर, छ.संभाजीनगर), सतीष कचरु शीरसाठ (वय 37, रा.रामनगर, सिडको, छ.संभाजीनगर), अरुण शांताराम सरोदे (वय 49, रा.नाईकनगर, छ.संभाजीनगर) व आदित्य वसंत लांडगे (वय 27, रा.नाईकनगर, छ.संभाजीनगर) या चौघांविरोधात वैद्यकीय व्यवसायी व राष्ट्रीय चिकित्सा आयोगाच्या अधिनियमातील तरतूदीनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात रुग्णांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक होण्यासह झडपट चमत्कार दाखवण्याच्या उद्देशाने उत्तेजक औषधांचा वापर केला जात होता असेही समजते. त्यामुळे या टोळीचा संबंध मादक पदार्थांच्या तस्करीशी तर जोडलेले नाही अशीही शंका निर्माण झाली आहे. मात्र तालुका पोलिसांची भूमिका पाहता या प्रकरणाचा गांभीर्याने तपास होण्याची शक्यता धुसर आहे.


आपल्याकडे अलौकीक शक्ति असल्याचा आभास निर्माण करुन भोळ्या लोकांची फसवणूक करण्याचा खरात पॅटर्न सध्या राज्यात गाजत असताना संगमनेर तालुक्यातील निमोण सारख्या गावातही अशाच चमत्कारातून प्रत्येक रुग्णाकडून नऊशे रुपये उकळण्याचा आणि त्यांना घातक औषधे देवून त्यांच्या जीवाशी खेळण्याचा अतिशय धक्कादायक प्रकार सरपंच संदीप देशमुख यांच्या सजगतेने उघड झाला. खरेतर सध्याच्या बनवेगिरीच्या वाढत्या प्रकारांनी सर्वसामान्यांमध्ये भय निर्माण झालेले असताना तालुका पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेवून तत्काळ त्याच्या मूळाशी जाण्याची गरज होती. प्रत्यक्षात मात्र पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी या प्रकरणात तक्रारच दाखल होणार नाही अशा प्रकारचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. त्यामुळे सदर प्रकरणाची तक्रार दाखल होण्यास तब्बल 30 तासांचा काळ लागला. यातून घारगावप्रमाणे तालुका पोलिसांच्या भ्रष्टाचाराचा घडाही काठोकाठ भरल्याचे उघड झाले असून पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी आपल्या स्वच्छ प्रतिमेवर या अधिकार्‍यांच्या भ्रष्टाचाराचे शिंतोडे उडण्यापूर्वीच त्यांना ‘मुख्यालयात’ जमा करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Visits: 2 Today: 2 Total: 1652823

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *