‘खरात’पाठोपाठ आता संगमनेरच्या ‘एरंडे’ फाईल्सचा धिंगाणा! सव्वाशे महिलांचे शोषण केल्याचा आरोप; नोकराने खंडणी मागितल्याने झाला पर्दाफार्श..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
तंत्रविद्येची भीती घालून महिलांचे लैंगिक शोषण आणि त्याचे छायाचित्रण करणार्‍या कॅप्टन खरात प्रकरणाने अवघ्या राज्यात खळबळ उडाली असताना आता काहीशा तशाच पद्धतीने शंभरावर महिलांचे शारीरिक शोषण करणारा धक्कादायक प्रकारही आता उजेडात आला आहे. विशेष म्हणजे खरात प्रकरणाप्रमाणेच या प्रकरणातही अनेकवर्ष काळ्या कारनाम्यांचा साक्षीदार राहिलेल्या नोकरानेच मालकाचे कृत्य दडवण्यासाठी बारा लाखांची खंडणी मागितली आणि त्याच्या तपासात पोलिसांच्या हाती फिर्यादीचीच लिंग पिसाट कुंडली लागली. या धक्कादायक प्रकरणात पोलिसांनी पहिल्या दिवशी 63 वर्षीय रविंद्र एरंडे याच्या फिर्यादीवरुन चौघांवर खंडणीचा तर दुसर्‍या दिवशी मूळ फिर्यादीवरच नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचारासह अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये (अ‍ॅट्रोसिटी) गुन्हा दाखल करुन या दोन्ही प्रकरणात मिळून पाचजणांना अटक केली आहे. खळबळजनक म्हणजे या कारवाईत पोलिसांनी जप्त केलेल्या डिजिटल साधनांमधून 63 वर्षीय मूळ फिर्यादी एरंडे याने 121 महिलांशी शारीरिक संबंध केल्याचे चित्रीकरण असल्याचे आढळले असून ‘खरात’ पाठोपाठ संगमनेरच्या सातपूरमधील ‘एरंडे’ फाईल्स आता राज्यात चर्चेत आल्या आहेत.


याबाबत सातपूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी (ता.2) मूळच्या संगमनेरच्या मात्र सध्या सातपूरमध्ये वास्तव्यास असलेल्या रविंद्र गणपत एरंडे (वय 63) या ज्येष्ठ नागरिकाने आपल्या कार्यालयातून टॅबची चोरी करुन त्यात असलेल्या मित्र-मैत्रिणींची छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देत 12 लाख रुपयांची खंडणी मागितली जात असल्याची तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पोलिसांनी तत्काळ तपास करुन आरोपींना आडगाव परिसरात सिनेस्टाईल पाठलाग करीत जेरबंद केले. त्यात आकाश पुंडलिक बकरे (वय 26, रा.अशोकनगर, सातपूर), प्रकाश रामदास पानपाटील (वय 25, सातपूर कॉलनी, सातपूर), सुरज सुनील गवई (वय 27, मोतीवाला कॉलेज, सातपूर) व श्रीपत भीमराव शिंदे (वय 36, रा.खंबाळे, ता.त्र्यंबकेश्‍वर) या चौघांना ताब्यात घेतले.


या प्रकरणाच्या तपासात अटक केलेल्या आरोपींकडे चौकशी सुरु असतानाच पोलिसांनी त्यांच्याकडून हस्तगत केलेल्या चार मोबाईल, दोन पेनड्राईव्ह व एका मेमरी कार्डची तपासणी केली असता पोलिसांना धक्काच बसला. पोलिसांच्या तपासणीत आरोपींकडून मिळालेल्या डिजिटल साधनांमध्ये मूळ फिर्यादी रविंद्र एरंडे याचे वेगवेगळ्या तब्बल 121 महिलांसोबत शारीरिक संबंध करतानाच्या व्हिडिओ क्लिप्स आढळून आल्या. त्याच्या प्राथमिक तपासातच एक पीडित महिला पुढे झाली व तिने हिमतीने आपल्यासोबत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानुसार आरोपी रविंद्र एरंडेने पीडित महिलेच्या मुलाला सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून नाशिक व इगतपूरी परिसरातील विविध हॉटेल व लॉजवर नेवून शोषण केल्याची तक्रार दाखल झाली. त्यासोबतच सदरील महिला अनुसूचित जातीची असल्याने आरोपीवर अ‍ॅट्रोसिटीच्या तरतुदीही लावण्यात आल्या आहेत.


गेल्या महिन्यात नाशिकमधील कॅप्टन अशोक खरात याच्या भोंदगिरीचा भंडाफोड होवून त्याचा संपूर्ण काळाकारनामा उघड झाला होता. काळ्या विद्येचे भय दाखवून त्याने शेकडों महिलांचे शारीरिक शोषण केल्याच्या बातम्यांनी संपूर्ण राज्यातून संतापाचे पाट वाहत असताना त्याच नाशिकमधून हा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेतील सूत्रधार 63 वर्षीय रविंद्र गणपत एरंडे हा मूळचा संगमनेर शहरातील रहिवाशी असून गेल्या अनेक वर्षांपासून तो सातपूरच्या नीलकंठेश्‍वर नगरमध्ये वास्तव्यास आहे. या परिसरात तो ब्युटीपार्लर प्रशिक्षण केंद्रासह महिलांना रोजगार मिळवून देणारे मार्गदर्शन केंद्रही चालवतो. या दरम्यान 2003 पासून आजवर त्याने रोजगाराच्या निमित्ताने संपर्कात आलेल्या महिलांचे शारीरिक शोषण केल्याचा संशय असून पोलिसांनी पीडित महिलांनी समोर येण्याचे आवाहन केले आहे.

आरोपी रविंद्र गणपत एरंडे (वय 63, रा.नीलकंठेश्‍वरनगर, अशोकनगर, सातपूर) याने रोजगाराच्या निमित्ताने महिलांना आमिष दाखवून अनेक महिलांशी शारीरिक संबंध प्रस्थापित करुन त्याचे व्हिडिओचित्रण केले आहे. सदरचा प्रकार गंभीर असून नाशिक पोलीस या प्रकरणाचा अतिशय गांभीर्याने तपास करीत आहे. आरोपी एरंडे याने कोणत्याही महिलेला अशा प्रकारे आर्थिक अथवा शारीरिक त्रास दिला असेल अथवा त्याच्याविषयी कोणत्याही स्वरुपाची तक्रार असेल त्यांनी निसंकोचपणे सातपूर पोलिसांशी संपर्क साधावा. या प्रकरणाच्या तपासात पीडित महिलांच्या गोपनीयतेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे.
सचिन बारी
सहाय्यक पोलीस आयुक्त, अंबड विभाग

Visits: 4 Today: 4 Total: 1659319

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *