धरणांच्या पाणलोटात पावसाची विश्रांती कायम! आढळा खोर्यातील पावसाची प्रतीक्षा अजूनही संपेना
नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणात आजच्या स्थितीत समाधानकारक पाणीसाठा असल्याने समाधानाचे चित्र असले तरीही गेल्या आठवड्याभरापासून पावसाने दडी मारल्याने धरणं भरतील की नाही अशी शंका निर्माण झाली आहे. एकीकडे पाणलोटात पाऊस सुरु असताना लाभ क्षेत्रात उघडीप होती. तर आता दोन्हीकडील पावसाने पूर्णतः विश्रांती घेतल्याने चिंता निर्माण झाल्या आहेत. त्यातच आढळा खोर्यात पावसाचा मागमूसही नसल्याने या चिंतेत आणखी भर पडली आहे. जिल्ह्यातील तिनही मोठ्या धरणात सध्या 73 टक्के पाणीसाठा असून पाण्याची आवक जवळपास रोडावली आहे.
जुलै आणि ऑगस्टच्या महिन्यात मुळा व भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पावसाचा अक्षरशः कहर पहायला मिळतो. यंदा मात्र वेळेत आगमन करणार्या वरुणराजाने नंतरच्या काळात दीर्घकाळ ओढ दिल्याने जूनमध्येच जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर 19 जुलै रोजी आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला धरणांच्या पाणलोटात वरुणराजाचे पुनरागमन झाले आणि अवघ्या दहा दिवसांतच निसर्गाची किमया अनुभवायला मिळाली. खपाटीला चाललेल्या जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा व निळवंडे या तिनही धरणांच्या पाणलोटात पावसाने मुक्काम ठोकला आणि बघताबघता धरणांचे जलसाठे फुगू लागले.
मुळा व भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पावसाला जोर चढल्याने 15 ऑगस्टपूर्वीच धरण तुडूंब भरुन वाहू लागेल अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र ऑगस्ट येतायेता टप्प्याटप्प्याने पावसाचा जोर ओसरत जावून आजच्या स्थितीत किरकोळ रिमझिम वगळता पाऊस थांबल्याने मुळा, भंडारदरा व निळवंडे ही जवळपास 45 हजार दशलक्ष घनफूट क्षमतेची जलाशये भरता भरता राहीली, ती आजही तशीच आहेत. मागील काही दिवसांपासून पाणलोटात पुन्हा पावसाचे वातावरण तयार झाले आहे, मात्र पाऊस होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे धरणांमध्ये संथगतीने पाण्याची आवक होत असून भंडारदर, मुळा व निळवंडे या तीनही धरणातून विसर्ग सुरु असल्याने पाणीसाठे स्थिरावले आहेत.
गेल्या चोवीस तासांत भंडारदरा धरणात 92 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली त्यातील 71 दशलक्ष घनफूट पाणी विद्युत निर्मितीसाठी 830 क्युसेक्स वेगाने सोडले गेले, तर निळवंडे धरणातून 800 क्युसेक्स वेगाने प्रवरा नदीपात्रात पाणी सोडले आहे. गेल्या चोवीस तासांत निळवंड्यात 69 दशलक्ष घनफूट पाणी दाखल झाले, तर 79 दशलक्ष घनफूट पाणी आवर्तनासाठी खर्ची झाले. मुळा धरणात सर्वाधीक 108 दशलक्ष घनफूट पाणी दाखल झाले असून धरणाच्या कालव्यातून 50 क्युसेक्स पाणी सोडले जात आहे. पुढील दोन दिवसांत धरणाच्या पाणलोटासह लाभ क्षेत्रातही पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून नागरिकांचे डोळे आता नभाकडे लागले आहेत.
मागील चोवीस तासांत घाटघर येथे 14 मिलीमीटर, रतनवाडी व पांजरे येथे प्रत्येकी 11 मिलीमीटर, भंडारदरा येथे आठ मिलीमीटर, वाकी येथे सहा मिलीमीटर व आढळा येथे अवघा दोन मिलीमीटर पाऊस नोंदविला गेला आहे. सध्या कोतुळ येथील मुळा नदीच्या पात्रातून 977 क्युसेक्स तर वाकी जलाशयाच्या भिंतीवरुन कृष्णवंती नदीच्या पात्रात 197 क्युसेक्सचा प्रवाह सुरु आहे. आज सकाळी सहा वाजता मुळा धरणाचा पाणीसाठा 17 हजार 844 दशलक्ष घनफूट (68.63 टक्के), भंडारदरा धरण 9 हजार 746 दशलक्ष घनफूट (88.29 टक्के), निळवंडे धरण 5 हजार 469 दशलक्ष घनफूट (65.56 टक्के) व आढळा धरण 522 दशलक्ष घनफूट (49.24 टक्के) इतका झाला आहे.